पुणे, दि. २ (जिमाका, वृत्त सेवा): महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत राज्यभर राबविण्यात येणाऱ्या मध केंद्र (मधमाशीपालन) योजनेसाठी पात्र व्यक्ती व संस्थांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.
या योजनेअंतर्गत मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरूपात ५० टक्के अनुदान, शासनाच्या हमीभावाने मध खरेदी, विशेष प्रशिक्षण तसेच मधमाशा संरक्षण व संवर्धनाबाबत जनजागृतीची सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
या योजनेमध्ये वैयक्तिक मधपाळ, प्रगतिशील मधपाळ केंद्रचालक तसेच नोंदणीकृत संस्थांना निर्धारित पात्रता व अटींच्या अधीन राहून अर्ज करता येणार आहेत. लाभार्थ्यांनी प्रशिक्षण पूर्ण करणे व मंडळाकडे बंधपत्र सादर करणे अनिवार्य राहील.
योजनेबाबत अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, जिल्हा कार्यालय, जुना पुणे-मुंबई रस्ता, शासकीय दूध डेअरीसमोर, पुणे येथे किंवा दूरध्वनी क्रमांक ०२०-२५८११८५९ वर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
0000


