Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedवेदमूर्ती देवव्रत रेखे यांना यंदाचा "ब्राह्मण भूषण" पुरस्कार; थिंक बँकचे संपादक विनायक...

वेदमूर्ती देवव्रत रेखे यांना यंदाचा “ब्राह्मण भूषण” पुरस्कार; थिंक बँकचे संपादक विनायक पाचलग, युवा किर्तनकार अमृता करंबेळकर व कऱ्हाडे ब्राह्मण संघाला देखील पुरस्कारांनी गौरविणार

 

पुणे, दि. १६ जून – आम्ही सारे ब्राह्मण व ब्राह्मण व्यावसायिक पत्रिकेच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा ‌‘ब्राह्मण भूषण’ पुरस्कार दण्डक्रम पारायणाचा विक्रम रचणारे वेदमूर्ती देवव्रत रेखे यांना येत्या शुक्रवारी (१९ जून) प्रदान करण्यात येणार असल्याची माहिती मासिकाचे संपादक भालचंद्र कुलकर्णी व संचालक संजय ओर्पे व माधुरी कुलकर्णी यांनी आज येथे दिली. येत्या शुक्रवारी, सायं. ५.३० वाजता टिळक स्मारक मंदिर, पुणे येथे होणाऱ्या या समारंभामध्ये नाशिकच्या काळाराम मंदिराचे प्रमुख विश्वस्त सुधीरदासजी महंत महाराज यांच्या शुभहस्ते हे पुरस्कार प्रदान केले जाणार असून खासदार डॉ. मेधा कुलकर्णी, परशुराम आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष कॅप्टन आशिष दामले, पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. ब्राह्मण भूषण पुरस्काराबरोबरच यंदाचा इंदुमती-वसंत करिअर भूषण पुरस्कार थिंक बँकचे संपादक व युवा उद्योजक विनायक पाचलग यांना, डॉ. रामचंद्र देखणे स्मृती कीर्तनकार पुरस्कार ह.भ.प. अमृता करंबेळकर यांना तर ब्राह्मण समाजासाठी गेली ९६ वर्षे काम करणाऱ्या कऱ्हाडे ब्राह्मण संघाला भगवान परशुराम ब्राह्मण संस्था पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्काराचे यंदाचे १३ वे वर्ष असून मानपत्र, पुणेरी पगडी, रोख रक्कम आणि भेटवस्तू असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

पुरस्काराबाबतची अधिक माहिती देतांना कुलकर्णी म्हणाले की, देवव्रत रेखे यांनी काशीच्या पवित्र भूमीत अत्यंत दुर्मिळ आणि कठीण मानले जाणारे ‘दण्डक्रम पारायण’ सलग ५० दिवसात यशस्वीरीत्या पूर्ण केले आहे. संपूर्ण हिंदू सनातन धर्माची पताका संपूर्ण जगात उंचावणारे असे विशेष काम त्यांनी केले आहे. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याची दखल देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही अभिनंदन करून घेतली आहे. थिंक बँक या चॅनलचे संपादक, माध्यम तज्ज्ञ व युवा उद्योजक विनायक पाचलग यांना इंदूमती-वसंत करिअर भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. ज्येष्ठ करिअर समुपदेशक डॉ. श्रीराम गीत यांनी त्यांच्या आई-वडिलांच्या स्मृती जपण्यासाठी हा पुरस्कार सुरु केला आहे.

यावेळी संस्थेबाबतची माहिती देतांना ओर्पे म्हणाले की, आम्ही सारे ब्राह्मण व ब्राह्मण व्यावसायिक पत्रिका हे मासिक गेली २१ वर्षे प्रसिध्द करण्यात येत आहे. या मासिकाच्या माध्यमातून ब्राह्मण संस्था, संघटनांचे एकत्रिकरण करण्यात येते त्याचबरोबर गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदतीचा हात देण्यात येतो. ब्राह्मण तरुणांची उद्योजकीय मानसिकता तयार करणे, नवउद्योजक निर्माण करणे तसेच ब्राह्मण उद्योजकांना सर्व प्रकारची मदत पुरवणे हे देखील कार्य आमच्या संस्थेतर्फे केले जाते.

यापूर्वी ब्राह्मण भूषण पुरस्काराने सर्वश्री अपर्णा रामतीर्थकर, अ.भा. ब्राह्मण महासंघाचे संस्थापक गोविंद कुलकर्णी, एअरमार्शल भूषण गोखले, शारदा पीठमचे पं. वसंतराव गाडगीळ, पितांबरीचे रविंद्र प्रभुदेसाई, श्री सद्गुरू ग्रुपचे यशवंत कुलकर्णी, प्रवचनकार डॉ. सच्चिदानंद शेवडे, ज्येष्ठ अभिनेते शरद पोंक्षे, ज्येष्ठ अभिनेते प्रशांत दामले, पत्रकार सुशील कुलकर्णी, पंचांगकर्ते मोहन दाते यांना गौरविण्यात आले आहे. तसेच यापूर्वी ‌‘इंदुमती-वसंत करिअर भूषण’ पुरस्कार सामाजिक कार्यकर्ते सारंग गोसावी, लेखक घन:श्याम पाटील, सिनेदिग्दर्शक दिग्पाल लांजेकर, पत्रकार डॉ. सागर देशपांडे, योगगुरू सौ. मनाली देव, युवा उद्योजक निर्मल देशपांडे यांना प्रदान करण्यात आला आहे. डॉ. रामचंद्र देखणे स्मृती कीर्तनकार पुरस्कार सौ. मानसी बडवे, सौ. संज्योत केतकर, सौ. किरण कुलकर्णी यांना प्रदान करण्यात आला आहे. तर भगवान परशुराम ब्राह्मण संस्था पुरस्कार महाराष्ट्र ब्राह्मण सभा, देशस्थ ऋग्वेदी ब्राह्मण शिक्षणोत्तेजक संस्था, शुक्ल यजु:शाखीय माध्यंदिन महाराष्ट्रीय ब्राह्मण सभेला प्रदान करण्यात आला आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments