Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedराष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचा २३ व २४ जुलै रोजी...

राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा विजया रहाटकर यांचा २३ व २४ जुलै रोजी पुणे दौरा* *महिला सुरक्षा, डिजिटल सक्षमीकरण, करिअर मार्गदर्शन आणि संवेदनशील पत्रकारितेवर विविध कार्यक्रमांचे आयोजन*

पुणे, दि. २२ (जिमाका, वृत्तसेवा): राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्षा श्रीमती विजया रहाटकर या २३ व २४ जुलै २०२६ रोजी पुण्याच्या दोन दिवसीय दौऱ्यावर येत असून, महिला सुरक्षा, डिजिटल सक्षमीकरण, करिअर मार्गदर्शन, कौटुंबिक समुपदेशन आणि संवेदनशील पत्रकारिता या विषयांवर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

२३ जुलै रोजी दुपारी १२.३० ते २ वा. यशदा, बाणेर रोड येथे महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या सहकार्याने पाठलाग आणि सायबर पाठलाग (स्टॉकिंग आणि सायबर स्टॉकिंग) प्रतिबंध विषयावरील जनजागृती कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात महिलांविरोधातील गुन्ह्यांबाबत कायदेशीर संरक्षण, तक्रार नोंदविण्याची प्रक्रिया आणि संबंधित यंत्रणांमधील समन्वय याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

त्यानंतर दुपारी २.३० ते ४ वा. येरवडा येथील अण्णा भाऊ साठे सभागृहात राष्ट्रीय महिला आयोगाच्या SHEServes उपक्रमांतर्गत तरुणींना सैन्य, नौदल आणि हवाई दलातील करिअरच्या संधी, पात्रता, निवड प्रक्रिया आणि तयारीबाबत तज्ज्ञांकडून मार्गदर्शन केले जाणार आहे.

सायंकाळी ४.३० ते ५.३० वा. ज्ञान प्रबोधिनी येथे प्री-मॅरिटल काउन्सेलिंग सेंटरचे उद्घाटन करण्यात येणार असून, विवाहपूर्व समुपदेशन, संवाद कौशल्य आणि सुदृढ कौटुंबिक नातेसंबंधासाठी आवश्यक मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येईल.

दि. २४ जुलै रोजी सकाळी ११ ते १२ वा. विश्वकर्मा विद्यापीठ येथे राष्ट्रीय महिला आयोगाच्या ‘यशोदा एआय’ उपक्रमांतर्गत बचत गटातील महिलांसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल साक्षरता, सायबर सुरक्षा, ऑनलाइन आर्थिक सुरक्षितता आणि डीपफेक्ससह नव्या तंत्रज्ञानाच्या सुरक्षित वापराबाबत प्रशिक्षण दिले जाणार आहे.

यानंतर दुपरी १२.३० ते १.३० वा. रानडे इन्स्टिट्यूट ऑफ जर्नालिझम येथे पत्रकारिता विद्यार्थ्यांसाठी ‘जेंडर जस्टिस आणि संवेदनशील पत्रकारिता’ या विषयावरील संवाद कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून, महिलांविषयी संवेदनशील वृत्तांकन, जबाबदार पत्रकारिता आणि सामाजिक उत्तरदायित्व यावर चर्चा होणार आहे.

या दोन दिवसीय दौऱ्यातील कार्यक्रमांद्वारे महिला सुरक्षा, आधुनिक तंत्रज्ञानाचा सुरक्षित वापर, करिअरच्या संधी, कौटुंबिक समुपदेशन तसेच महिलांसाठी उपलब्ध संस्थात्मक मदत व्यवस्था अधिक प्रभावी करण्यावर भर दिला जाणार असल्याचे राष्ट्रीय महिला आयोगाने कळविले आहे.
0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments