पुणे , दि. २४ : महाराष्ट्र शासनाच्या महसूल व वन विभाग, जिल्हाधिकारी कार्यालय, पुणे तसेच आंबेगाव तालुक्यातील विविध शासकीय विभागांच्या संयुक्त विद्यमाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल अभियान’ अंतर्गत विधानसभा मतदारसंघस्तरीय समाधान शिबिराचे आयोजन सोमवार, दि. २७ जुलै २०२६ रोजी सकाळी ११ वाजता शिवगिरी मंगल कार्यालय, मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे येथे करण्यात आले आहे. या शिबिराचे उद्घाटन आमदार दिलीप वळसे पाटील यांच्या हस्ते होणार असून, खासदार डॉ. अमोल कोल्हे तसेच माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
ग्रामीण भागातील नागरिकांना विविध शासकीय सेवा व योजनांचा लाभ शासकीय कार्यालयांचे उंबरठे न झिजवता एकाच ठिकाणी व एकाच दिवशी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी श्री. जितेंद्र डुडी, अपर जिल्हाधिकारी श्री. सतीश राऊत, उपविभागीय अधिकारी श्रीमती अर्चना तांबे तसेच तहसीलदार श्री. राहुल सारंग यांच्या मार्गदर्शनाखाली या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
या समाधान शिबिरामध्ये महसूल विभागामार्फत उत्पन्न, जात, नॉन-क्रीमी लेअर, अधिवास व राष्ट्रीयत्व प्रमाणपत्रे; अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत नवीन शिधापत्रिका, नाव समाविष्ट करणे अथवा वगळणे आणि ‘एक देश-एक शिधापत्रिका’ सुविधा; संजय गांधी निराधार योजनेंतर्गत विविध सामाजिक सुरक्षा योजनांचे लाभ; महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६ च्या कलम ८५ (२) अंतर्गत संमतीने फाळणी, स्वतंत्र ७/१२ उतारा, शेतकरी दाखला व बिनशेती प्रमाणपत्र; निवडणूक विभागामार्फत नवीन मतदार नोंदणी, नाव, वय व फोटो दुरुस्ती तसेच मतदार यादी शुद्धीकरण; कृषी व फलोत्पादन विभागामार्फत महाडीबीटी योजना, कृषी यंत्रसामग्री अनुदान, ठिबक व तुषार सिंचन, शेततळे योजना तसेच गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा योजना; आरोग्य विभागामार्फत आयुष्मान भारत कार्ड, आभा (ABHA) हेल्थ आयडी व जननी सुरक्षा योजना; पशुसंवर्धन विभागामार्फत मुख्यमंत्री ग्रामीण पशुधन उद्योजकता योजना, शेळी-मेंढी व दुधाळ जनावरे वितरण तसेच कडबाकुट्टी यंत्र अनुदान; ग्रामपंचायत विभागामार्फत जन्म, मृत्यू, विवाह व बीपीएल दाखले, वैयक्तिक शौचालय अनुदान आणि ग्रामीण घरकुल योजनांची माहिती; तसेच महिला व बाल विकास विभागामार्फत डॉ. कमला सोहोनी योजना, प्रधानमंत्री मातृ वंदना योजना आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बालसंगोपन योजनेचा लाभ नागरिकांना उपलब्ध करून दिला जाणार आहे.
प्रशासनाने नागरिकांनी आवश्यक कागदपत्रांसह मोठ्या संख्येने उपस्थित राहून या समाधान शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले आहे.


