पुणे, दि. 10 ऑक्टोबर 2025 : पुणे जिल्ह्यातील 15 ते 45 वयोगटातील पात्र उमेदवारांसाठी अल्पकालीन रोजगारक्षम प्रशिक्षण कार्यक्रमाचा (स्टेप) नुकताच शुभारंभ करण्यात आला. कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत जिल्ह्यातील सर्व शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (ITI) व शासकीय तांत्रिक विद्यालयांमध्ये हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे.
या उपक्रमांतर्गत उपलब्ध आधुनिक सुविधा व अत्याधुनिक प्रशिक्षण साधनांचा वापर करून तज्ज्ञ निदेशकांमार्फत अद्यावत तंत्रज्ञानावर आधारित अल्प मुदतीचे, मागणी आधारित प्रशिक्षण देण्यात येणार आहे. उद्योग क्षेत्रातील गरजांचा विचार करून उमेदवारांना आवश्यक असलेल्या प्रगत कौशल्यांचे प्रशिक्षण दिले जाणार असून, त्याद्वारे रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी वाढविण्याचा उद्देश आहे.
पुणे जिल्ह्यात आंबेगाव ITI येथे 6, बारामती 5, भोर 1, दौंड 1, इंदापूर 4, जुन्नर 5, खेड 6, मावळ 5, मुळशी 1, हवेली महिला ITI 12, औंध ITI 15, पिंपरी-चिंचवड ITI 6, पुरंदर 6, शिरूर 3 व वेल्हे ITI येथे 2 असे एकूण विविध अल्पकालीन प्रशिक्षण कोर्स राबविले जाणार आहेत.
प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या उमेदवारांना प्रमाणपत्र देण्यात येणार असून, हे प्रमाणपत्र संबंधित क्षेत्रात रोजगार व स्वयंरोजगार मिळविण्यास उपयुक्त ठरणार आहे. या संधीची माहिती अधिकाधिक युवकांपर्यंत पोहोचवावी, असे आवाहन श्री. सु. रा. वराडे, सहायक आयुक्त, जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, पुणे यांनी केले आहे.
अधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, 481, रास्ता पेठ, पुणे येथे किंवा दूरध्वनी क्रमांक (020) 26133603 वर संपर्क साधावा, असेही कळविण्यात आले आहे.


