Sunday, August 16, 2026
Google search engine
HomeUncategorizedवेदपाठशाळा व वैदिक कार्यासाठी राज्य शासनाच्या अनुदानाची गरज – सुधीरदास महंत

वेदपाठशाळा व वैदिक कार्यासाठी राज्य शासनाच्या अनुदानाची गरज – सुधीरदास महंत

 

 

पुणे, दि. २० जून- महाराष्ट्रातील सुमारे सव्वाशे वेदपाठशाळांची आर्थिक स्थिती नाजूक असल्याने शासनाकडून अनुदानाची गरज आहे, त्याचबरोबर वैदिक कार्यातील विद्वानांकरिता महाराष्ट्र शासनाने पुरस्कार सुरु करावेत, अशी मागणी नाशिकच्या काळाराम मंदिराचे प्रमुख विश्वस्त सुधीरदास महंत महाराज यांनी आज येथे केली. आंध्र प्रदेश, मध्यप्रदेश, उत्तरप्रदेश सारख्या अनेक राज्यांमध्ये वैदिक कार्यासाठी या प्रकारचे अनुदान आणि पुरस्कार दिले जातात. महाराष्ट्रात आज सुमारे १५ हजारांहून अधिक विद्यार्थी वेदपाठशाळांमध्ये वैदिक अध्ययन करत आहेत, अशी माहिती देखील त्यांनी यावेळी दिली. आम्ही सारे ब्राह्मण आणि ब्राह्मण व्यावसायिक पत्रिकेच्या वर्धापनदिनाच्या निमित्ताने ब्राह्मण भूषण पुरस्कार सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. यावेळी खासदार मेधा कुलकर्णी, मासिकाचे संपादक भालचंद्र कुलकर्णी, व्यवस्थापकीय संचालक संजय ओर्पे व पुरस्कारार्थी व्यासपीठावर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी नसरापूर प्रकरणातील स्व. वेदवती शुभम कुलकर्णी या चिमुरडीला श्रध्दांजली वाहण्यात आली.

 

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दृकश्राव्य माध्यमातून पुरस्कारार्थींना शुभेच्छा दिल्या. दण्डक्रम पारायणाचा विक्रम रचणारे वेदमूर्ती देवव्रत रेखे यांना ब्राह्मण भूषण पुरस्काराने यावेळी गौरविण्यात आले, त्यांच्यासोबत वेदमूर्ती महेश रेखे उपस्थित होते. विठ्ठल रखुमाई मूर्ती, पुणेरी पगडी, उपरणे, मानपत्र आणि रोख रुपये २५ हजार असे पुरस्काराचे स्वरुप होते. याशिवाय ह. भ. प. अमृता करंबेळकर यांना डॉ रामचंद्र देखणे स्मृती युवा कीर्तनकार पुरस्कार, थिंक बँकचे संपादक व युवा उद्योजक विनायक पाचलग यांना इंदुमती-वसंत करिअर भूषण पुरस्कार आणि ९६ वर्षांची परंपरा असलेल्या कऱ्हाडे ब्राह्मण संघाला भगवान परशुराम ब्राह्मण संस्था पुरस्काराने गौरविण्यात आले. कऱ्हाडे ब्राह्मण संघाचे अध्यक्ष अमित शहाणे व त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी हा पुरस्कार स्विकारला. या तिनही पुरस्कारांचे स्वरुप सन्मानचिन्ह, शाल व रोख रु. दहा हजार असे होते. यावेळी मंजिरी धुपकर लिखित गुरु-शिष्य संवाद (दासबोध) या ग्रंथाचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. ब्राह्मणांसाठी असलेल्या सुयश वधू-वर सूचक मंडळाच्या नव्या संकेतस्थळाचे उद्घाटन यावेळी करण्यात आले.

यावेळी बोलतांना सुधीरदास महाराज पुढे म्हणाले की, वैदिक कार्यामध्ये ब्राह्मण समाजाबरोबरच अन्य समाज देखील सहभागी होत आहे. वेदपाठशाळांमध्ये देखील सर्व जातीतील विद्यार्था वेदाध्ययन करत आहेत, ही आनंदाची बाब आहे. आज महाराष्ट्रातील अनेक वेदपाठशाळांना जागेची कमतरता आहे तर आर्थिक स्थिती हलाखीची आहे. यासाठी सर्व समाजाने आर्थिक पाठबळ देण्याबरोबरच राज्य शासनाने देखील या कार्याची दखल घेत भरघोस अनुदान देण्याची गरज आहे.

यावेळी खासदार मेधा कुलकर्णी म्हणाल्या की, सध्याच्या काळात वेदांचा आणि ग्रंथांचा अभ्यास करून आपली हिंदू संस्कृती, वैदिक परंपरा पुढे नेण्यासाठी सर्वस्तरावरुन प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे. यासाठी केंद्र सरकार प्रयत्नशील आहे, सरकारने काही उपक्रम देखील सुरु केले आहेत.

यावेळी करंबेळकर, पाचलग आणि शहाणे यांनी सत्काराला उत्तर देतांना मनोगत व्यक्त केले. यावेळी आर्किटेक्ट हृषिकेश कुलकर्णी, ज्येष्ठ उद्योजक जयंत दीक्षित, हर्षवर्धन भावे, श्रीकृष्ण चितळे, अभिरुचीचे सुनिल भिडे, युवा उद्योजक अनिकेत मालशे यांचा सन्मान करण्यात आला तर पुस्तक परिक्षणांचा विश्वविक्रम करणारे समीर गुधाटे व केंद्र सरकारच्या सांस्कृतिक संबंध परिषदेच्या मान्यताप्राप्त यादीतील अंधगायक निनाद शुक्ल यांचा विशेष सत्कार करण्यात आला. भालचंद्र कुलकर्णी यांनी सर्वांचे स्वागत केले व उपस्थितांचे आभार मानले तर संजय ओर्पे यांनी ब्राह्मण व्यावसायिकांसाठी करत असलेल्या विविध प्रकल्पांची यावेळी माहिती दिली. ज्येष्ठ अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी सूत्रसंचालन केले तर वैशाली जोशी यांनी गायलेल्या संपूर्ण वंदेमातरमने कार्यक्रमाची सांगता झाली.

—–

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments