Thursday, August 20, 2026
Google search engine
HomeUncategorized* *'मनिषा'ची झेप*

* *’मनिषा’ची झेप*

 

 

आज समाजात,विविध क्षेत्रात पुरुषांच्या बरोबरीने स्त्रिया काम करताना दिसत असल्या तरी अजूनही बर्‍याच पालकांची धारणा अशी असते की मुलीचे लग्नच करून द्यायचे आहे तर तिला उगीचच का जास्त शिकवावे? मग मुलीसुद्धा पालकांची इच्छा प्रमाण मानून लग्न करून घेतात. पुढे सासर, पती, मुले यांच्या संगोपनात त्या इतक्या गढून जातात की आपली काही स्वप्ने होती, हेच त्या विसरून जातात.

 

पण काही पालक आणि मुलीही या परंपरेला छेद देणार्‍या असतात. त्यातीलच एक म्हणजे प्रा. डॉ. सौ. मनिषा नितीन चाळसे ही होय. मूळची छत्रपती संभाजीनगर येथील असलेल्या आणि आता पुण्यात स्थायिक झालेल्या मनिषाचे शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण छत्रपती संभाजीनगर येथेच झाले. तिने डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून जीव रसायन शास्त्रात उच्च गुणांसह एम. एस्सी आणि एम.एड या पदव्या संपादन केल्या.पुढे रितीभातीनुसार तिचा विवाह मूळ अकोला येथील श्री नितीन वसंतराव चाळसे यांच्याशी झाला. नितीन आज अ‍ॅक्सिस बँकेत उपाध्यक्ष या उच्च पदावर कार्यरत आहे.

 

नोकरीमुळे नितीन जळगाव येथे असताना मनिषा ने तेथील एम.जे. कॉलेज मध्ये पदवीपूर्व आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना २००२ ते २००९ अशी सात वर्षे मानवी शरीरक्रियाविज्ञान, जैवतंत्र, आण्विक जीवशास्त्र, पेशी जीवशास्त्र हे विषय शिकवून त्या विषयांचे प्रात्यक्षिक करून घेतले. तर २०१२या शैक्षणिक वर्षासाठी जळगाव येथीलच डी एन सी व्ही पी कॉलेज मध्ये पदवीपूर्व स्तरावर प्राध्यापक (जैवतंत्रज्ञान) म्हणून काम करताना तिने जैवरेणू आणि वनस्पती उती संवर्धन हे विषय शिकविले. तसेच या विषयांची प्रात्यक्षिके घेण्याची जबाबदारी पार पाडली.

 

पुढे नितीन ची बदली छत्रपती संभाजीनगर येथे झाली.त्यामुळे मनिषा ने २०१४ ते २०२० या काळात तेथील शिवछत्रपती महाविद्यालयात प्राध्यापक म्हणून काम केले. तिथे ती प्रात्यक्षिकांसह जैवरेणू, विकर तंत्रज्ञान, चयापचय , वनस्पती उती संवर्धन हे विषय शिकवित असे.

 

घर, संसार, दरम्यान झालेली दोन मुले, त्यात पुन्हा प्राध्यापकी असे सर्व बघतांना

मनिषाचे अधिक उच्च शिक्षण घेण्याचे, संशोधन करण्याचे स्वप्न स्वस्थ बसू देत नव्हते. म्हणुन तिने डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात जीव रसायन शास्त्रात पीएच.डी साठी नाव नोंदविले. डॉ. ए.व्ही. पेठकर यांच्या मार्गदर्शनाखाली तिचे “टाईप-२ मधुमेह आणि जंतुनाशक उपयोगांसाठी बायोजेनिक कॉपर ऑक्साईड नॅनोकणांची हरित निर्मिती, वैशिष्ट्यीकरण व चिकित्सीय मूल्यमापन” या विषयावर संशोधन सुरू झाले.

 

दरम्यान, नितीनची बदली पुणे येथे झाली. त्यामुळे मनिषालाही पुणे येथे यावे लागले. याच काळात, जगभर थैमान घालणाऱ्या कोरोनाच्या संकटाने तिच्या आयुष्यालाही कठीण वळण दिले. मनिषा गंभीर आजारी पडली. परिस्थिती इतकी बिकट झाली होती की तिला मृत्यूचा सामना करावा लागला. तो काळ तिच्यासाठी आणि कुटुंबासाठी अत्यंत कठीण होता. पण जिद्द, इच्छाशक्ती आणि कुटुंबाच्या अथक पाठबळाच्या जोरावर तिने साक्षात मृत्यूलाही हरवले आणि पुन्हा एकदा नव्या उमेदीने ती उभी राहिली.

 

पुण्यात मनिषाने भारती विद्यापीठाच्या पूना कॉलेज ऑफ फार्मसी मध्ये २०१७ ते २०२४ या काळात संशोधन कार्य पूर्ण केले. येथे तिने औषधी वनस्पतींचा वापर करून हरित पद्धतीने ताम्र भस्मचे संश्लेषण केले. त्यांचे स्वरूप निश्चित करण्यासाठी अतिनील-दृश्य वर्णपटशास्त्र, फूरियर ट्रान्सफॉर्म इन्फ्रारेड स्पेक्ट्रोस्कोपी, एक्स-रे विवर्तन, क्रमवीक्षक इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शक आणि ऊर्जा विक्षेपण क्ष-किरण वर्णपटशास्त्र, उच्च-विभेदन द्रव क्रोमॅटोग्राफी मास यांसारख्या विविध तंत्रांचा वापर करून त्यांचे वैशिष्ट्यीकरण केले. या ताम्र भस्माचे उपचारात्मक उपयोगांसाठी मूल्यमापन करण्यात आले, ज्यामध्ये नैसर्गिक नर विस्टार प्रजातीच्या उंदरांमधील मधुमेहविरोधी कार्यक्षमता आणि मूत्रमार्गाच्या संसर्गासाठी कारणीभूत असलेले रुग्णालयीन जीवाणू विरुद्ध प्रतिजैविक कार्यक्षमतेचा अभ्यास करण्यात आला.

 

या संशोधनाअंती असे दिसून आले की, जैवनिर्मित ताम्र भस्माचे विस्टार उंदरांमधील टाइप २ मधुमेह उपचारांसाठी प्रभावी आहेत आणि त्यांचा वापर जीवाणू विरोधी नॅनो-औषध म्हणून देखील केला जाऊ शकतो.

 

सध्या मनिषा पुण्यात एम.ई.एस. आबासाहेब गरवारे महाविद्यालयात जैवतंत्रज्ञान विभागात प्राध्यापक म्हणून क्रोमॅटोग्राफिक आणि इलेक्ट्रोफोरेटिक टेक्निक्स, ॲडव्हान्स्ड बायोलॉजिकल टेक्निक्स, सेंट्रीफ्युगेशन आणि स्पेक्ट्रोस्कोपिक टेक्निक्स, मेटाबॉलिझम, एन्झाईम टेक्नॉलॉजी हे विषय शिकवत असतानाच या विषयांची प्रात्यक्षिकेही घेण्याची जबाबदारी सांभाळत तिचे पीएच.डी करणेही सुरूच होते.

 

शेवटी जिद्द, चिकाटी आणि घरच्यांचे पाठबळ यामुळे मनिषाने याच वर्षी; म्हणजे जानेवारी 2026 मध्ये पीएच.डी संपादन केली. यानंतर तिने अनिरुद्ध व्ही. पेठकर आणि उर्मिला एम. अस्वार यांच्यासह “टाइप २ मधुमेहाच्या उपचारांसाठी कॉपर ऑक्साईड नॅनोपार्टिकल्स तयार करण्याची पद्धत यासाठी “पेटंट दाखल केले आहे.

 

या संशोधना बरोबरच मनिषाने अनेक शोधनिबंध लिहिले आहेत जे आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमध्ये प्रसिद्ध झाले आहेत. याशिवाय विविध विद्यापीठे, संशोधन

संस्थांमध्ये अनेक कार्यशाळा, परिषदांमध्ये तिने भाग घेतला आहे आणि अजूनही घेत असते. शिवाय विविध विद्यापीठांमध्ये विविध शैक्षणिक आणि संशोधनपर

उपक्रमांमध्ये तिचा सतत सहभाग असतो.

 

नितीन आणि मनिषाचे वैशिष्ट्य म्हणजे एकमेकांना आपापल्या करिअर मध्ये मनापासून साथ दिली. तसेच मुलगी शमिका आणि मुलगा शारल यांच्या संगोपनाकडे , शिक्षणाकडेही काळजीपूर्वक लक्ष दिले. याचे फळ म्हणुन दोघेही इंजिनिअर होऊन पुणे येथे संगणक तंत्रज्ञान क्षेत्रात मोठ्या पदांवर काम करीत आहेत.

 

नितीनने बर्‍याच नवर्‍याचा जो बुरसटलेला पुरुषी अहंकार असतो तो म्हणजे, माझी बायको माझ्या पुढे जाता कामा नये, असा संकुचित दृष्टिकोन न ठेवता, पत्नीच्या यशात आपलेही यश आहे, असा व्यापक विचार केल्याने, तिच्या यशात आनंद, अभिमान मानल्याने , कुठलीही गोष्ट करण्यासाठी कधीच आडकाठी न करता, उलट तिला नेहमी पाठींबा दिला, तिचे कौतुक केले यामुळे मनिषा आपले करिअर मनासारखे करू शकली आणि करीत आहे.या सर्व परिवाराच्या लौकिकात, आनंदात दिवसेंदिवस अधिक भर पडत राहो, या मनःपूर्वक शुभेच्छा.

लेखन: देवेंद्र भुजबळ

निवृत्त माहिती संचालक

☎️+91 9869484800

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments