पुणे – चराचर सृष्टी पंचमहाभूतांच्या माध्यमातून बनली आहे, हेच आपली हिंदू जीवनदृष्टी सांगते. आपण सर्वजण त्याचेच घटक आहोत. त्यामुळे आपसातील जातीभेद विसरून आपण सर्वांनी समरस जीवन जगण्याचा संकल्प करूया, असे आवाहन सामाजिक सद्भाव कार्याचे अखिल भारतीय सहसंयोजक बळिराम पटेल यांनी केले.
श्री देवदेवेश्वर संस्थान, पुणे संचलित सारसबाग येथील श्री सिद्धिविनायक मंदिर आणि सामाजिक सद्भाव कार्य, पुणे महानगर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित श्री गणेश अभिषेक व आरती सोहळ्यात ते बोलत होते.
मंदिरातील मुख्य सभागृहात श्री गणेश मूर्तीसमोर अत्यंत भक्तिमय वातावरणात अभिषेक व आरतीचा कार्यक्रम झाला. या विधीचे पौरोहित्य खांडकेकर गुरुजी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी केले. विशेष म्हणजे, अभिषेक सुरू असताना खांडकेकर यांनी प्रत्येक विधीचे महत्त्व आणि त्यामागचा आध्यात्मिक भाव अत्यंत सुलभ भाषेत उपस्थितांना सांगितला. अनेक वर्षांपासूनची ही इच्छा पूर्ण झाल्याची भावना उपस्थित भाविकांनी व्यक्त केली. विधीनंतर उपस्थित सर्वांसाठी महाप्रसादाचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी श्री देवदेवेश्वर संस्थानचे प्रमुख विश्वस्त सुधीर पंडित म्हणाले की, हे मंदिर सर्वांसाठी खुले आहे. आज आपल्या सर्वांच्या उपस्थितीमुळे आम्हाला खूप आनंद होत आहे. असाच स्नेहभाव आपण सर्वांनी भविष्यातही जपला पाहिजे
या कार्यक्रमात यामध्ये गोंधळी, चर्मकार, बुरुड, नाथपंथी गोसावी, कंजारभाट, मातंग, मसणजोगी अशा विविध ज्ञाती-समाजांमधील २२ परिवारांचे सुमारे ५० प्रतिनिधी उत्साहाने सहभागी झाले होते. सामाजिक सद्भाव निर्मितीच्या या उपक्रमामुळे एक सकारात्मक संदेश आणि सुसंवादातून भक्तीचा सोहळा रंगल्याची प्रतिक्रिया सहभागींनी दिली.
याप्रसंगी सामाजिक सद्भाव कार्यचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संयोजक बाळासाहेब दळवी, पुणे महानगर संयोजक संजय एडके, सोमनाथ शिंदे, अनिल टेकवडे, बबलू गलियल, पांडुरंग पढार, प्रकाश शिंदे कार्यकर्ते उपस्थित होते.


