Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedनिवडणूक प्रचाराच्या जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण आवश्यक- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी*

निवडणूक प्रचाराच्या जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण आवश्यक- जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी*

पुणे, दि. ४: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समिती (मीडिया सर्टीफीकेशन अॅण्ड मॉनिटरिंग कमिटी) गठित करण्यात आली आहे. बारामती विधानसभा पोट निवडणूकीच्या अनुषंगाने निवडणूक प्रचाराच्या जाहिरातींचे पूर्व प्रमाणीकरण या समितीकडून करुन घेणे आवश्यक आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी तसेच समितीचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी कळविले आहे.

उमेदवारांमार्फत प्रचारासाठी इलेक्ट्रॉनिक, समाज माध्यमे (सोशल मीडिया) तसेच फिरत्या एलईडी व्हॅन, ऑटो रिक्षा आदी बाह्यमाध्यमांवरून देण्यात येणाऱ्या श्राव्य (ऑडिओ), दृकश्राव्य (ऑडिओ-व्हीज्युअल) जाहिरांतीचे पूर्व प्रमाणीकरण या समितीमार्फत केले जाते. तर मुद्रीत माध्यमात (प्रिंट मीडिया) मतदानाच्या दिवशी किंवा मतदानाच्या एक दिवस अगोदर प्रकाशित करावयाच्या जाहिराती समितीकडून पूर्व प्रमाणीकरण करून घेणे बंधनकारक आहे. माध्यम संनियंत्रण आणि प्रमाणीकरण समितीचे कामकाज जिल्हा माहिती कार्यालय, नवीन मध्यवर्ती इमारत, तळमजला, ससून रुग्णालयासमोर, पुणे- ४११००१ येथून चालणार असून दूरध्वनी क्रमांक ०२०-२६१२१३०७ असा आहे.

*माध्यम प्रमाणीकरण व संनियंत्रण समितीचे कामकाज:*
टीव्ही चॅनेल, रेडिओ, एफएम, सिनेमागृह, सोशल मिडीया, एसएमएस, दूरध्वनीवरील रेकॉर्डेड व्हॉईस कॉलद्वारे करण्यात येणाऱ्या प्रचाराच्या जाहिराती (आऊटबाऊंड डायलिंग– ओबीडी), वृत्तपत्रांच्या इ-आवृत्तीतील जाहिराती, सार्वजनिक ठिकाणी दाखवायच्या दृक-श्राव्य जाहिरातींसाठी प्रसारणपूर्व प्रमाणपत्र बंधनकारक आहे. त्यासाठी उमेदवार किंवा त्यांच्या प्रतिनिधींनी विहीत नमुन्यातील इंग्रजी किंवा मराठी भाषेतील अर्ज दोन प्रतींमध्ये आवश्यक माहिती भरुन सादर करण्यात यावा. अर्जासोबत दोन सीडी/पेनड्राईव्ह (सीडीमधील गीत, संवाद, घोषणा यांच्या टंकलिखीत मजकुराच्या दोन प्रती – ट्रान्सस्क्रीपट) सादर करणे आवश्यक आहे. राजकीय पक्षांच्या जाहिराती राज्यस्तरावरील समितीकडून प्रमाणित केल्या जातात.

प्रत्येक ऑडिओ जाहिरात किंवा ऑडिओ-व्हीज्युअल जाहिरात ही स्वतंत्र असावी. एकाच सीडी, पेनड्राईव्हमध्ये एकापेक्षा अधिक जाहिराती असू नयेत. अर्जदाराचे पूर्ण नाव, पत्ता, जाहिरात कोणत्या उमेदवारासाठी आहे. त्याचे नाव, पक्षाचे नाव, जाहिरात कुठे दाखवणार, जाहिरातीचे शीर्षक, जाहिरात निर्मितीचा खर्च, जाहिरातीतील भाषा याचा स्पष्ट उल्लेख असावा. सीडीमधील मजकूर प्रसारण योग्य असावा. इतरांची बदनामी करणारा, जाती-जातींमध्ये, धार्मिक तेढ निर्माण करणारा नसावा. देशविघातक कृत्याला प्रोत्साहन देणारा नसावा. समितीमार्फत वृत्तपत्र आणि दूरचित्रवाणी वाहिन्यांवरील पेड न्यूजवर लक्ष ठेवण्यात येत आहे.

*जिल्हा माहिती कार्यालयात माध्यम कक्ष कार्यान्वित*

बारामती विधानसभा सार्वत्रिक निवडणूकच्या अनुषंगाने जिल्हा माहिती कार्यालयात माध्यम कक्ष (मीडिया सेल), नवीन प्रशासकीय इमारत, तळमजला, पुणे या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आला असून त्याचा दूरध्वनी क्रमांक ०२०- २६१२१३०७ असा आहे. या ठिकाणाहून माध्यमांना निवडणुकीच्या अनुषंगाने माहिती उपलब्ध करुन दिली जात आहे. इलेक्ट्रॉनिक माध्यम, समाज माध्यमांचे संनियंत्रण येथून होत आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments