Friday, August 21, 2026
Google search engine
HomeUncategorizedफूड’ ही जागतिक सॉफ्ट पॉवर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...

फूड’ ही जागतिक सॉफ्ट पॉवर – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चितळे बंधू मिठाईवाले यांच्या रांजे व्हिजन पार्कचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन संपन्न

मराठी खाद्यसंस्कृतीला ब्रँड स्वरूपात जागतिक पातळीवर घेऊन जाण्याचे काम चितळेंनी केले, मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार

पुणे, दि. १६ एप्रिल, २०२६ : आज ‘फूड’ ही जागतिक सॉफ्ट पॉवर समजल्या जाते. एकीकडे गेल्या काही वर्षांत भारतामध्ये वेगवेगळ्या देशातील खाद्यसंस्कृतीचा आस्वाद देणारी हॉटेल्स, रेस्टॉरंटस नागरिकांच्या पसंतीस उतरत असताना देशाच्या प्रत्येक भागात देखील अतिशय चांगली खाद्य संस्कृती आपल्याला पहायला मिळते आहे. महाराष्ट्रात दर ५ किमीला जशी भाषा बदलते तशी दर १० किमीला खाद्यसंस्कृती बदलते. आपल्या या मराठी खाद्यसंस्कृतीला जागतिक निकषांचे फिनिशिंग देत तिला ‘ग्लोबल’ स्तरावर ब्रँड स्वरूपात घेऊन जाण्याचे काम चितळे बंधू मिठाईवाले यांनी केले, असे गौरवोद्गार राज्याचे मुख्यंमत्री देवेंद्र फडणवीस यांनी काढले.

आपल्या चवदार व कुरकुरित बाकरवडीने जगभरात लोकप्रियता मिळवलेल्या व भारतातील प्रसिद्ध मिठाई, नमकीन व स्नॅक्सचे निर्माते असलेल्या चितळे बंधू मिठाईवाले यांच्या वतीने भोर तालुक्यातील रांजे येथे ‘रांजे व्हिजन पार्क’ या अत्याधुनिक उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाले, त्यावेळी ते बोलत होते.

चितळे बंधू मिठाईवाले या संस्थेचे भागीदार असलेले गोविंद (संजय) चितळे, श्रीकृष्ण चितळे, इंद्रनील व केदार चितळे यांबरोबरच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, नगरसेवक राजेंद्र शिळीमकर आदी मान्यवर देखील यावेळी उपस्थित होते.

पुढे बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले, “चितळे बंधूंच्या चार पिढ्यांनी आजवर केवळ सातत्याने उद्योगच टिकवला नाही तर उद्योगाचा विस्तारही केला आहे. प्रत्येक पिढीने त्या त्या काळाच्या आव्हानांचा स्वीकार करून त्या आव्हानांना हिमतीने सामोरे जात आजचा हा चितळेंचा ‘ग्लोबल ब्रँड’ आत्मविश्वासपूर्वक उभा केला आहे, याबद्दल त्यांचे अभिनंदन करायला हवे. आमची कोठेही शाखा नाही ते आज ३५ देशांमध्ये आम्ही आहोत इथपर्यंतचा चितळेंचा प्रवास हा दैदिप्यमान असाच आहे. लवकरच परदेशातील दुकानांच्या बाहेर चितळे बंधूंचे पदार्थ विकत घेण्यासाठी रांगा लागतील असा माझा विश्वास आहे.”

पुण्यात चितळे आणि बाकरवडी यावर जेवढ्या गोष्टी रंगल्या आहेत तेवढ्या दुसऱ्या कोणत्याच ब्रँडवर रंगल्या नाहीत असे सांगत फडणवीस पुढे म्हणाले की, आम्ही लहानपणी सुट्ट्यांमध्ये काकांकडे पुण्याला यायचो तेव्हा घरी जाताना काकी आम्हाला एक बाकरवडीचे पाकीट द्यायच्या पण नागपूरला जायच्या प्रवासातच त्या संपत आहेत हे लक्षात आल्यापासून त्या दोन पाकिटे द्यायला लागल्या. एक घरी घेऊन जायला आणि एक आम्हा मुलांना प्रवासात खायला. त्यामुळे आम्ही लहानपणापासून बाकरवडीचे फॅन आहोत. नागपुरात चितळे एक्स्प्रेस उघडलं तेव्हा ताज उघडल्याचा आनंद आम्हा नागपूरकरांना झाला होता, अशी आठवण देखील फडणवीस यांनी सांगितली.

चितळे बंधूनी उभारलेले रांजे व्हिजन पार्क हे स्टेट ऑफ आर्ट फॅसिलिटी असून यामधील व्ह्यूइंग गॅलरी हे त्याचे प्रमुख आकर्षण आहे. येथून दिसणारे उत्पादनांचे प्रकार आणि पद्धती ही किती विशुद्ध आहे याचेच प्रात्यक्षिक आहे असे मला वाटते. या ठिकाणी आरोग्यदायी पद्धतीने आणि मानवी हस्तक्षेपाशिवाय बनणारे पदार्थ शुद्धतेची साक्ष देतात. प्रगत देशातील इंडस्ट्री व्हिजीटशी आपण याची तुलना करू शकू, असेही फडणवीस यांनी सांगितले.

पारदर्शकता, विश्वास आणि परंपरा या तीन खांबांवर चितळे समूह उभा आहे. आजच्या फॅक्टरीचे उद्घाटन हा चितळे बंधूंच्या प्रवासातला एक महत्वाचा टप्पा असून हे रांजे व्हिजन पार्क समूहाच्या पुढच्या २५ वर्षाच्या ग्रोथ प्लॅनचा विचार करून उभारण्यात आले आहे असे सांगत इंद्रनील चितळे म्हणाले, “देशातल्या प्रत्येक माणसाने रोज आमचा एक तरी पदार्थ खावा अशी आमची व्हिजन आहे. स्नॅकेबल पदार्थ म्हणजे काही वेस्टर्न नावेच डोळ्यापुढे येतात, ही सवय बदलून आपले मराठ्मोळे पदार्थ देशविदेशात खाल्ले जावेत यासाठीचे इनोव्हेशन आम्ही करित आहोत.” निर्यातकेंद्रीत खाद्यउद्योगासाठी शासन सहकार्य करेल असे आश्वासन देखील यावेळी मुख्यमंत्र्यांनी दिले.

या भागात खाद्यपदार्थ क्षेत्रातील अनेक मोठमोठे ब्रंडस कार्यरत आहेत. खाद्यपदार्थ क्षेत्रातील व्यावसायिकांसाठी पाण्याची उपलब्धता ही महत्त्वाची आहे. सदर खोरे हे पर्जन्यछायेच्या प्रदेशात येत असल्याने येथे नैसर्गिक स्रोतांव्यतिरिक्त पाण्याचा दुसरा पर्याय उपलब्ध नाही. म्हणून भोर भाटघरमधून एखादा कॅनॉल इथे आणता आला, तर पाण्याची उपलब्धता सुधारेल हे लक्षात घेत सरकारने या प्रश्नी लक्ष घालावे अशी मागणी यावेळी इंद्रनील चितळे यांनी केली.

याबरोबरच शिवगंगा खोऱ्यापासून पुरंदर ते दिघी असा फूड आणि सप्लाय चेन ट्रान्सपोर्ट एसइझेड मिळाला, तर येथे असलेल्या अनेक अन्नप्रक्रिया उद्योगांना जागतिक बाजारपेठेत सहज प्रवेश मिळू शकेल असेही त्यांनी नमूद केले.

वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा वापर करून पारंपारिक पदार्थ वेगवेगळ्या मार्केटप्लेसेसमध्ये उपलब्ध करता आले तर त्याकरीता भरपूर वाव आहे हे लक्षात आल्यानंतर त्या दृष्टीने मॉडीफाईड अॅटमॉस्फियर पॅकेजिंगचे तंत्रज्ञान वापरून आम्ही इथे काम करायला लागलो. आज एक ग्लोबली कम्पायंट प्लांट आम्ही येथे उभारला असून ३५ हून अधिक देशांत इथला माल जातोय याचा आम्हाला आनंद आहे. नोकरी बरोबर कौशल्य विकासावर भर देत या भागात आत्मनिर्भर विकास व्हावा यासाठी भविष्यातही आम्ही कार्यरत असू असेही चितळे म्हणाले.

सुमारे २५ एकर जागेवर उभारण्यात आलेल्या रांजे व्हिजन पार्कमध्ये मिठाई आणि नमकीनसाठी दोन स्वतंत्र उत्पादन केंद्रांची उभारणी करण्यात आली असून ते कार्यन्वित देखील करण्यात आले आहेत. या उत्पादन केंद्रांची क्षमता दररोज ४० टन मिठाई आणि नमकीनचे उत्पादन करण्याची आहे. रांजे व्हिजन पार्कच्या उभारणीमध्ये आतापर्यंत २५० कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे. हा नवीन, अत्याधुनिक उत्पादन प्रकल्प भारतातील तसेच परदेशांतील बाजारपेठांमध्ये चितळे बंधू समूहाच्या विस्तार योजनेसाठी आवश्यक असलेल्या उत्पादनांच्या गरजा पूर्ण करेल. पॅक बंद खाद्यपदार्थांच्या क्षेत्रातील जागतिक मानके लक्षात घेऊनच या प्रकल्पाची रचना आणि उभारणी करण्यात आली आहे. या प्रकल्पाला एफएसएससी २२००० हे जागतिक स्तरावर मान्यताप्राप्त असलेले आणि ग्लोबल फूड सेफ्टी इनिशीएटिव्ह मानकांवर आधारित अन्न सुरक्षा प्रमाणपत्र मिळाले आहे. त्याचबरोबर या उत्पादन प्रकल्पाला युएस फूड अँड ड्रग अॅडमिनिस्ट्रेशन आणि ब्रिटीश रिटेल कन्सोरशियम यांसारख्या जागतिक अन्न सुरक्षा मानकांनुसार देखील प्रमाणित करण्यात आले आहेत.

सदर पार्कमध्ये ग्राहकांसाठी व्ह्यूइंग गॅलरीज् अर्थात निरीक्षण कक्ष उभारण्यात आले असून यामधून ग्राहक चितळे बंधू मिठाईवाले यांची उत्पादने कशा प्रकारे संपूर्णतः स्वयंचलित उत्पादन प्रक्रियेच्या माध्यमातून तयार केली जातात व त्यादरम्यान होणारे स्वच्छतेचे, जागतिक दर्जाचे निकष यांचे काटेकोर पालन कसे केले जाते हे प्रत्यक्ष पाहू शकतील. याबरोबरच या ठिकाणी चितळे बंधू मिठाईवाले यांचा आजवरचा प्रवास दर्शवण्यासाठी तयार करण्यात आलेली १०० मीटर लांबीची विशेष भिंत ग्राहकांसाठी कुतूहलाचा विषय ठरेल. वसुंधरा काशीकर यांनी सूत्रसंचालन केले

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments