*तळेगाव येथील टीजीएच ऑन्कोलाइफ कॅन्सर सेंटरमधील डॉक्टरांच्या प्रयत्नांना यश*
*पुणे* : तळेगाव येथील टीजीएच ऑन्कोलाइफ कॅन्सर सेंटरमध्ये 26 आठवड्यांच्या गर्भवती महिलेवर दुर्मिळ स्तनाच्या कर्करोगाची (हाय-ग्रेड ब्रेस्ट सारकोमा) यशस्वी शस्त्रक्रिया करून आई आणि गर्भातील बाळाचे प्राण वाचविण्यात डॉक्टरांच्या टीमला यश आले आहे. २७ वर्षीय गर्भवती महिलेची उजव्या स्तनाची (राईट मास्टेक्टॉमी) शस्त्रक्रिया गर्भपात न करता सुरक्षितपणे पार पाडण्यात आली. स्तनातील सारकोमा हा स्तनाच्या कर्करोगाच्या एकूण रुग्णांपैकी एक टक्क्यांहूनही कमी रुग्णांमध्ये आढळणारा अत्यंत दुर्मिळ प्रकार आहे.
टीजीएच ऑन्कोलाइफ कॅन्सर सेंटरचे सर्जिकल ऑन्कोलॉजिस्ट डॉ. उत्कर्ष अजगावकर, सर्जन डॉ. मधुरा तसेच भूलतज्ज्ञ विभागाचे प्रमुख डॉ. विश्वास कौल यांच्या नेतृत्वाखाली तज्ज्ञांच्या टीमने ही उच्च जोखमीची शस्त्रक्रिया यशस्वीरीत्या पार पाडली.
लोणावळ्यातील रहिवासी आणि व्यवसायाने शिंपी असलेल्या २७ वर्षीय सोनू कुमारी या आपल्या दुसऱ्या बाळाच्या आगमनाची आतुरतेने वाट पाहत होत्या. सुमारे सहा महिन्यांपूर्वी त्यांच्या उजव्या स्तनामध्ये गाठ जाणवली होती. मात्र, गर्भधारणेदरम्यान शरीरात होणाऱ्या सामान्य बदलांमुळे ती गाठ केवळ नेहमीचा बदल समजून त्यांनी त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. काही दिवसांपूर्वी त्यांना सारखा ताप येऊ लागला आणि स्तनावरील जखम गंभीर होऊ लागल्याने कुटुंबीयांनी त्यांना तळेगाव येथील टीजीएच ऑन्कोलाइफ कॅन्सर सेंटरमध्ये दाखल केले. तपासणीनंतर त्यांना स्तनाचा दुर्मिळ आणि आक्रमक प्रकारातील कर्करोगाचे निदान झाले.
*डॉ. उत्कर्ष अजगावकर म्हणाले* , रुग्ण आमच्याकडे आल्या तेव्हा त्यांच्या उजव्या स्तनामध्ये वेगाने वाढणारी गाठ, सुमारे ८ बाय ८ सेंटीमीटर आकाराची संक्रमित जखम आणि सतत ताप येणे अशी गंभीर लक्षणे होती. बायोप्सीमध्ये हाय-ग्रेड ब्रेस्ट सारकोमा असल्याचे स्पष्ट झाले. स्तनातील सारकोमा हा अत्यंत दुर्मिळ प्रकारचा कर्करोग असून, गर्भधारणेदरम्यान तो क्वचितच आढळतो. या कर्करोगाचे नेमके कारण अद्यापही ज्ञात नाही. संसर्ग वाढल्यास तो रक्तामध्ये पसरून सेप्सिस किंवा सेप्टिक शॉक निर्माण होण्याचा धोका होता, ज्यामुळे आई आणि गर्भातील बाळ दोघांच्याही जीवाला गंभीर धोका निर्माण झाला असता.
ते पुढे म्हणाले, इस प्रकारच्या कर्करोगामध्ये केमोथेरपीचा फारसा उपयोग होत नसल्याने शस्त्रक्रिया हा जीव वाचविण्याचा एकमेव पर्याय होता. गर्भधारणेमुळे पीईटी स्कॅन आणि रेडिएशनवर आधारित इतर काही तपासण्या करता येत नव्हत्या. त्यामुळे योग्य वैद्यकीय निर्णय घेणे अधिक महत्त्वाचे होते.
रुग्ण आणि तिच्या कुटुंबीयांशी सविस्तर चर्चा केल्यानंतर डॉक्टरांच्या टीमने उपचाराचे नियोजन केले. संसर्गामुळे सेप्सिस होण्यापूर्वी तो रोखणे आणि त्याचवेळी गर्भधारणा सुरक्षित ठेवणे हे उपचाराचे प्रमुख उद्दिष्ट होते. 2 जुलै रोजी रुग्णाच्या उजव्या स्तनाची मास्टेक्टॉमी शस्त्रक्रिया करण्यात आली. ही शस्त्रक्रिया अवघ्या एका तासात यशस्वीरीत्या पूर्ण करण्यात आली. संपूर्ण शस्त्रक्रियेदरम्यान गर्भातील बाळाच्या प्रकृतीवर सतत लक्ष ठेवण्यात आले.
भूलतज्ज्ञ विभागाचे प्रमुख डॉ. विश्वास कौल म्हणाले, अशा प्रकरणात कर्करोगाची शस्त्रक्रिया करताना आई आणि गर्भातील बाळ या दोघांच्याही सुरक्षिततेची जिम्मेदारी आमच्यावर असते. शस्त्रक्रियेदरम्यान आईचा रक्तदाब, ऑक्सिजनची पातळी आणि इतर सर्व जीवनावश्यक बाबींवर बारकाईने लक्ष ठेवण्यात आले. तसेच गर्भातील बाळाच्या प्रकृतीचेही सतत निरीक्षण केले जात होते. भूलतज्ज्ञ, सर्जिकल, प्रसूती व नवजात शिशू तज्ज्ञांच्या समन्वयामुळे ही शस्त्रक्रिया सुरक्षितपणे पार पाडता आली.
शस्त्रक्रियेनंतर रुग्णाच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून ४ जुलै रोजी तिला रुग्णालयातून घरी सोडण्यात आले. सध्या तिची अँटीबायोटिक्सची औषधे बंद करण्यात आली असून, तिने दोन वेळा फॉलो-अप तपासणीही पूर्ण केली आहे. आता आई आणि गर्भातील बाळ दोघांचीही प्रकृती उत्तम असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.
*डॉ. उत्कर्ष अजगावकर म्हणाले* , हाय-ग्रेड ब्रेस्ट सारकोमा हा अतिशय वेगाने वाढणारा कर्करोग आहे. त्यामुळे वेळीच निदान आणि उपचार करणे अत्यंत आवश्यक आहे. गर्भधारणेदरम्यान स्तनामध्ये गाठ आढळल्यास किंवा ती झपाट्याने वाढत असल्यास तातडीने तज्ज्ञांचा सल्ला घेणे गरजेचे आहे. बाळाचा जन्म सुरक्षितपणे झाल्यानंतर रुग्णेची पीईटी स्कॅनद्वारे पुढील तपासणी करण्यात येईल. कर्करोग शरीराच्या इतर भागांमध्ये पसरला आहे का, यानुसार पुढील केमोथेरपी किंवा रेडिओथेरपीसारखे उपचार केले जातील.
आपल्या भावना व्यक्त करताना सोनू कुमारी म्हणाल्या, गर्भधारणेदरम्यान मला स्तनाचा कर्करोग झाल्याचे समजल्यावर माझ्यासाठी तो अत्यंत धक्कादायक क्षण होता. माझ्या स्वतःच्या जीवासाठी लढताना माझ्या बाळाला काही होईल का, हीच सर्वात मोठी भीती होती. टीजीएच ऑन्कोलाइफ कॅन्सर सेंटरच्या डॉक्टरांनी माझ्या आणि माझ्या बाळाच्या सुरक्षिततेसाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या पाठिंब्यामुळेच मी या कठीण प्रसंगाला धैर्याने सामोरे जाऊ शकले. आज माझे बाळ सुरक्षित असून मी देखील हळूहळू बरी होत आहे, यापेक्षा मोठा आनंद दुसरा नाही.
*डॉ. उत्कर्ष अजगावकर यांनी सांगितले की,* हे दुर्मिळ आणि उच्च जोखमीचे वैद्यकीय प्रकरण वेळीच निदान, बहुविद्याशाखीय उपचारपद्धती आणि रुग्णकेंद्रित उपचारांचे महत्त्व अहारेखित करते. टीजीएच ऑन्कोलाइफ कॅन्सर सेंटरमध्ये प्रत्येक रुग्णासाठी वैयक्तिक गरजेनुसार उपचारांचे नियोजन केले जाते. आई आणि गर्भातील बाळ दोघांचेही प्राण वाचवून हा दुर्मिळ कर्करोग यशस्वीपणे हाताळणे हे आधुनिक आणि संवेदनशील कर्करोग उपचारसेवेचे एक उत्तम उदाहरण आहे.


