Tuesday, August 25, 2026
Google search engine
HomeUncategorizedअपोलो हॉस्पिटल्स इंटरनॅशनल हेल्थ डायलॉग' च्या पहिल्या दिवशी 'रुग्ण सुरक्षेसाठी जागतिक दृष्टीकोन'...

अपोलो हॉस्पिटल्स इंटरनॅशनल हेल्थ डायलॉग’ च्या पहिल्या दिवशी ‘रुग्ण सुरक्षेसाठी जागतिक दृष्टीकोन’ मांडण्यात भारत आघाडीवर

 

 

 

 

हैदराबाद, ३० जानेवारी २०२६: ‘इंटरनॅशनल हेल्थ डायलॉग (IHD) २०२६’ ला हैदराबादमध्ये सुरुवात झाली. या परिषदेनिमित्त भारत आणि जगभरातील दिग्गज डॉक्टर्स, रुग्ण सुरक्षा तज्ज्ञ, प्रमाणीकरण क्षेत्रातील जाणकार आणि आरोग्य धोरणकर्ते एकाच व्यासपीठावर आले आहेत. ‘ग्लोबल वॉइसेस, वन व्हिजन’ या संकल्पनेवर आधारित पहिल्या दिवसाचे सत्र प्रामुख्याने ‘ रुग्णांची सुरक्षा’ या विषयावर केंद्रित होते. यामध्ये रुग्ण सुरक्षेला केवळ तांत्रिक विषय न मानता, ते नेतृत्व आणि सुशासनाचे सर्वोच्च प्राधान्य असल्याचे अधोरेखित करण्यात आले. समान आरोग्य सेवा आणि जबाबदार डिजिटल परिवर्तनाच्या माध्यमातून हे उद्दिष्ट साध्य करण्यावर चर्चा झाली. या सत्रांमधून एक महत्त्वाची बाब समोर आली: मोठ्या स्तरावर आरोग्य सेवा पुरवताना भारताने मिळवलेला अनुभव आणि मानकांमध्ये केलेली सातत्यपूर्ण सुधारणा, आता रुग्ण सुरक्षेबाबतच्या जागतिक विचारांना नवी दिशा देत आहे.

 

 

 

परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी अपोलो हॉस्पिटल्स ग्रुपच्या जॉईंट मॅनेजिंग डायरेक्टर, डॉ. संगीता रेड्डी यांनी ‘इंटरनॅशनल हेल्थ डायलॉग’ (IHD) च्या मूळ उद्देशाची आठवण करून दिली. हे व्यासपीठ केवळ स्वतःपुरते मर्यादित न राहता अनुभवांची देवाणघेवाण करण्यासाठी तयार करण्यात आले आहे, असे त्यांनी नमूद केले. त्या म्हणाल्या, “आपल्या रुग्णालयांमध्ये आणि प्रणालींमध्ये दररोज नवनवीन शोध लावले जात आहेत आणि आपण त्यातून शिकत आहोत. मग हे ज्ञान केवळ आपल्यापुरतेच का मर्यादित राहायला हवे? आपण ते अधिक मोकळेपणाने का शेअर करत नाही?” त्या पुढे म्हणाल्या की, “आपण जे शिकलो ते इतरांसाठी उपयुक्त ठरावे” हाच आमचा नेहमीच हेतू राहिला आहे.” या व्यासपीठाची वाढती जागतिक व्याप्ती अधोरेखित करताना त्यांनी सांगितले की, IHD 2026 साठी जगभरातील ७५ हून अधिक संस्थांकडून ५,००० पेक्षा जास्त नोंदणी, ३०० हून अधिक शोधनिबंध आणि पुरस्कारांसाठी प्रवेशिका १२० हून अधिक प्राप्त झाल्या आहेत.

 

 

 

प्रत्यक्षात परिणामकारक ठरणाऱ्या निष्कर्षांवर भर देत, तेलंगणा सरकारचे उद्योग, वाणिज्य आणि माहिती तंत्रज्ञान विभागाचे विशेष मुख्य सचिव डॉ. जयेश रंजन यांनी ‘रुग्ण सुरक्षे’च्या आराखड्यात समानता केंद्रस्थानी का असावी, याचे महत्त्व अधोरेखित केले. ते म्हणाले, “जेव्हा आपण शिकलेले अनुभव शेअर करण्याबद्दल आणि यंत्रणा सुधारण्याबद्दल बोलतो, तेव्हा आपल्याला वास्तविकतेचा स्वीकार करावा लागेल—सगळे रुग्ण हे एकसारखे नसतात. प्रत्येक रुग्णाची परिस्थिती वेगळी असते आणि त्यांच्यासाठी सुरक्षिततेचा अर्थही वेगळा असू शकतो.” ते पुढे म्हणाले, “समानतेचा दृष्टिकोन आपल्याला अधिक विचारपूर्वक आराखडा तयार करण्यास भाग पाडतो. जर आपल्याला ‘रुग्णांची सुरक्षा’ खऱ्या जगात यशस्वी करायची असेल, तर आपल्याला सर्वात असुरक्षित किंवा गरीब घटकांचा विचार करून आरोग्य सुविधांची रचना करावी लागेल. तसेच, उपचारांमधील सातत्य, त्यांची उपलब्धता आणि सामान्य लोकांचे प्रत्यक्ष वर्तन कसे असते, याचे नियोजन करणे आवश्यक आहे.” डिजिटल समावेशावर भाष्य करताना त्यांनी निरीक्षण नोंदवले की, “डिजिटल दरी ही केवळ पायाभूत सुविधांची नाही, तर अनेकदा ती मानसिकतेची दरी असते.”

