शनिवार, २८ फेब्रुवारी रोजी होणार सौरभ बोथरांचे पुण्यातले पहिले जाहीर योग शिबिर
पुणे, फेब्रुवारी २५, २०२५: रोटरी इंटरनॅशनलच्या ‘आजार प्रतिबंध आणि उपचार’ (Disease Prevention and Treatment) या कार्यक्षेत्रांतर्गत, रोटरी क्लब ऑफ पुणे प्रिस्टिनतर्फे देण्यात येणारा ९ वा “प्रिस्टिन परिवर्तन पुरस्कार” सुप्रसिद्ध योगगुरू श्री. सौरभ बोथरा यांना जाहीर करण्यात आला आहे. हा पुरस्कार वितरण सोहळा येत्या शनिवारी, २८ फेब्रुवारी रोजी सकाळी ७:१५ वाजता कोथरूड येथील एमआयटी (MIT) मैदानात पार पडणार आहे.
पुरस्कार वितरणानंतर सौरभ बोथरा यांचे उपस्थित नागरिकांसाठी विशेष योग सत्र आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये सर्वांना सहज करता येतील अशी सोपी योगासने, श्वसनाचे व्यायाम आणि ध्यानाचे धडे दिले जातील. तसेच धावपळीच्या जीवनात दैनंदिन योगाची सवय जोपासणे का महत्त्वाचे आहे, यावरही ते विशेष मार्गदर्शन करणार आहेत.
या कार्यक्रमाची माहिती देताना रोटरी प्रिस्टिनच्या अध्यक्षा रोटेरियन सुनया आपटे म्हणाल्या की “सौरभ सर यांचे जगभरात १.७५ कोटींहून अधिक अनुयायी आहेत. विशेष म्हणजे पुण्यातील दीड लाखांहून अधिक नागरिक त्यांच्या योग पद्धतीचे अनुसरण करतात आणि सुमारे ३५,००० पुणेकर दररोज त्यांच्या ऑनलाइन सत्रात सहभागी होतात. या हजारो पुणेकर साधकांसाठी सौरभ सरांचे प्रत्यक्ष मार्गदर्शन मिळवणे ही एक मोठी पर्वणी ठरणार आहे”. कोथरूड येथील या सत्रासाठी ४००० पेक्षा जास्त लोक उपस्थित असतील असेही रोटेरीयन सुनया आपटे म्हणाल्या
सौरभ बोथरा यांनी योगासनांमध्ये अशा प्रकारे बदल केले आहेत की ज्यामुळे काही शारीरिक व्याधी असणारे किंवा शरीरात लवचिकता नसलेले लोकही ती आसने खुर्चीचा आधार घेऊन सहज करू शकतात व काही दिवसात व्यवस्थित करू शकतात. त्यांच्या या सोप्या तंत्राचा फायदा १२० हून अधिक देशांतील दिड कोटी लोकांना झाला आहे. दररोज ५ लाखांहून अधिक लोक त्यांच्यासोबत ऑनलाइन योगाभ्यास करतात. त्यांच्या या अतुलनीय कार्याची दखल घेत त्यांना अनेक ‘गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड्स’ने देखील सन्मानित
करण्यात आले आहे.


