Sunday, August 23, 2026
Google search engine
HomeUncategorizedमानवतातीर्थाच्या अंगणात घुमणारा शांततेचा शड्डू : एक वैचारिक आणि सांस्कृतिक जागर

मानवतातीर्थाच्या अंगणात घुमणारा शांततेचा शड्डू : एक वैचारिक आणि सांस्कृतिक जागर

 

आजचे जग विज्ञानाच्या शिखरावर असले, तरी मानवी मने संकुचित होत चालली आहेत. आंतरराष्ट्रीय सीमांवर क्षेपणास्त्रे, ड्रोन यांचे हल्ले आणि अण्वस्त्रांच्या जीवघेण्या स्पर्धेत माणुसकीचा श्वास गुदमरत आहे. अशा अशांत आणि संघर्षाच्या कालखंडात, महाराष्ट्राच्या यज्ञ भूमी रामेश्वर मधून एक क्रांतीकारी विचार पुढे येत आहे. “युद्धाच्या जागी खेळ” आणि “विनाशाच्या जागी विकास” हा संदेश घेऊन, १० मार्च २०२६ रोजी रामेश्वर रुई येथील पावन भूमीत कुस्तीच्या भव्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. हे केवळ कुस्तीचे मैदान नाही, तर हा जागतिक शांततेचा एक ‘आखाडा’ आहे. पेशवे यांच्या नेतृत्वात स्वराज्याची लढाई ज्या क्षेत्री जिंकली गेली तिथेच स्वराज्य आणि स्वराष्ट्राच्या मातीतील कुस्तीचा विजयी नाद घुमणार आहे हा कपिलाषष्ठीचा संयोग आहे.

मानवता तीर्थाची प्रेरणा : विश्वधर्मी डॉ. विश्वनाथ कराड सरांचे स्वप्न

रामेश्वर रुई येथील ‘मानवतातीर्थ’ हे एक जागतिक एकमेवाद्वितीय भव्य भवन आहेच, त्याचबरोबर ते आधुनिक युगातील ‘शांतीचे मंदिर’ आहे. प्रसिद्ध शिक्षणतज्ज्ञ डॉ. विश्वनाथ कराड सर यांच्या अथांग प्रेरणेतून हे तीर्थक्षेत्र साकारले आहे. सरांचा असा ठाम विश्वास आहे की, “विज्ञानासोबतच अध्यात्माची आणि शरीरासोबतच मनाची जोड घातली, तरच विश्वशांती शक्य आहे.”

या भव्य वास्तूत पाय ठेवताच एका वेगळ्याच चैतन्याची अनुभूती येते. इथे केवळ दगड-धोंड्यांचे बांधकाम नाही, तर विचारांचे लेणे कोरले आहे. मानवी मूल्यांची जपणूक कशी करावी, याचे जिवंत उदाहरण म्हणजे मानवतातीर्थ. याच परिसरात कुस्ती स्पर्धांचे आयोजन करणे, ही सरांची दूरदृष्टी आहे; कारण कुस्ती हा खेळ केवळ बळाचा नाही, तर तो आत्मसंयम आणि शिस्तीचा महामेरू आहे.

कुस्ती : मातीतील खेळ आणि शारीरिक तंदुरुस्तीचे महत्त्व

महाराष्ट्राच्या संस्कृतीत कुस्तीला एक अनन्यसाधारण महत्त्व आहे. ‘कुस्ती’ हा शब्द ऐकताच अंगावर रोमांच उभे राहतात. लाल मातीचा सुगंध, हलगीचा कडकडाट आणि पैलवानांच्या अंगावरचे तेल-घामाचे थेंब हे चित्र डोळ्यासमोर उभे राहते.

भारतीय असणारा कुस्ती हा असा खेळ आहे जो शरीरातील प्रत्येक स्नायूला व्यायाम देतो. आजच्या ‘डिजिटल’ युगात, जिथे तरुणाई मोबाईल मध्ये हरवली आहे, तिथे कुस्तीचे मैदान त्यांना खऱ्या अर्थाने ‘मैदानी’ बनवते. कुस्तीत प्रतिस्पर्ध्याला चितपट करण्यापूर्वी स्वतःच्या भीतीवर विजय मिळवावा लागतो. ही मानसिक तंदुरुस्ती आजच्या धकाधकीच्या जीवनात अत्यंत आवश्यक आहे. कुस्ती हा केवळ रागाचा खेळ नाही, तर तो बुद्धीचा आणि संयमाचा खेळ आहे. डावपेच आखताना जो शांत राहतो, तोच ‘हिंदकेसरी’ किंवा ‘महाराष्ट्रकेसरी’ होतो.

