Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedनिवडणूक आयोगाकडून विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहीम लवकरच; पूर्वतयारी बैठकीत प्रक्रियेचे सविस्तर...

निवडणूक आयोगाकडून विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) मोहीम लवकरच; पूर्वतयारी बैठकीत प्रक्रियेचे सविस्तर मार्गदर्शन

पुणे, दि. 2 एप्रिल (जिमाका वृत्तसेवा) – भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या विशेष सखोल पुनरीक्षण (Special Intensive Revision – SIR) मोहिमेच्या पार्श्वभूमीवर आज जिल्हाधिकारी कार्यालयात पूर्वतयारी बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र डुडी यांनी संपूर्ण प्रक्रियेबाबत मार्गदर्शन केले.

बैठकीस विविध भाजप, एन.सी.पी ( शरद पवार ), एन.पी.पी, आय.एस.एल.ए.एम राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते. सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रण देण्यात आले असले, तरी प्रत्यक्षात मोजकेच पदाधिकारी उपस्थित राहिले असून बहुतांश प्रतिनिधी अनुपस्थित होते.

उपजिल्हा निवडणूक अधिकारी मिनल कळसकर यांनी सादरीकरणाद्वारे एसआयआर प्रक्रियेचे सविस्तर स्पष्टीकरण केले. त्यांनी सांगितले की, विशेष सखोल पुनरीक्षण ही निवडणूक आयोगाची अत्यंत महत्त्वपूर्ण प्रक्रिया असून यामध्ये मतदार याद्यांचे बारकाईने पुनरावलोकन केले जाते. अपात्र, मृत अथवा स्थलांतरित मतदारांची नावे वगळणे तसेच पात्र नवीन मतदारांची नोंद करणे हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट आहे.

या प्रक्रियेत घरभेटीद्वारे प्रत्यक्ष पडताळणी (डोअर-टू-डोअर व्हेरिफिकेशन) करण्यात येणार आहे. संबंधित कर्मचारी मतदारांच्या घरी जाऊन माहितीची खातरजमा करतील. तसेच नागरिकांना फॉर्म 6 (नवीन नोंदणी), फॉर्म 7 (नाव वगळणे) आणि फॉर्म ८ (दुरुस्ती) यांद्वारे आवश्यक बदल करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.

याशिवाय, सध्या मतदार यादीत असलेल्या मतदारांनी त्यांच्या नावाची 2002 सालातील मतदार यादीतील नोंद (राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ व भाग क्रमांक) उपलब्ध असल्यास ती माहिती संबंधित बीएलओ (BLO) यांना द्यावी. त्यामुळे बीएलओ त्यांच्या मोबाईल ॲपद्वारे अशा मतदारांचे मॅपिंग सुलभपणे करू शकतील. मतदारांना 2002 मधील माहिती भारत निवडणूक आयोगाच्या voters.eci.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. तसेच संबंधित भागातील बीएलओ यांची नावे व संपर्क क्रमांक जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे यांच्या संकेतस्थळावरही उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

श्रीमती कळसकर यांनी पुढे सांगितले की, जिल्ह्यातील सर्व राजकीय पक्षांना बीएलओ यांची नावे, संपर्क क्रमांक आणि मतदान केंद्रनिहाय माहितीची एक्सेल शीट उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यानुसार प्रत्येक पक्षाने प्रत्येक मतदान केंद्रासाठी किमान एक बीएलए (BLA) नियुक्त करावा, जेणेकरून अनुपलब्ध मतदारांचा शोध घेण्यासाठी बीएलए, बीएलओ यांना सहकार्य करू शकतील.

जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी मार्गदर्शन करताना नमूद केले की, आगामी एसआयआर मोहिमेची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करणे आवश्यक आहे. राजकीय पक्षांनीही आपल्या स्तरावर जनजागृती करून या प्रक्रियेला सक्रिय सहकार्य करावे, असे त्यांनी आवाहन केले.

बैठकीदरम्यान उपस्थितांनी विविध सूचना मांडल्या असून त्यावर संबंधित अधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले. आगामी एसआयआर मोहिमेच्या दृष्टीने ही पूर्वतयारी बैठक महत्त्वपूर्ण ठरली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments