पुणे, जून २०२६: मणिपाल हॉस्पिटल, खराडी येथील डॉक्टरांनी दीड महिन्यांच्या बाळाच्या पचनसंस्थेत अडकलेली हेअरपिन तातडीच्या एंडोस्कोपिक प्रक्रियेद्वारे यशस्वीरित्या काढून संभाव्य गंभीर गुंतागुंत टाळली.
घरी खेळत असताना चुकून हेअरपिन गिळल्यामुळे बाळाला घटनेनंतर सुमारे दोन तासांनी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तातडीने करण्यात आलेल्या पोटाच्या एक्स-रेमध्ये ही हेअरपिन पोटाच्या खालच्या भागात किंवा लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागात पोहोचल्याचे आढळून आले. हेअरपिन उघडी असल्याने पोट किंवा लहान आतड्याला छिद्र पडण्याचा धोका निर्माण झाला होता. त्यामुळे या प्रकरणाकडे वैद्यकीय आणीबाणी म्हणून पाहण्यात आले.
विशेष प्रकारच्या टूथ फोर्सेप्सच्या साहाय्याने ही हेअरपिन पचनसंस्थेला कोणतीही इजा न होता यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आली.
या प्रकरणाविषयी माहिती देताना मणिपाल हॉस्पिटल, खराडी, पुणे येथील गॅस्ट्रोएन्टेरोलॉजिस्ट सल्लागार डॉ. आदित्य बोरावके म्हणाले, “या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आम्ही तातडीने एंडोस्कोपी करण्याचा निर्णय घेतला. प्रक्रियेदरम्यान ड्युओडेनमच्या दुसऱ्या भागापर्यंत (D2) परकीय वस्तू आढळली नाही. साधारण गॅस्ट्रोस्कोपीची मर्यादा इथपर्यंतच असते. मात्र आम्ही काळजीपूर्वक पुढे जाऊन लहान आतड्याच्या सुरुवातीच्या भागात तपासणी सुरू ठेवली आणि अखेरीस ड्युओडेनमच्या चौथ्या भागात (D4) ही हेअरपिन आढळून आली.”
ते पुढे म्हणाले, “लहान बाळांनी परकीय वस्तू गिळल्यास ती वैद्यकीय आणीबाणीची परिस्थिती ठरू शकते, विशेषतः वस्तू टोकदार किंवा धारदार असल्यास. या प्रकरणात हेअरपिन उघडी असल्याने आतड्याला छिद्र पडण्याचा धोका मोठ्या प्रमाणात वाढला होता. ही वस्तू ड्युओडेनमच्या खूप आतपर्यंत गेल्यामुळे नियमित एंडोस्कोपीच्या आवाक्याबाहेर होती. योग्य वेळी हस्तक्षेप केल्यामुळे कोणतीही गुंतागुंत होण्यापूर्वी आम्हाला ती सुरक्षितपणे बाहेर काढता आली.”
प्रक्रियेनंतर बाळाची प्रकृती स्थिर होती. चार तासांनंतर त्याला तोंडावाटे आहार देण्यास सुरुवात करण्यात आली. बाळाने आहार चांगल्या प्रकारे घेतला आणि दुसऱ्याच दिवशी त्याला उत्तम प्रकृतीत रुग्णालयातून घरी सोडण्यात आले.
मणिपाल हॉस्पिटल्स, संचालक डॉ. अमित माने म्हणाले, “लहान मुलांनी चुकून कोणतीही परकीय वस्तू गिळल्यास तात्काळ वैद्यकीय सल्ला घेणे किती महत्त्वाचे आहे, हे हे प्रकरण अधोरेखित करते. एवढ्या लहान बाळाच्या शरीरातून उघडी हेअरपिन यशस्वीरित्या काढून टाकणे हे आमच्या तज्ज्ञ वैद्यकीय पथकाच्या कौशल्याचे आणि अत्याधुनिक, कमी आक्रमक उपचारपद्धतींद्वारे गुंतागुंतीच्या आणीबाणीच्या परिस्थिती हाताळण्याच्या आमच्या तयारीचे उदाहरण आहे. सर्व वयोगटांतील रुग्णांना वेळेवर आणि विशेष वैद्यकीय सेवा देण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत.”
या प्रक्रियेनंतर बाळाची प्रकृती पूर्णपणे सुधारली असून कोणतीही गुंतागुंत उद्भवलेली नाही. पुढील तपासण्यांमध्येही त्याची प्रकृती उत्तम असल्याचे दिसून आले आहे.


