Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedभारतीय संस्कृतीत तीर्थाटनाला महत्त्व – डॉ. सुधांशु त्रिवेदी*

भारतीय संस्कृतीत तीर्थाटनाला महत्त्व – डॉ. सुधांशु त्रिवेदी*

पुणे -भारतीय संस्कृतीत पाश्चिमात्य संकल्पनेतील ‘पर्यटना’पेक्षा ‘तीर्थाटना’ला अधिक महत्त्व आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेले किल्ले हे केवळ दगडधोंड्यांच्या वास्तू नसून ते आपल्या संस्कृतीचे चैतन्यमय तीर्थाटन आहेत,” असे प्रतिपादन खासदार डॉ. सुधांशू त्रिवेदी यांनी केले.
पुणे – श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाच्या वतीने चैत्र पौर्णिमा, हनुमान जयंती, शके १९४८, दि. १ आणि २ एप्रिल २०२६ रोजी किल्ले रायगडावर ३४६वा शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी खासदार आणि भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशु त्रिवेदी यांनी मनोगत व्यक्त केले.
त्रिवेदी म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराजांचे प्रशासकीय नियोजन उत्तम होते.
त्यांच्या अष्टप्रधानांच्या निवडीमागे सुद्धा शास्त्रीय आणि सांस्कृतिक महत्व होते. गोव्याच्या पोर्तुगीज गव्हर्नरने आपल्या मुख्यालयाला कळविले की, शिवाजीचे आरमार एवढं प्रबळ आहे की पोर्तुगीज आरमार त्यासमोर तग धरू शकणार नाही. इराणच्या बादशहाने औरंगजेबास एक पत्र पाठवले की, तु कसला आलमगीर? (विश्वाचे बादशाह) तुला तर एका काफीराने जेर करून ठेवला आहे. आपल्या संस्कृतीत पर्यटनाचे नाही तर तीर्थाटनाचे अधिक महत्त्व आहे आणि आपले किल्लेसुद्धा तीर्थाटनाचा भाग आहेत. इतर धर्मांमध्ये त्यांच्या यात्रांमध्ये इतर धर्मियांना प्रवेश मिळवायचा असेल तर धर्म बदलून प्रवेश मिळतो. प्रयागला कुंभमेळ्यात ५० लाख विदेशी येऊन गेले पण आपण कोणालाही धर्म बदलायला सांगितला नाही. पाश्चिमात्य संस्कृतीत आर्थिक, सांस्कृतिक आणि लौकिक प्रसिद्धीला महत्व आहे परंतु आपल्याकडे नागा साधू गुप्तपणे राहतात, फक्त अंगाला भस्म लावतात, थेट कुंभमेळ्याला प्रगट होतात पण त्यांना कशाचीही अपेक्षा नसते. मागील तीस वर्षात रायगडावर रोपवे झाला आणि त्यानंतर रायगडाचा विकास झाला. त्याच तीस वर्षात समर्थ नेतृत्व मिळाल्याने आपल्या देशाचाही विकास झाला आहे. असेही ते म्हणाले.

यंदा शिवरायांच्या समाधी जीर्णोद्धाराचे शताब्दी वर्ष सुरू आहे. त्यानिमित्त शिवपुण्यतिथीच्या आदल्या दिवशी बुधवार दि. ०१ एप्रिल रोजी राजसभेत दुर्गसंवर्धन परिषद आयोजित केली होती. त्यामधे दुर्ग अभ्यासक प्र. के. घाणेकर,डॉ.सचिन जोशी, महाराष्ट्र राज्य पुरातत्त्व विभागाच्या अधिकारी गौतमी चौधरी यांची सत्रे झाली. परिषदेच्या समारोप प्रसंगी श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाने निर्माण केलेली श्री शिवसमाधी जीर्णोध्दार – संकल्प आणि समर्पण ही ध्वनिचित्रफित सादर केली.मान्यवरांच्या मुलाखती, ‘ही रात्र शाहिरांची’ या कार्यक्रमात शाहीर विक्रम अवचिते यांची शाहिरी तसेच जगदीश्वर मंदिरात कीर्तन आयोजित करण्यात आले होते.
गुरुवारी, हनुमान जयंतीची पूजा, जगदीश्वराची पूजा, महाराजांच्या समाधीची पूजा करण्यात आली. राजसभेतील मुख्य कार्यक्रमात ज्येष्ठ दुर्ग अभ्यासक श्री आनंद पाळंदे यांना पंधरावा ‘श्री शिवपुण्यस्मृती रायगड पुरस्कार’ प्रदान करण्यात आला. नागपूरकर भोसले सरदारांचे वंशज मुधोजीराजे भोसले तसेच निवृत्त ब्रिगेडियर संग्राम मोहिते यांना यावेळी सन्मानित करण्यात आले. मंडळातर्फे शिवराय मुद्रा स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. मंडळाचे अध्यक्ष रघुजीराजे आंग्रे यांनी प्रास्ताविक केले. रायगड जिल्हा परिषद अध्यक्ष मंगेश वाकडीकर आणि मंत्री भरतशेठ गोगावले यांचीही भाषणे झाली. कार्यवाह सुधीर थोरात यांनी आभार मानले तसेच डॉ. संदीप महिंद यांच्या शिववंदनेने कार्यक्रमाचा समारोप झाला.
मुख्य कार्यक्रमानंतर शिवरायांच्या पालखीची मिरवणूक सिंहासनापासून समाधीस्थानी गेली. तिथे रायगड पोलिसांतर्फे बंदुकीच्या फैरी झाडून आणि घोषाचे वादन करून शिवरायांना मानवंदना देण्यात आली. केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या प्रयत्नातून महाराजांची समाधी, जगदीश्वर मंदिर तसेच सिंहासनावर हेलिकॉप्टरमधून पुष्पवृष्टी करण्यात आली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments