गोवा, 17 फेब्रुवारी 2026 : इंडियन रेसिंग फेस्टिव्हलच्या चौथ्या फेरीने गोवा अक्षरशः हाय-एनर्जी मोटरस्पोर्ट्स अरेनात रूपांतरित झाला. रंगतदार स्ट्रीट सर्किट, प्रेक्षकांची उत्स्फूर्त उपस्थिती आणि वाढता स्थानिक पाठिंबा यामुळे शहरात रेसिंगचा जल्लोष पाहायला मिळाला. या थरारक लढतीत राऊल हायमन आणि फॅबिएन वोल्वेंड यांनी ४२:११.७७९ या एकत्रित वेळेसह गोवा एसेस जेए रेसिंगला संस्मरणीय रिलेस्वरूपातील विजय मिळवून दिला.
गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले, “घरच्या मैदानावर विजय मिळवल्याबद्दल गोवा एसेस आणि संपूर्ण संघाचे अभिनंदन. ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी सर्व भागीदारांचे आभार. इंडियन रेसिंग फेस्टिव्हलचे आयोजन हे गोव्याला मोटरस्पोर्ट्स आणि क्रीडा पर्यटन केंद्र म्हणून विकसित करण्याच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. जागतिक दर्जाच्या स्पर्धांचे आयोजन करण्याची क्षमता गोव्याने दाखवून दिली आहे.”
रेसिंग प्रमोशन्स प्रा. लि.चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक अखिलेश रेड्डी म्हणाले, “गोव्याचा पाठिंबा विलक्षण होता. स्ट्रीट सर्किटमुळे हा खेळ लोकांच्या अधिक जवळ येतो. उत्सुकता प्रेक्षकांना आकर्षित करते आणि अनुभव त्यांना कायमस्वरूपी चाहते बनवतो. येथे मिळालेल्या प्रतिसादामुळे लवकरच आणखी एक फेरी घेऊन येण्याचा आमचा मानस आहे.”
गोवा एसेस जेए रेसिंगचे जॉन अब्राहम, किच्चा’स किंग्स बेंगळुरूचे किच्चा सुदीप, हैदराबाद ब्लॅक बर्ड्सचे नागा चैतन्य आणि कोलकाता रॉयल टायगर्सचे सौरव गांगुली हे संघमालक उपस्थित होते.
ड्रायव्हर ‘ए’ स्टिंट : हायमनची आघाडी
राऊल हायमनने ५३.५२७ सेकंदांचा सर्वात जलद फेरा नोंदवत सुरुवातीपासूनच आघाडी घेतली. १९ ते २२ मिनिटांच्या अनिवार्य ड्रायव्हर बदलाच्या वेळेत त्याने जवळपास २० सेकंदांची आघाडी कायम ठेवत कार फॅबिएनकडे सुपूर्द केली.
हायमन म्हणाला, “हा आमचा पहिलाच ड्रायव्हर-स्वॅप फॉरमॅटमधील अनुभव होता. मी आघाडी मिळवून दिली; पण सेफ्टी कारमुळे फॅबिएनवर दडपण आले. तिने उत्कृष्ट कामगिरी केली आणि प्रत्येक आव्हानाला समर्थपणे उत्तर दिले.”
ड्रायव्हर ‘बी’ स्टिंट : वोल्वेंडचा संयम
सेफ्टी कारमुळे आघाडी कमी झाल्यानंतर फॅबिएन वोल्वेंडवर मोठे दडपण आले. मात्र तिने दमदार रीस्टार्ट करत आत्मविश्वासाने बचाव केला आणि रुहान आल्वाच्या आव्हानाला तोंड देत शेवटपर्यंत आघाडी कायम ठेवली. ती या स्पर्धेच्या इतिहासातील दुसरी महिला विजेती ठरली.
वोल्वेंड म्हणाली, “राऊलने भक्कम आघाडी दिली होती. सेफ्टी कारनंतर शांत राहणे महत्त्वाचे होते. मी चांगला रीस्टार्ट घेतला आणि अंतर वाढवले.”
निकाल
१) गोवा एसेस जेए रेसिंग (राऊल हायमन व फॅबिएन वोल्वेंड) – ४२:११.७७९
२) किच्चा’स किंग्स बेंगळुरू (सॅचल रोटगे व रुहान आल्वा) – ४२:१२.७५९
३) स्पीड डेमन्स दिल्ली (अलिस्टर युंग व केटलिन वुड) – ४२:१६.६०१
पोल-सिटर्स कोलकाता रॉयल टायगर्स (टॉम कॅनिंग व सोहिल शाह) यांना चाकाच्या तांत्रिक बिघाडामुळे माघार घ्यावी लागली.
या विजयासह गोवा एसेस जेए रेसिंगने स्पर्धेतील दहावा किताब जिंकत स्ट्रीट सर्किटवरील संघभावना आणि संयमाचे महत्त्व अधोरेखित केले.
चौथ्या फेरीनंतरची गुणतालिका
गोवा एसेस जेए रेसिंग – १४५ गुण
स्पीड डेमन्स दिल्ली – १४४ गुण
किच्चा’स किंग्स बेंगळुरू – ११९ गुण
कोलकाता रॉयल टायगर्स – १०६ गुण
हैदराबाद ब्लॅक बर्ड्स – ८५ गु
ण
चेन्नई टर्बो रायडर्स – ८४ गुण


