*पुणे*
अयोध्येतील श्रीराम जन्मभूमीवरील मंदिराच्या भव्य निर्मितीमध्ये छोटेसे काम करता आले, हे मी माझे परमभाग्य मानतो,अशी भावना विख्यात चित्रकार वासुदेव कामत यांनी व्यक्त केली.
भारतीय संस्कृती संवर्धक संस्थेतर्फे (मोतीबाग)आयोजित कार्यक्रमात वासुदेव कामत बोलत होते. श्रीराम मंदिर निर्मितीमधील योगदानाबद्दल कामत यांच्या विशेष सत्काराचे आयोजन ‘मोतीबाग’ कार्यालयात करण्यात आले होते. संस्थेचे अध्यक्ष राजीव जोशी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कसबा भागाचे संघचालक अँड प्रशांत यादव यांच्या हस्ते कामत यांना मानपत्र प्रदान करण्यात आले.
चित्र,संगीत,नृत्य,शिल्प आदी सर्व कला या भारतीय संस्कृतीमध्ये जीवनाशी निगडित आहेत.आपल्या आचरणातच कलेचा स्पर्श आहे.जे करायचे ते सुंदर,छान करायचे हा कलेचा संस्कार आहे,असे कामत म्हणाले.
श्रीराममंदिरामध्ये,श्रीरामांचे दर्शन घेताना भाविकांना रामायणही पहायला मिळावे,या उद्देशाने तेथे रामायणातील पंच्याऐंशी प्रसंग कोरण्यात आले आहेत. या कामात मिळालेली संधी हे परमभाग्य आहे,असेही कामत यांनी सांगितले.
चित्रामधून भावनिर्मीती झाली पाहिजे.चित्रात केवळ सौंदर्यनिर्मिती असू नये. भावनिर्मिती करणाऱ्या चित्रांचा परिणाम समाजावर होतो. चित्रकाराने सतत निरीक्षण आणि सतत रेखाचित्रण(स्केचिंग) करत राहिले पाहिजे.तोच त्याचा रियाज आहे.हे जेव्हा थांबेल तेव्हा त्याची सर्जनशीलताही थांबेल,असेही कामत म्हणाले.
‘मोतीबाग’ या कार्यालयामध्ये श्रीशिवराज्याभिषेक, श्रीरामपंचायतन,चाणक्यांचे गुरुकुल,विवेकानंद शिला स्मारक ही कामत यांची चित्रे प्रदर्शित करण्यात आली असल्याची माहिती राजीव जोशी यांनी प्रास्ताविकामध्ये दिली.संस्थेचे विश्वस्त राजू वालेकर यांनी सूत्रसंचालन केले.
*चौकट*
*वासुदेव कामत म्हणाले…*
संघाचा स्वयंसेवक किंवा कार्यकर्ता हीच माझी खरी ओळख.
श्रीराम मंदिराच्या निर्मितीमध्ये सेवेची फार मोठी संधी मिळाली याच भावनेने तेथे प्रत्येक जण काम करतो.
कलाकाराने समाजातच रहायला हवे. कारण तो समाजाचा एक घटक आहे.
कलेतून समाजप्रबोधन आवश्यक आहे, पण त्याने समाजमन दूषित होणार नाही,याचीही काळजी कलाकाराने घेतली पाहिजे.
—


