पुणे,८ एप्रिल २०२६ : खोल समुद्रातील निसर्गाचे सौंदर्य अवर्णनीय आहे आणि त्याच्याच प्रत्यय सागरी संघटनांनी आयोजित केलेल्या प्रदर्शनात आला आहे असे मत प्रसिद्ध प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर यांनी व्यक्त केले . सागरी संघटना असलेल्या कंपनी ऑफ मास्टर मॅरिनर्स ऑफ इंडिया (सीएमएमआय), इन्स्टिट्यूट ऑफ मरीन इंजिनियर्स इंडिया (आयएमईआय) आणि इंडियन मॅरिटाइम फाउंडेशन (आयएमएफ) यांच्या संयुक्त विद्यमाने, तसेच महा मॅरिनर्स असोसिएशन (एमएमए) आणि अमेझेंग नॉटिकल असोसिएशन (एएनए) यांच्या सहकार्याने कला रसिक आणि सागरी जीवनाची आवड असणाऱ्यांसाठी जंगली महाराज रोडवरील बालगंधर्व कलादालन येथे ५ ते ७ एप्रिल २०२६ दरम्यान पुण्यात एक वैशिष्ट्यपूर्ण प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचा बक्षीस वितरण समारंभाला प्रमुख पाहुणे प्रसिद्ध औद्योगिक प्रकाशचित्रकार सतीश पाकणीकर उपस्थित होते. या समारंभाला कॅप्टन मिलिंद फडणीस अध्यक्ष,सीएमएमआय पुणे शाखा,कॅप्टन किरण जोशी वॉर्डन , सीएमएमआय, गिरीश कोटवाल (अध्यक्ष,आयएमईआय), संजीव ओगले अध्यक्ष, एएनए आणि परीक्षक रवींद्र प्रभुणे व संदीप अवधानी उपस्थित होते.
यावेळी बोलताना सतीश पाकणीकर म्हणाले की,या प्रदर्शनात चित्रकला व प्रकाश चित्रकलेचा सुंदर मिलाफ बघायला मिळाला. या प्रदर्शनातून समुद्राची विविध रूपे पाहायला मिळाली.जमिनीवरून आपण समुद्राकडे पाहताना समुद्राच्या उसळणाऱ्या लाटा, उगवणारा व मावळणारा सूर्य अशी विविध रूपे पाहतो,मात्र या प्रदर्शनाच्या माध्यमातून खोल समुद्राची रूपे प्रदर्शित केली आहेत ती अवर्णनीय आहेत.
‘होरायझन्स अँड सीस्केप्स’ या संकल्पनेवर आधारित या प्रदर्शनात सुमारे १२५ कलाकृतींचा समावेश असून, त्यात चित्रे आणि छायाचित्रांचा समावेश होता. छायाचित्र प्रकारात अमोद लोकुरकर यांनी प्रथम क्रमांक मिळविला. किरण जोशी यांना द्वितीय क्रमांक तर भाग्यश्री ओगले आणि रवि दामले यांना विभागून तृतीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले.
चित्रे (पेंटिंग्स) प्रकारात रत्नाकर कर्वे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. योगिनी आणि शलाका निखिल यांना विभागून द्वितीय क्रमांक तर उदय प्रसाद व गोविंदराजन कृष्णस्वामी यांना विभागून तृतीय क्रमांकाचे बक्षीस देण्यात आले. यावेळी भार्गवी वर्टी या बालचित्रकाराला देखील बक्षीस देण्यात आले.
या उपक्रमाचा उद्देश सागरी संस्कृती, सर्जनशीलता आणि खलाश्यांच्या वैयक्तिक अनुभव लोकांपर्यंत पोहचवणे हा होता. दरवर्षी ५ एप्रिल रोजी नॅशनल मेरीटाईम डे साजरा करण्यात येतो. याचे अवचित्त साधून हा उपक्रम आयोजित करण्यात आला आला आहे
यावेळी मर्चंट नेव्ही करीअर याबद्दल माहिती व मार्गदर्शन करण्यात आले.
कॅप्टन किरण जोशी यांनी उपस्थितांचे स्वागत केले तर संजीव ओगले यांनी आभार मानले.


