Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedहिराबाई कावसजी जहांगीर मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (एचसीजेएमआरआय) आणि बजाज फिनसर्व्ह सीएसआर यांच्यातर्फे...

हिराबाई कावसजी जहांगीर मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (एचसीजेएमआरआय) आणि बजाज फिनसर्व्ह सीएसआर यांच्यातर्फे पुण्यात टाइप-१ डायबेटीससाठी पहिले सर्वसमावेशक ‘सेंटर ऑफ एक्सलन्स’ सुरू

आधुनिक आणि उच्च दर्जाच्या सुविधांनी सुसज्ज असलेले हे केंद्र, तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमसह, मुलांच्या

डायबेटीससंबंधित सर्व गरजांसाठी संपूर्ण उपचार देण्यासाठी सुसज्ज

पुणे, २ एप्रिल २०२६ : हिराबाई कावसजी जहांगीर मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (एचसीजेएमआरआय)
आणि बजाज फिनसर्व्ह सीएसआर यांनी टाइप-१ डायबेटीससाठी ‘स्वीटलिंग्स सेंटर ऑफ एक्सलन्स’
संयुक्तपणे सुरू केले आहे. टाइप-१ डायबेटीस हा मधुमेहाचा प्रकार आहे. तो बहुतांश वेळा लहान मुलांमध्ये
किंवा तरुणांमध्ये आढळतो. पुण्यात जहांगीर हॉस्पिटलसमोर असलेल्या सोहराब हॉल परिसरात हे विशेष
केंद्र उभारण्यात आले आहे. मुलांच्या उपचारांमध्ये असलेली एक महत्त्वाची कमतरता भरून काढण्यासाठी
आणि या आजाराचे सर्वांगीण (पूर्ण) व्यवस्थापन करण्यासाठी हे केंद्र तयार करण्यात आले आहे.
टाइप-१ डायबेटीस हा मुलांमध्ये होणारा एक ऑटोइम्यून आजार आहे. यात शरीर इन्सुलिन तयार करू
शकत नाही, त्यामुळे रोज इन्सुलिन घेणे जगण्यासाठी खूप गरजेचे असते. भारतात या आजाराने प्रभावित
होणाऱ्या मुलांची संख्या हळूहळू वाढत आहे. फक्त पुणे आणि पीसीएमसी भागातच २० वर्षांखालील २०
हजारांहून अधिक मुले आणि तरुण या आजारासोबत जगत असल्याचा अंदाज आहे.
‘बजाज फिनसर्व्ह’च्या सीएसआर सुकाणू समितीच्या अध्यक्षा शेफाली बजाज या संदर्भात म्हणाल्या,
“मुलांमध्ये टाइप-१ डायबेटीसचे प्रमाण वाढत असताना, सातत्यपूर्ण आणि पूर्ण उपचारांची सुविधा
अजूनही मर्यादित आहे. ‘एचसीजेएमआरआय’सोबत काम करताना आम्हाला काही महत्त्वाच्या अडचणी
जाणवल्या. अनेक गरजू मुलांना उपचार मिळणे कठीण होत होते. या समस्येवर उपाय म्हणून ‘स्वीटलिंग्स
सेंटर ऑफ एक्सलन्स’ सुरू करण्यात आले आहे. या उपक्रमांतर्गत गरजू मुलांच्या उपचारांना कंपनीकडून
मदत दिली जाईल. पुण्यात मुलांच्या आरोग्यविषयक सुविधा बळकट करण्यासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल
आहे.”
पुण्याच्या ‘जहांगीर हॉस्पिटल’चे अध्यक्ष व ‘एचसीजेएमआरआय’चे प्रमुख जहांगीर एच.सी. जहांगीर
म्हणाले, “टाइप-१ डायबेटीस असलेल्या मुलांना सर्वसमावेशक आणि सहानुभूतीपूर्ण उपचार देण्याच्या
आमच्या कटिबद्धतेचे स्वीटलिंग्स सेंटर ऑफ एक्सलन्स हे प्रतीक आहे. जहांगीर हॉस्पिटलच्या प्रामाणिक
आणि रुग्णकेंद्री सेवांच्या परंपरेला पुढे नेत, या केंद्रात तज्ज्ञांची मदत आणि विविध सुविधा एकाच ठिकाणी
उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यातून मुले आणि त्यांच्या कुटुंबांचे जीवन अधिक चांगले होईल.”
जहांगीर हॉस्पिटलमधील हिराबाई कावसजी जहांगीर मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूट (एचसीजेएमआरआय)
या संस्थेच्या उपसंचालिका व बालरोगतज्ज्ञ डॉ. अनुराधा खाडिलकर म्हणाल्या, “मुलांमध्ये टाइप-१
डायबेटीस हा केवळ वैद्यकीय आजार नाही, तर तो त्यांच्या रोजच्या आयुष्याच्या प्रत्येक भागावर परिणाम
करणारा एक मोठा प्रश्न आहे. शाळा, खेळ, भाव-भावना आणि कुटुंबातील दिनक्रम यांवरही त्याचा प्रभाव

