पुणे, नांदे येथील ‘ध्रुव ग्लोबल स्कूल’च्या विद्यार्थिनींनी राष्ट्रीय व सांस्कृतिक क्षेत्रात दैदिप्यमान कामगिरी करत शाळेच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. अलिकडेच पार पडलेल्या प्रतिष्ठित राष्ट्रीय नृत्य स्पर्धांमध्ये शाळेतील विद्यार्थिनींनी प्रथम क्रमांक पटकावत राष्ट्रीय स्तरावर पुण्याचा डंका वाजवला आहे.
शारिणी काळे ठरली राष्ट्रीय विजेती
‘इंडियन आर्ट कल्चरल ऑफ इंडिया’ आणि भारत सरकारच्या सांस्कृतिक मंत्रालयाच्या संयुक्त विद्यमाने “ऑल इंडिया २६वी राष्ट्रीय नृत्य स्पर्धा व महोत्सव २०२६” चे पुण्यात आयोजन करण्यात आले होते. या अत्यंत चुरशीच्या स्पर्धेत ध्रुव ग्लोबल स्कूलची विद्यार्थिनी शारिणी काळे हिने भारतीय शास्त्रीय नृत्य प्रकारात आपल्या उत्कृष्ट आणि नयनरम्य सादरीकरणाने परीक्षकांची मने जिंकली. देशपातळीवरील या स्पर्धेत तिने प्रथम क्रमांक पटकावून राष्ट्रीय स्तरावर शाळेचे नाव उज्ज्वल केले. तिची जिद्द, समर्पण आणि कठोर परिश्रमाच्या बळावर तिने हे यश संपादन केले आहे.
ओडिसी नृत्यात कनिष्ठ गटाची बाजी; ‘कल्चरल ऑलिम्पियाड’चे तिकीट निश्चित
दुसऱ्या एका महत्त्वाच्या घडामोडीत, अखिल भारतीय सांस्कृतिक संघाच्या ग्लोबल कौन्सिल ऑफ आर्ट अँड कल्चर, पुणे यांच्या वतीने “ग्लोबल हार्मनी भारत रंग ताल २०२६” या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेतील कनिष्ठ गट नृत्य विभागात ध्रुव ग्लोबल स्कूलच्या झारा शर्मा, मायरा मुतागी, मिशिका चतुर्वेदी आणि शालवी चौगुले या विद्यार्थिनींच्या समूहाने पारंपरिक ‘ओडिसी’ नृत्य सादर करत प्रथम क्रमांकावर नाव कोरले. या विद्यार्थिनींच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत त्यांची थेट ‘१६व्या कल्चरल ऑलिम्पियाड ऑफ परफॉर्मिंग आर्ट्स’ या आंतरराष्ट्रीय स्तरावरील प्रतिष्ठित मंचासाठी निवड करण्यात आली आहे, जी शाळेसाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.
विद्यार्थिनींच्या या दैदिप्यमान यशात शाळेच्या नृत्य प्रशिक्षिका सुभश्री राऊतराय यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. त्यांच्याच तालमीत तयार झालेल्या या विद्यार्थिनींनी राष्ट्रीय स्तरावर आपल्या कलात्मकतेची छाप पाडली. या घवघवीत यशाबद्दल विजयी विद्यार्थिनी आणि त्यांच्या मार्गदर्शक सुभश्री राऊतराय यांचे सर्व स्तरांतून कौतुक व अभिनंदन होत आहे. या देदीप्यमान यशानं ध्रुव ग्लोबल स्कूलचे विश्वस्त व संचालक यशवर्धन मालपाणी तसेच शाळेच्या प्राचार्य संगीता राउतजी यांनी विद्यार्थिनींचे कौतुक करून अभिनंदन केले. या यशामुळे ध्रुव ग्लोबल स्कूल, नांदेच्या कला आणि सांस्कृतिक क्षेत्रातील उत्कृष्टतेची परंपरा अधिक दृढ झाली आहे.