 

 

 

दिवसभरातील चर्चेतून सर्व वक्त्यांनी एका व्यावहारिक मुद्द्यावर एकमत व्यक्त केले: रुग्णांसाठी सुरक्षेचे यश हे आता प्रामुख्याने नियामक, प्रमाणीकरण करणाऱ्या संस्था, सेवा पुरवठादार आणि तंत्रज्ञान भागीदार या संपूर्ण यंत्रणेने एकसंधपणे केलेल्या समन्वयावर अवलंबून आहे. उद्घाटन सत्रात बोलताना अपोलो हॉस्पिटल्स एंटरप्राइझ लिमिटेडचे हॉस्पिटल्स डिव्हिजनचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी, डॉ. मधु शशिधर यांनी सामायिक मालकी आणि संस्थात्मक उत्तरदायित्वावर भर दिला. ते म्हणाले, “रुग्ण सुरक्षेचा प्रश्न कोणताही एक घटक एकटा सोडवू शकत नाही. यासाठी नियामक संस्था, सरकार, प्रमाणीकरण संस्था, सेवा पुरवठादार आणि तंत्रज्ञान कंपन्यांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे. रुग्णांची सुरक्षा ही केवळ एका विभागाची जबाबदारी नसून, ती संपूर्ण संस्थेच्या नेतृत्वाची जबाबदारी आहे.”

 

 

 

विविध सत्रांमधून एक महत्त्वाचा विचार सातत्याने मांडला गेला, तो म्हणजे—केवळ आजार झाल्यावर उपचार करण्याऐवजी, आजार होऊ नये म्हणून वेळीच प्रतिबंधात्मक उपाय करण्यावर भर देणे आवश्यक आहे. जागतिक स्तरावर आरोग्य यंत्रणांवर येणाऱ्या दबावाबाबत बोलताना डॉ. संगीता रेड्डी यांनी नमूद केले की, “आरोग्य सेवांची मागणी झपाट्याने वाढत आहे. आपण वेगाने वाढणाऱ्या या गुंतागुंतीच्या समस्यांचे निराकरण जुन्या किंवा साध्या पद्धतींनी करू शकत नाही.” या चर्चेत असा निष्कर्ष काढण्यात आला की, यासाठी आपल्याला अधिक प्रभावी प्रतिबंधात्मक धोरणे, उपचारांच्या परिणामांचे अचूक मोजमाप आणि शिस्तबद्ध पद्धतीने राबवलेली डिजिटल साधने यांची सांगड घालणे आवश्यक आहे.

 

 

 

जागतिक गुणवत्ता आणि सुरक्षा दृष्टिकोनातून, ‘इंटरनॅशनल सोसायटी फॉर क्वालिटी इन हेल्थ केअर’ (ISQua) चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कार्सन एंजेल यांनी सातत्यपूर्ण प्रयत्न आणि प्रत्यक्ष जमिनीवरील सुधारणा यांच्यातील अंतरावर भाष्य केले. ते म्हणाले, ” रुग्णांची सुरक्षा हा विषय अनेक दशकांपासून चर्चेत आहे, पण आपण अद्याप अपेक्षित ध्येयापर्यंत पोहोचलेलो नाही, हे मान्य करावे लागेल.” परिणामशून्य उपक्रम राबवण्याबाबत सावध करताना ते म्हणाले, “आपण केवळ सुरक्षेच्या नावाखाली प्रक्रिया आणि उपक्रमांचा अनावश्यक ढिगारा साचवण्याचा धोका निर्माण करत आहोत, ज्यामुळे प्रत्यक्ष सुरक्षिततेत कोणतीही सुधारणा होत नाही.” त्यांनी नेत्यांना लोकांचे वर्तन आणि परिस्थिती समजून घेण्याचे आवाहन केले: “लोकांनी जे करायला हवे होते ते त्यांनी का केले नाही, हे विचारू नका. त्याऐवजी, त्यांनी जे केले ते त्यांना त्या परिस्थितीत योग्य का वाटले, याचा शोध घ्या.”