स्पर्धेतून शांतता : एक नवा जागतिक दृष्टीकोन

अनेकांना प्रश्न पडू शकतो की, कुस्तीसारखा संघर्षाचा खेळ शांततेचा मार्ग कसा असू शकतो? याचे समर्पक उत्तर आहे की रणांगणावरील रक्तापेक्षा, क्रिडांगणावरील घाम अधिक पवित्र असतो. जेव्हा दोन मल्ल मैदानात एकमेकांशी भिडतात, तेव्हा त्यांच्यात द्वेष नसतो, तर ‘स्पर्धा’ असते. ही निकोप स्पर्धा मानवाला प्रगतीकडे नेते. आज रशिया-युक्रेन किंवा इस्रायल-पॅलेस्टाईन, इराण सारख्या युद्धांमध्ये जे रक्त सांडत आहे, त्याऐवजी जर राष्ट्र-राष्ट्रांमध्ये विकसित मानवतेच्या स्पर्धा झाल्या असत्या, तर जगाचा नकाशा वेगळा असता.

21व्या शतकातील स्पर्धात्मक वातावरणाची आवश्यकता:

शिस्तबद्ध पिढी: जे राष्ट्र शारीरिकदृष्ट्या सुदृढ असते, तेच मानसिकदृष्ट्या शांत राहू शकते.

ऊर्जेचे उदात्तीकरण: तरुणाईमध्ये मोठी ऊर्जा असते. जर ही ऊर्जा खेळाच्या मैदानात वळवली नाही, तर ती विघातक कृत्य आणि हिंसेकडे वळू शकते.

भावनिक एकात्मता: खेळाच्या मैदानात जात, धर्म, पंथ विसरले जातात. तिथे फक्त ‘खेळाडू’ उरतो. हाच भाव विश्वबंधुत्वाचा पाया आहे.

 

रामेश्वर रुई : सांस्कृतिक आणि आध्यात्मिक संगम

१० मार्च २०२६ हा दिवस यज्ञभूमी रामेश्वरच्या इतिहासात सुवर्ण अक्षरांनी लिहिला जाईल. मानवतातीर्थाच्या परिसरात जेव्हा पैलवानांचे शड्डू घुमतील, तेव्हा तो केवळ नाद नसेल, तर ती युद्धाला दिलेली एक चपराक असेल. डॉ. कराड सरांच्या संकल्पनेतून साकारलेले हे आयोजन जगाला सांगेल की, भारताची संस्कृती ‘युद्ध’ नाही, तर ‘बुद्ध’ आणि ‘कुस्ती’ मानणारी आहे. विश्वात्मक राष्ट्रगान देणाऱ्या तत्त्वज्ञ संत श्री ज्ञानेश्वर माऊलींचे पसायदान ते भगवान गौतम बुद्धांचे पंचशील असा हा ज्ञानविज्ञान अध्यात्माचा प्रवास खेळाच्या मैदानातूनच जातो निश्चयाने या कुस्ती स्पर्धेचे आयोजन केलेले आहे.

भविष्यातील शांतीचा आखाडा

मानवतातीर्थ भवन येथील ही कुस्ती स्पर्धा केवळ एक खेळ नाही, तर ते एक ‘आंदोलन’ आहे—आरोग्यासाठी, संस्कृतीसाठी आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे जागतिक शांततेसाठी. युद्धाच्या वावटळीत शांततेची ज्योत पेटवून ठेवण्याचे काम ज्ञानर्षी विश्वधर्मी प्रा. डॉ. विश्वनाथ कराड सर आणि त्यांचे सहकारी या स्पर्धेच्या माध्यमातून करत आहेत.

चला तर मग, १० मार्च रोजी रामेश्वर रुईच्या या पवित्र भवनातील स्पर्धेत आपणही सहभागी होऊया. चला, आपल्या शरीराला तंदुरुस्त बनवूया आणि मनाला वैश्विक शांततेसाठी सज्ज करूया. कारण जेव्हा खेळ जिंकतो, तेव्हा माणुसकी कधीच हारत नाही!

“जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मानवता!”

 

डॉ रत्नदीप जोशी

कुलसचिव, माईर्स एमआयटी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन्स पुणे भारत.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments