Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedविचार प्रबोधन पर्व व सामाजिक समता महासप्ताह २०२६ अंतर्गत मोफत आरोग्य व...

विचार प्रबोधन पर्व व सामाजिक समता महासप्ताह २०२६ अंतर्गत मोफत आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन

आरोग्य तपासणी, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन, आभा आणि आयुष्यमान कार्ड नोंदणी व मोफत औषधोपचार दिले जाणार

पिंपरी, दि. ११ एप्रिल २०२६: पिंपरी चिंचवड महानगरपालिकेतर्फे दिनांक ११ एप्रिल ते १७ एप्रिल दरम्यान ‘विचार प्रबोधन पर्व व सामाजिक समता महासप्ताह’ चे आयोजन करण्यात आले आहे. या पर्वानिमित्त नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेत १२ एप्रिल रोजी ‘मोफत आरोग्य महाशिबिर’ तसेच १२, १३ आणि १४ एप्रिल दरम्यान रक्तदान शिबिराचे आयोजन क्रांतिसूर्य महात्मा जोतीराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ (भीमसृष्टी), पिंपरी येथे करण्यात आले आहे.

या शिबिरात नागरिकांना सर्व रोगांवर तज्ज्ञांचे मार्गदर्शन व विविध तपासण्यांची सुविधा उपलब्ध असणार आहे. यासोबतच आभा आणि आयुष्मान कार्ड नोंदणीची सुविधा व आवश्यक औषधांचे मोफत वितरण करण्यात येणार आहे.

‘विचार प्रबोधन पर्व व सामाजिक समता सप्ताह’ अंतर्गत सांस्कृतिक कार्यक्रमांसोबतच आरोग्यविषयक उपक्रमांचा समावेश करून नागरिकांच्या सर्वांगीण विकासाचा उद्देश साध्य करण्यात येत आहे.

….

कोट:

पिंपरी चिंचवड महानगरपालिका नागरिकांच्या उत्तम आरोग्यासाठी नेहमीच विविध उपक्रम राबवत आली आहे. त्याचाच एक भाग म्हणून ‘विचार प्रबोधन पर्व व सामाजिक समता सप्ताह’ अंतर्गत आरोग्य शिबिर तसेच रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे. या शिबिरांमधून नागरिकांना मोफत तपासणी व तज्ज्ञांचे मार्गदर्शन मिळणार असून, विविध आजारांचे वेळेत निदान होण्यास मदत होईल. त्यामुळे अधिकाधिक नागरिकांनी या उपक्रमात सहभागी होऊन आपल्या आरोग्याची काळजी घ्यावी आणि सामाजिक बांधिलकी जपावी.

– रवि लांडगे, महापौर , पिंपरी चिंचवड महापालिका.

…..

कोट:

नागरिकांच्या आरोग्यविषयक गरजा लक्षात घेऊन पिंपरी चिंचवड महानगरपालिका सातत्याने विविध आरोग्य उपक्रम राबवत आहे. ‘विचार प्रबोधन पर्व व सामाजिक समता सप्ताह’ अंतर्गत आयोजित आरोग्य शिबिर आणि रक्तदान शिबिर हे त्याचाच एक महत्त्वपूर्ण भाग आहेत. मोफत आरोग्य शिबिरात नागरिकांना आरोग्य तपासणी आणि तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन उपलब्ध होणार आहे, तसेच रक्तदान शिबिरातून अनेक गरजू रुग्णांना मदत होणार आहे. नियमित आरोग्य तपासणी आणि रक्तदान ही काळाची गरज असून, नागरिकांनी या उपक्रमात उत्स्फूर्तपणे सहभागी व्हावे.

– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, पिंपरी चिंचवड महापालिका

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments