Saturday, August 22, 2026
Google search engine
HomeUncategorizedसादरीकरणाबरोबर अध्ययनामुळे लोककलेचे संवर्धन अभिजीत गोखले यांचे मत : शाहीर हिंगे लोककला...

सादरीकरणाबरोबर अध्ययनामुळे लोककलेचे संवर्धन अभिजीत गोखले यांचे मत : शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या शाहिरी भवन गुरुकुलाचा उद्घाटन सोहळा

पुणे : सादरीकरणातून कला जशी जिवंत राहते आणि तिचे संवर्धन होते, तसेच तिला जेव्हा अध्ययनाची जोड मिळते, तेव्हा त्या कलेचा उद्देश समाजापर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचतो. लोककलेच्या परंपरेचे स्वरूप काळानुरूप बदलत आहे आणि भविष्यातही बदलत राहणार आहे. मात्र, तिला अध्ययनाची जोड मिळाल्यास तिच्या मूळ भावात कोणताही बदल न होता काळानुसार निर्माण होणाऱ्या गरजा आणि मागणी पूर्ण करणे अधिक सोपे होईल, असे मत संस्कार भारतीचे अखिल भारतीय संघटन मंत्री अभिजीत गोखले यांनी व्यक्त केले.

 

शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीच्या शाहिरी भवन गुरुकुलाच्या उद्घाटन सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे रा. स्व. संघाचे संघचालक नानासाहेब जाधव, प्रबोधिनीचे अध्यक्ष आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे आदी उपस्थित होते. सोमवार पेठेतील शाहिरी भवन गुरुकुलाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर स्वरूपवर्धनी संस्थेच्या सभागृहात विद्यार्थ्यांचे पोवाडा सादरीकरण झाले. यावेळी भवनासाठी सहाय्य करणाऱ्या संस्था व व्यक्तींचा सन्मान करण्यात आला.

 

नानासाहेब जाधव म्हणाले, आपले विचार समर्थपणे, ताकदीने आणि समर्पक शब्दांत मांडतो तो शाहीर. या कलेच्या सादरीकरणातून शाहीर समाजातील प्रश्न परखड शब्दांत मांडत असतात. या कलेच्या संवर्धनासाठी तसेच अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी शाहिरी भवन गुरुकुल अत्यंत महत्त्वपूर्ण ठरणार आहे. लोककलेच्या संवर्धनातील मोलाचे पाऊल आहे,” असेही त्यांनी सांगितले.

 

आचार्य शाहीर हेमंतराजे मावळे म्हणाले, प्रबोधिनीतर्फे कलासंवर्धनासाठी गेल्या तीस वर्षांपासून मोफत पोवाडा वर्गाचे प्रशिक्षण विद्यार्थ्यांना दिले जात आहे. त्याचे पुढचे पाऊल म्हणजे शाहिरी भवन गुरुकुल आहे. स्व. गुरुवर्य शाहीररत्न किसनराव हिंगे यांनी शाहिरीकलेसाठी पुण्यामध्ये आपली एक वास्तू असावी असा ध्यास घेतला होता. त्यांचे हे स्वप्न पूर्ण करीत आहोत. शाहिरीवर अध्ययन करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हे भवन नेहमीच खुले असणार आहे, असेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अक्षदा इनामदार यांनी व आभार प्रदर्शन अरुणकुमार बाभुळगांवकर यांनी

केले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments