पुणे : श्री शिवनेरी स्मारक समिती पुणे आणि जुन्नर शहर शिवजयंती उत्सव समिती तर्फे किल्ले शिवनेरी येथे फाल्गुन वद्य तृतीया म्हणजेच शिवतृतीयेला शुक्रवार, दिनांक ६ मार्च रोजी सकाळी ७ वाजता शिवजयंती उत्सव सुरु होणार आहे. शिवाई मातेस अभिषेक, छबिना मिरवणूक, शिवजन्मोत्सव, छत्रपती शिवरायांची शौर्यगाथा कार्यक्रम व पुरस्कार वितरण असे विविध कार्यक्रम गडावर होणार आहेत. उत्सवाचे यंदा ४७ वे वर्ष आहे, अशी माहिती समितीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे यांनी दिली.
कै.ग्राहकतीर्थ बिंदुमाधव जोशी आणि कै.शाहीर किसनराव हिंगे यांनी १९८० सालापासून शिवनेरी गडावर हा उत्सव सुरु केलेला आहे. तीच परंपरा पुढे चालू ठेवत शनिवारी श्री शिवाई मंदिर ते जन्मस्थळ अशी महाराजांच्या प्रतिमेची चांदीच्या शिवपालखीतून सवाद्य छबिना मिरवणूक निघेल. यावेळी राज्यसभेच्या खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, शिवव्याख्याते सुधीर गाडे, मानद पशु कल्याण अधिकारी व गोरक्षक शिवशंकर स्वामी उपस्थित राहणार आहेत.
अनेक शिवप्रेमी युवक-युवतींसह अनेक शाहीर देखील मिरवणुकीत सहभागी होणार आहे. जगद््गुरु तुकाराम महाराज यांचा प्रसाद म्हणून श्री क्षेत्र देहू संस्थानच्या वतीने श्री शिवछत्रपती शिवजयंती उत्सवानिमित्त दरवर्षी महावस्त्र पाठविले जाते. सज्जनगड येथील श्री समर्थ सेवा मंडळाच्यावतीने देखील महावस्त्र पाठविण्यात येणार आहे.
शुक्रवारी (दि.६) सकाळी ७ वाजता शिवजन्मस्थळावर शिवशंकर स्वामी यांच्या हस्ते शिवाई मातेस अभिषेक व महापूजा होईल. उत्सवात पालखी सोहळा व पारंपरिक पद्धतीने पंचक्रोशीतील महिला पाळणा म्हणून सकाळी ९ वाजता शिवजन्मोत्सव साजरा करतील. यावेळी रणरागिणी नारीशक्ती इंद्रायणीनगर भोसरी यांच्या तर्फे छत्रपती शिवरायांची शौर्यगाथा याचे सादरीकरण होणार आहे. या सोहळ्यानंतर ध्वजारोहण होऊन शिवकुंजावर शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनी तर्फे शिवजागर हा पोवाडे कार्यक्रम आणि त्यानंतर जाहीर धर्मविचार मंथन व धर्मसभा होणार आहे.
यावेळी उर्मिला थोरवे, सुनंदा मडके, शितल ठुसे, उज्वला लोहकरे, ज्योती शेलार, पुष्पा गोसावी यांना राजमाता जिजाऊ पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. मधुकर काजळे, रमेश कर्पे व शिवप्रेमींनी उत्सवाच्या आयोजनात सहभाग घेतला आहे. पंचक्रोशीतील पन्नास गावांमधून मोठया संख्येने शिवभक्त गडावर येणार असून महाराष्ट्रातील शिवप्रेमींनी मोठया संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन देखील करण्यात आले आहे.


