पुणे: आदिश जैन फाऊंडेशनच्या वतीने सामाजिक कार्य आणि साहित्य यासाठी समर्पित असलेला कार्यगौरव हा २०२६ सालचा पुरस्कार ज्येष्ठ समाजसेविका आणि गझलकारा ममताताई सपकाळ यांना प्रदान करण्यात आला. यावेळी ज्येष्ठ साहित्यिक म. भा. चव्हाण गझलकार सुधीर मुळीक तसेच ॲडव्होकेट व समाजसेविका प्रार्थना सदावर्ते, संस्थेच्या अध्यक्षा मृणाल जैन उपस्थित होते. सन्मानचिन्ह, मानपत्र, शाल आणि रोख रक्कम देऊन ममता सपकाळ यांचा सन्मान करण्यात आला.
ज्येष्ठ साहित्यिक म. भा. चव्हाण म्हणाले, स्त्रियांचे पूजन करून अघोरी प्रकार केले जात असतील, तर ते किती वाईट आहे, याचा समाजाने विचार करणे गरजेचे आहे. स्त्रियांना आरक्षण दिले नाही तरी चालेल; मात्र त्यांना संरक्षण देणे अत्यावश्यक आहे. स्त्रियांनी सार्वजनिक ठिकाणी निर्भयता बाळगली पाहिजे आणि एकमेकींना सहकार्य केले पाहिजे. समाज अजूनही स्त्रियांप्रती संवेदनशील झालेला नाही. एखाद्या धर्मग्रंथात स्त्रियांचा अवमान असेल, तर तो इंद्रायणी नदीत बुडवण्याऐवजी गटारात फेकला पाहिजे. रडायला नको, लढायला शिकवा. पुरुषांकडून आता क्रांतीची अपेक्षा ठेवण्यात अर्थ नाही, असे मत यांनी व्यक्त केले.
संस्थेच्या अध्यक्षा मृणाल जैन यांनी संस्थेची उद्दिष्टे स्पष्ट करत, मागील सहा महिन्यांतील कामगिरीचा आढावा घेतला. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. त्यानंतर वैष्णवी पाटांगणकर यांनी सरस्वती वंदना सादर केली. नीलिमा फाटक यांनी सूत्रसंचालन केले, तर प्रार्थना सदावर्ते यांनी मानपत्राचे वाचन केले.
यानंतर दुसऱ्या सत्रात महिला गझल मुशायरा रंगला. प्रभा सोनवणे, सुनीती लिमये, सुजाता पवार, स्वाती यादव, वैशाली माळी आणि नीलिमा फाटक या ज्येष्ठ गझलकारांनी आपल्या सादरीकरणाने उपस्थितांची मनं जिंकली. ममताताई सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या मुशायऱ्याचे सूत्रसंचालन राजश्री सोले यांनी केले.
कार्यक्रमाला ज्येष्ठ कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे, स्वाती सामक, प्रमोद खराडे, सुरेश शेठ आदी मान्यवर उपस्थित होते. शेवटी वैष्णवी पाटांगणकर यांनी आभार प्रदर्शन केले.
—


