Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedक्रेडाई पुणेकडून मान्सून काळातील वाहतूक व्यवस्थापनासाठी पुन्हा पुढाकार; पुणे वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी...

क्रेडाई पुणेकडून मान्सून काळातील वाहतूक व्यवस्थापनासाठी पुन्हा पुढाकार; पुणे वाहतूक पोलिसांच्या मदतीसाठी १०० ट्रॅफिक वॉर्डन्सची नियुक्ती

 

पुणे, ३ जुलै २०२६: मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील वाहतूक व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्यासाठी क्रेडाई पुणेने पुणे वाहतूक पोलिसांसोबत पुन्हा एकदा सहकार्याचा हात पुढे केला आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त, पुणे यांच्यासोबत करण्यात आलेल्या सामंजस्य कराराअंतर्गत (MoU), क्रेडाई पुणेतर्फे जुलै ते सप्टेंबर २०२६ या कालावधीत १०० प्रशिक्षित ट्रॅफिक वॉर्डन्स पुणे वाहतूक पोलिसांच्या सेवेत कार्यरत राहणार आहेत.

या उपक्रमाचा औपचारिक शुभारंभ ट्रॅफिक वॉर्डन्सच्या दीक्षांत समारंभाने करण्यात आला. त्यानंतर या सर्व वॉर्डन्सना अधिकृतपणे पुणे वाहतूक पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. यावेळी श्री अमितेश कुमार, आयपीएस, पोलीस आयुक्त, पुणे शहर; श्री संजय दराडे, आयपीएस, सहपोलीस आयुक्त; श्री मनोज पाटील, आयपीएस, अतिरिक्त पोलीस आयुक्त, पुणे (पूर्व); डॉ. संदीप भाजीभाकरे, आयपीएस, पोलीस उपायुक्त, वाहतूक शाखा, पुणे; श्री मनीष जैन, अध्यक्ष, क्रेडाई पुणे; श्री संजय देशपांडे, संयोजक – पोलीस समिती, क्रेडाई पुणे; तसेच कर्नल कुमार रामचंद्रन (निवृत्त), महासंचालक, क्रेडाई पुणे उपस्थित होते.

मान्सून काळात मुसळधार पाऊस, सुरू असलेली रस्ते व मेट्रोची कामे तसेच वाढती वाहतूक कोंडी यामुळे वाहतूक व्यवस्थापनावर अतिरिक्त ताण येतो. अशा परिस्थितीत हे अतिरिक्त ट्रॅफिक वॉर्डन्स पुणे वाहतूक पोलिसांना महत्त्वाची मदत करतील. शहरातील प्रमुख चौकांमध्ये त्यांची नियुक्ती करण्यात येणार असून वाहतुकीचा सुरळीत प्रवाह राखणे, कोंडी कमी करणे तसेच गर्दीच्या वेळेत आणि मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान नागरिकांच्या सुरक्षिततेस हातभार लावणे, ही त्यांची प्रमुख जबाबदारी असेल.

कर्तव्यावर रुजू होण्यापूर्वी सर्व १०० ट्रॅफिक वॉर्डन्सनी दोन दिवसांचे विशेष प्रशिक्षण पूर्ण केले असून, त्यामध्ये वाहतूक व्यवस्थापनाचे नियम, प्रत्यक्ष कार्यपद्धती आणि मैदानी कामकाजाची माहिती देण्यात आली.

हे सर्व ट्रॅफिक वॉर्डन्स करार पद्धतीवर कार्यरत राहतील. ते दररोज सकाळी ८.०० ते रात्री ८.०० या वेळेत नियोजित विश्रांतीसह सेवा देतील. कार्यक्षमता वाढविण्याच्या दृष्टीने जवळपास निम्म्या वॉर्डन्सची नियुक्ती त्यांच्या निवासस्थानाजवळील भागात करण्यात येणार असून, उर्वरित वॉर्डन्सना पुणे वाहतूक पोलिसांच्या गरजेनुसार शहरातील महत्त्वाच्या चौकांमध्ये आणि संवेदनशील ठिकाणी तैनात करण्यात येईल.

याविषयी बोलताना क्रेडाई पुणेचे अध्यक्ष श्री मनीष जैन म्हणाले, “क्रेडाई पुणेच्या दृष्टीने शहराच्या विकासात योगदान देणे म्हणजे केवळ घरे बांधणे नव्हे. मान्सून काळात पुणे वाहतूक पोलिसांच्या कार्याला बळ देण्यासाठी या उपक्रमात सहभागी होताना आम्हाला आनंद होत आहे. प्रभावी वाहतूक व्यवस्थापनाचा लाभ प्रत्येक नागरिकाला होतो. अतिरिक्त मनुष्यबळाच्या माध्यमातून पुणेकरांचा दैनंदिन प्रवास अधिक सुरक्षित, सुलभ आणि सुरळीत होण्यास मदत होईल, अशी आम्हाला अपेक्षा आहे.”

उद्घाटनप्रसंगी पुणे शहराचे पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार, आयपीएस म्हणाले, “या उपक्रमाद्वारे पुणे वाहतूक पोलिसांना सहकार्य केल्याबद्दल मी क्रेडाई पुणेचे सर्व सदस्य, विशेषतः श्री मनीष जैन आणि श्री संजय देशपांडे यांचे मनःपूर्वक आभार मानतो. सर्व ट्रॅफिक वॉर्डन्सना प्रत्यक्ष सेवेत रुजू होण्यापूर्वी आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यांनी या प्रशिक्षणाचा प्रभावी वापर करून प्रामाणिकपणे आणि शिस्तबद्ध पद्धतीने आपली जबाबदारी पार पाडावी. नागरिकांशी नेहमी नम्र, सन्मानपूर्वक आणि सौजन्यपूर्ण वर्तन ठेवावे. मान्सून काळात तसेच मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यान शहरातील वाहतूक व्यवस्थापन अधिक सक्षम करण्यामध्ये त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे ठरेल.”

सामंजस्य कराराच्या अंमलबजावणीत महत्त्वाची भूमिका बजावणारे अतिरिक्त पोलीस आयुक्त, पुणे (पूर्व) श्री मनोज पाटील, आयपीएस म्हणाले, “मान्सून काळातील दैनंदिन वाहतूक नियमनासोबतच येत्या काही महिन्यांत होणाऱ्या पालखी सोहळा, गणेशोत्सव आणि इतर मोठ्या सार्वजनिक कार्यक्रमांदरम्यानही हे ट्रॅफिक वॉर्डन्स वाहतूक व्यवस्थापनात महत्त्वाची भूमिका बजावतील. अशा कार्यक्रमांमध्ये वाहनांची मोठ्या प्रमाणात होणारी वाढ आणि नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांचे सहकार्य अत्यंत उपयुक्त ठरेल.”

हा उपक्रम शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या हितासाठी सार्वजनिक यंत्रणांसोबत खांद्याला खांदा लावून काम करण्याच्या क्रेडाई पुणेच्या सातत्यपूर्ण बांधिलकीचे प्र

तीक आहे.

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments