Thursday, October 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedअष्टविनायकातील मोरगाव, थेऊर व सिद्धटेक येथील मंदिरे १० मे ते ९ जूनपर्यंत...

अष्टविनायकातील मोरगाव, थेऊर व सिद्धटेक येथील मंदिरे १० मे ते ९ जूनपर्यंत भाविकांसाठी बंद

पुणे, दि. ८ (जिमाका वृत्तसेवा) : अष्टविनायक विकास आराखड्याअंतर्गत तसेच पुरातत्त्व विभागाच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या जतन, संवर्धन व दुरुस्ती कामांच्या पार्श्वभूमीवर श्री मयुरेश्वर मंदिर, श्री चिंतामणी मंदिर आणि श्री सिद्धिविनायक मंदिर ही मंदिरे दिनांक १० मे २०२६ ते ९ जून २०२६ या कालावधीत भाविकांच्या दर्शनासाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती पुरातत्त्व विभागाकडून देण्यात आली आहे.

 

 

 

अष्टविनायकातील मंदिरांचे जतन, देखभाल व दुरुस्ती करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने विशेष निधी उपलब्ध करून दिला असून, या कामांसाठी चिंचवड देवस्थान ट्रस्टतर्फे शासनाचे आभार मानण्यात आले आहेत. सध्या मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेक येथे मुख्य मंदिर तसेच मंदिर परिसरातील जतन, संवर्धन आणि दुरुस्तीची कामे प्रगतीपथावर आहेत.

 

 

 

पुरातत्त्व विभागाच्या नियोजनानुसार मंदिरांचा मुख्य गाभारा आणि सभामंडप यांचे पौराणिक स्वरूप जपत सुबक दगडी बांधकामाद्वारे संवर्धन करण्यात येणार आहे. या कामादरम्यान भाविकांची मोठ्या प्रमाणातील उपस्थिती कामात अडथळा निर्माण करू शकते तसेच कामाचा कालावधी वाढण्याची शक्यता असल्याने मंदिरे तात्पुरती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

 

यासंदर्भात पुरातत्त्व विभागाच्या संचालकांनी सह धर्मादाय आयुक्त, पुणे विभाग यांच्याकडे विनंती अर्ज सादर केला होता. त्यानंतर पुरातत्त्व विभाग, मंदिर प्रशासन, पुजारी वर्ग आणि ग्रामस्थ यांचे म्हणणे ऐकून घेत सह धर्मादाय आयुक्तांनी दि. ७ मे २०२६ रोजी मंदिरे तात्पुरती बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

 

 

 

सह धर्मादाय आयुक्तांच्या सूचनेनुसार चिंचवड देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्त मंडळानेही मोरगाव, थेऊर आणि सिद्धटेक येथील मंदिरे भाविकांसाठी बंद ठेवण्याचा ठराव मंजूर केला आहे. तसेच दि. ८ मे २०२६ रोजी संबंधित ठिकाणी ग्रामस्थांच्या उपस्थितीत ग्रामसभा घेऊन मंदिर बंद ठेवण्याबाबत माहिती देण्यात येणार आहे.

 

 

 

या कालावधीत मंदिरांमध्ये नित्य पूजाअर्चा व धार्मिक विधी नियमितपणे सुरू राहतील. मात्र भाविकांना मंदिर परिसरात प्रवेश किंवा प्रत्यक्ष दर्शनाची सुविधा उपलब्ध राहणार नाही. मंदिरांचे पुजारी, बांधकाम यंत्रणा, अधिकृत अधिकारी, कर्मचारी आणि विश्वस्त यांच्याशिवाय अन्य कोणालाही प्रवेश दिला जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.

 

 

 

ही विकासकामे मंदिरांची दीर्घकालीन सुरक्षितता, सुविधा आणि भाविकांच्या सोयीसाठी अत्यंत आवश्यक असून ती नियोजनबद्ध व वेळेत पूर्ण व्हावीत यासाठी नागरिकांनी आणि भाविकांनी मंदिर संस्थान, जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन व स्थानिक प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

 

—

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments