पुणे, दि. ९ सप्टेंबर (जिमाका वृत्तसेवा) – प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे कार्यक्षेत्रातील नागरिकांना पक्की अनुज्ञप्ती मिळविण्यासाठी अपॉइंटमेंटचे प्रमाण वाढल्यामुळे वेळेत स्लॉट उपलब्ध होत नसल्याची बाब निदर्शनास आली आहे. नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी शनिवारी सुट्टीच्या दिवशीही पक्की अनुज्ञप्ती चाचणीचे कामकाज सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
यासंदर्भात परिवहन आयुक्त कार्यालयाने जारी केलेल्या परिपत्रकानुसार, पक्की अनुज्ञप्ती चाचणीसाठीचे स्लॉट शनिवारीही उपलब्ध करून देण्याबाबत निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे यांनी आवश्यक कार्यवाही केली आहे.
उपरोक्त पार्श्वभूमीवर आयडीटीआर, आळंदी रोड कार्यालय येथे शनिवारी सुट्टीच्या दिवशी पक्की अनुज्ञप्ती चाचणीचे कामकाज सुरू ठेवण्यात येणार असून नागरिकांना नियमित दिवसांव्यतिरिक्त अतिरिक्त स्लॉट उपलब्ध होणार आहेत. यामुळे अपॉइंटमेंटसाठीची प्रतीक्षा कमी होऊन नागरिकांना वेळेत पक्की अनुज्ञप्ती मिळण्यास मदत होणार आहे.
नागरिकांनी ऑनलाइन पद्धतीने अपॉइंटमेंट नोंदवून नियोजित वेळेनुसार उपस्थित राहावे, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.