पडत असतो. ‘स्वीटलिंग्स’मध्ये आमचा उद्देश असा आहे की, उपचारांसोबतच योग्य माहिती, भावनिक
आधार आणि रोजच्या आयुष्यात उपयोगी मार्गदर्शन देऊन मुले आणि त्यांच्या कुटुंबांना आत्मविश्वासाने
जगता येईल.”
मागील सोळा वर्षांपासून ‘एचसीजेएमआरआय’चा ‘स्वीटलिंग्स’ हा उपक्रम जहांगीर हॉस्पिटलमध्ये टाइप-
१ डायबेटीस असलेल्या मुलांना उपचार देत आहे. मात्र, मर्यादित सुविधांमुळे हा कार्यक्रम आठवड्यातून
फक्त एकदाच चालत होता. काही अडचणी असूनही या उपक्रमाने ८००हून अधिक गरजू (आर्थिकदृष्ट्या
दुर्बल) मुलांना मदत केली आहे. पण पायाभूत सुविधांची कमतरता असल्यामुळे कर्मचारी व्यवस्थापनात
अडचणी येत होत्या आणि वाढत्या गरजेनुसार सेवा देणे कठीण होत होते.
हीच कमतरता भरून काढण्यासाठी नवीन ‘स्वीटलिंग्स सेंटर ऑफ एक्सलन्स’ सुरू करण्यात आले आहे.
‘बजाज फिनसर्व्ह’च्या सीएसआर कार्यक्रमांतर्गत या केंद्राला मदत मिळाली आहे. या सुधारित केंद्रात
वैद्यकीय सल्ल्यासाठी स्वतंत्र कक्ष (कन्सल्टेशन रूम्स), अधिक चांगली वैद्यकीय उपकरणे आणि सुधारलेली
प्रशासकीय व्यवस्था उपलब्ध आहे. त्यामुळे आता अधिक मुलांना (गरजू तसेच स्वतः खर्च करणाऱ्या
रुग्णांना) सेवा देणे शक्य होणार आहे. आता हे केंद्र आठवड्यातून सहा दिवस चालणार असून, उपचारांची
उपलब्धता मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.
मुलांसाठी अधिक अनुकूल आणि आरामदायी वातावरणात हे केंद्र आता अधिक व्यवस्थित आणि विस्तारित
पद्धतीने, आठवड्यातील अनेक दिवस सेवा देणार आहे. येथे वैद्यकीय सल्ला, इन्सुलिनची मदत आणि
आहाराविषयी मार्गदर्शन अशा सर्व सेवा दिल्या जातील. २४ तास चालणारी हेल्पलाइन आणि शाळांमधील
जनजागृती उपक्रम यांच्या माध्यमातून येथील एंडोक्रिनोलॉजिस्ट (हार्मोन तज्ज्ञ), आहारतज्ज्ञ आणि
मानसोपचारतज्ज्ञ अशा विविध तज्ज्ञांचा चमू मुलांना सतत आणि सर्वांगीण मदत करेल.
शहरी झोपडपट्ट्या आणि रांजणगावसारख्या ग्रामीण भागातील वंचित लोकांसाठी सामाजिक
जबाबदारीने संशोधन आणि आरोग्य प्रकल्प राबवण्याचा एचसीजेएमआरआय या संस्थेला मोठा अनुभव
आहे. तिच्या कौशल्याला या भागीदारीतून मोठे बळ मिळणार आहे. ‘बजाज फिनसर्व्ह’साठी हा प्रकल्प हा
सीएसआर उपक्रमातील बालआरोग्य या व्यापक उद्दिष्टाचा महत्त्वाचा भाग आहे. विशेषतः पुण्यात
आरोग्यसेवेची पायाभूत सुविधा मजबूत करण्यावर कंपनीचा यात मुख्य भर आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments