Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedश्री महागणपती मंदिर, रांजणगाव जतन व दुरुस्ती कामांसाठी १५ एप्रिल ते ३१...

श्री महागणपती मंदिर, रांजणगाव जतन व दुरुस्ती कामांसाठी १५ एप्रिल ते ३१ जुलैपर्यंत बंद*

*

पुणे, दि.१३(जिमाका वृत्तसेवा) – अष्टविनायक आराखड्याअंतर्गत महाराष्ट्र शासनाने मंदिरांच्या जतन व संवर्धनासाठी निधी उपलब्ध करून दिला असून, पुरातत्त्व विभागामार्फत विविध कामे हाती घेण्यात आली आहेत. त्याच अनुषंगाने श्री महागणपती मंदिर, रांजणगाव येथे सुरू असलेल्या जतन व दुरुस्ती कामांमुळे सदर मंदिर दिनांक १५ एप्रिल २०२६ ते ३१ जुलै २०२६ या कालावधीत भाविकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे.

मागील तीन महिन्यांपासून मंदिरातील मुख्य रचना तसेच परिसरातील जतन, दुरुस्ती व संवर्धनाची कामे प्रगतीपथावर आहेत. या पार्श्वभूमीवर देवस्थान समितीने मंदिर तात्पुरते बंद ठेवण्याचा ठराव घेतला असून, सहाय्यक धर्मादाय आयुक्त, पुणे विभाग यांनीही त्यास मान्यता देत संबंधित आदेश जारी केले आहेत.

या कालावधीत मंदिर दर्शनासाठी बंद असले तरी श्री महागणपती यांची नित्य पूजाअर्चा, अभिषेक व इतर धार्मिक विधी नियमानुसार सुरू राहणार आहेत. मात्र, भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश किंवा प्रत्यक्ष दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार नाही. तसेच बांधकाम यंत्रणा, अधिकृत अधिकारी-कर्मचारी व विश्वस्त यांच्याशिवाय इतर कोणालाही मंदिर परिसरात प्रवेश दिला जाणार नाही.

श्री महागणपती मंदिर, रांजणगाव येथील विकासकामे ही दीर्घकालीन सुरक्षितता, सुविधा आणि भाविकांच्या सोयीसाठी आवश्यक असल्याने ही कामे नियोजनबद्ध व वेळेत पूर्ण व्हावीत, यासाठी मंदिर तात्पुरते बंद ठेवण्यात येत आहे. त्यामुळे भाविकांनी व स्थानिक नागरिकांनी या कामांचे महत्त्व लक्षात घेऊन मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पुरातत्त्व विभागाचे सहायक संचालक तसेच रांजणगाव देवस्थान विश्वस्तांनी केले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments