पुणे – स्काय डायव्हिंग सारख्या आव्हानात्मक खेळातच करिअर करायचे आहे असे मी ठरविल्यानंतर मला पालकांनी अनेक गोष्टींचा त्याग करून सतत सहकार्य केले त्यामुळेच मी आज जागतिक स्तरावर या क्रीडा प्रकारामध्ये अनेक विक्रम करू शकले असे पद्मश्री सन्मानित स्काय डायव्हिंगपटू शीतल महाजन यांनी सांगितले. क्रीडा क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी जे जे गुण लागतात त्या सर्व गुणांचा उपयोग आपल्याला दैनंदिन जीवन यशस्वी करण्यासाठी होतो असे महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे कार्यकारिणी सदस्य श्री. विनायक द्रविड यांनी सांगितले.
रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोड तर्फे शालेय खेळाडूंसाठी एक दिवसीय कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोड तर्फे क्रीडा विषयक कार्यशाळेचे पद्मश्री शीतल महाजन यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. ही कार्यशाळा मिलेनियम कर्वेनगर स्कूल, येथे घेण्यात आली. खेळांडूंची शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती, या क्षेत्रातील विविध संधी आणि वेगेवेगळ्या कौशल्याचा वापर खेळाडूंनी कसा करावा या बद्दल व्याख्याने झाली. या विषयी मार्गदर्शन करण्यासाठी प्रो कुमार उपाध्याय, श्री सिद्धार्थ देशमुख, श्रीमती गंधाली बापट-सिधये, श्री मोहित देशपांडे व श्रीमती पल्लवी चिपलकट्टी यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
महाजन यांनी सांगितले, “स्काय डायव्हिंग हा खर्चिक क्रीडा प्रकार आहे परंतु मला माझ्या आई-वडिलांकडून तसेच विवाह झाल्यानंतर पती व सासरच्या मंडळींनी नेहमीच भक्कम पाठिंबा दिला आहे त्यामुळेच अजूनही मी या क्षेत्रात कार्यरत आहे. हे करिअर करताना मी कायमच एकाग्रता, जिद्द व चिकाटी याला कठोर परिश्रमाची जोड दिली. त्याचा फायदा मला अनेक अशक्य आव्हानेही पार करता आली आहेत.”
श्री. द्रविड यांनी सांगितले, “क्रीडा क्षेत्र व व आपले जीवन मूल्य याचे अतूट नाते आहे. आत्मविश्वास, एकाग्रता, जिद्द, कोणतेही आव्हान स्वीकारण्याची इच्छाशक्ती, शारीरिक व मानसिक तंदुरुस्ती अशा अनेक गोष्टी आपल्याला क्रीडा क्षेत्राद्वारेच समजू शकतात. किंबहुना हीच जीवनमूल्ये असून त्याचा आपल्याला दैनंदिन जीवनामध्ये अनेक वेळा उपयोग होत असतो. त्यामुळेच क्रीडा क्षेत्रालाही अनन्य साधारण महत्व आहे.”
या कार्यशाळेत १४ शाळांमधील १४५ विद्यार्थी व १८ शारीरिक शिक्षण शिक्षक सहभागी झाले होते. या कार्यशाळेतील माहिती आणि मार्गदर्शन त्यांच्यासाठी खूप उपयुक्त ठरेल असे विद्यार्थी व शिक्षकांनी नमूद केले. RYLA (रोटरी यूथ लीडरशिप ॲवार्ड्स) या उपक्रमाद्वारे या कार्यशाळेचे आयोजन केले होते.
रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोडचे अध्यक्ष देवदत्त हंबर्डीकर, सेक्रेटरी अपर्णा क्षीरसागर आणि या कार्यक्रमाच्या संयोजिका स्वाती पाटील व क्लबचे इतर सदस्य यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. या कार्यशाळेसाठी जवाहरलाल दुगड अँड सन्स, मास्ट्रोटेक इनोवेशनस, एडिसोफ्ट टेक्नॉलॉजीस, पॉवरकेअर एनर्जी सोल्यूशन्स यांचे सहकार्य लाभले. खेळाडूंसाठी दरवर्षी ही कार्यशाळा रोटरी क्लब ऑफ पुणे टिळक रोड तर्फे आयोजित केली
जाते.