 

 

 

मानके आणि त्यांच्या अंमलबजावणीवर भर देताना, नॅशनल अक्रॅडिटेशन बोर्ड फॉर हॉस्पिटल्स अँड हेल्थकेअर प्रोव्हायडर्स (NABH) चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अतुल मोहन कोचर यांनी अंमलबजावणीला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, “रुग्णांची सुरक्षा हा केवळ तांत्रिक विषय नाही; ती एक नैतिक, सामाजिक आणि आर्थिक गरज आहे. केवळ धोरणे आखल्याने सुरक्षिततेत सुधारणा होत नाही, तर त्या धोरणांची कार्यक्षम अंमलबजावणीच बदल घडवून आणते.” रुग्णांच्या सुरक्षेबद्दलचे आपले ध्येय स्पष्ट करताना ते पुढे म्हणाले, “रुग्ण सुरक्षेच्या बाबतीत आपण महत्त्वाकांक्षी असायला हवे. रुग्णांच्या सुरक्षेचा विचार करताना ‘झिरो हार्म’ (शून्य हानी) हा एकमेव आकडा आपण स्वीकारला पाहिजे.”

 

 

 

अंमलबजावणी, उत्तरदायित्व आणि मोजता येण्याजोगे सुरक्षा निष्कर्ष यावर भर देत, परिषदेच्या पहिल्या दिवशी अपोलो हॉस्पिटल्सने रॉश डायग्नोस्टिक्स इंडियासोबत सामंजस्य करार केला. या कराराचा मुख्य उद्देश क्लिनिकल निर्णय प्रक्रियेत प्रगत आर्टिफिशियल इंटेलिजंसचा समावेश करणे हा आहे. ही भागीदारी आर्टिफिशियल इंटेलिजंसद्वारे मिळणाऱ्या माहितीचे रूपांतर डॉक्टरांसाठी उपयुक्त आणि सुलभ अशा क्लिनिकल सपोर्टमध्ये करण्यावर लक्ष केंद्रित करेल. यामुळे उपचारांच्या प्रक्रियेत अधिक सातत्य येईल, धोक्यांचे वेळेत निदान करणे सोपे होईल आणि मोठ्या प्रमाणावर अधिक सुरक्षित व प्रमाणित आरोग्य सेवा देणे शक्य होईल.

 

 

 

अपोलो हॉस्पिटल्सच्या ‘कल्चर-लेड ट्रान्सफॉर्मेशन’ (संस्कृती-आधारित बदल – केवळ नियम न बदलता कामाची पद्धत आणि मानसिकता बदलणे) या संकल्पनेवर भर देताना, अपोलो हॉस्पिटल्सच्या मेडिकल सर्व्हिसेस प्रमुख डॉ. रोहिणी श्रीधर यांनी स्पष्ट केले की, जेव्हा क्लिनिकल टीम्स संस्थेसोबत एकदिलाने काम करतात, तेव्हाच यंत्रणेत सुधारणा होते. त्या म्हणाल्या, “जोपर्यंत डॉक्टर आणि वैद्यकीय टीम्स तुमच्या पाठीशी उभे राहत नाहीत, तोपर्यंत ‘झिरो हार्म’ (शून्य हानी) हे ध्येय गाठणे शक्य नाही. जर एखाद्या युनिटमध्ये काही त्रुटी किंवा हानी झाली, तर त्यातून प्रत्येक युनिटने त्वरित धडा घेतला पाहिजे. तंत्रज्ञान शिकण्याचा वेग वाढवते, परंतु प्रत्यक्ष कृती कशी असावी हे तिथली कामाची संस्कृतीच ठरवते.”

 

 

 

दिवसाच्या उत्तरार्धात, ‘आयएचडी २०२६’ मध्ये नव्याने सुरू झालेल्या डिजिटल हेल्थ स्टार्टअप कम्युनिटीसाठी एका विशेष सत्राचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये निवडक स्टार्टअप्सनी गुंतवणूकदारांसमोर सादरीकरण (Pitching) केले. हे सत्र प्रामुख्याने वैद्यकीय आणि कार्यात्मक त्रुटी दूर करणाऱ्या उपायांवर केंद्रित होते. यात सुरक्षित कार्यपद्धती, निर्णय प्रक्रियेत मदत, जोखमींचे वेळेत निदान, सुधारित दस्तऐवजीकरण आणि मोठ्या प्रमाणावरील रुग्ण सहभाग यांसारख्या विषयांचा समावेश होता. या उपक्रमाने ‘आयएचडी’ च्या मूळ हेतूचा पुनरुच्चार केला—म्हणजेच, नवनवीन शोधांचे रूपांतर अशा प्रमाणित आणि अंमलबजावणीयोग्य साधनांमध्ये करणे, ज्यामुळे रुग्ण सुरक्षा, उपचारांचे निष्कर्ष आणि विश्वासार्हता अधिक मजबूत होईल.

 

 

 

‘आयएचडी २०२६’ परिषदेचा पुढचा टप्पा ३१ जानेवारी रोजी हैदराबादमध्ये सुरू राहणार आहे. या दिवशी रुग्णांची सुरक्षा, डिजिटल परिवर्तन, आरोग्य सेवा कार्यपद्धती आणि क्लिनिकल लर्निंग या विषयांवर आधारित विशेष सत्रे आणि सादरीकरणे पार पडतील.

 

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments