Saturday, October 3, 2026
Google search engine
HomeUncategorizedसैनिक पैशासाठी नव्हे, तर मातृभूमीप्रती असलेल्या प्रेमापोटी लढतात वायुदलाचे निवृत्त विंग कमांडर...

सैनिक पैशासाठी नव्हे, तर मातृभूमीप्रती असलेल्या प्रेमापोटी लढतात वायुदलाचे निवृत्त विंग कमांडर तथा आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण तज्ज्ञ विनायक पुरुषोत्तम डावरे यांचे प्रतिपादन

गोरक्षक सुधीर बहिरवाडे यांना साहस पुरस्कार प्रदान
साहस दिनानिमित्त हर घर सावरकर प्रतिष्ठान, डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि पुणे नगर हिंदुसभा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन

पुणे : सैन्यातील रेजिमेंटल भरतीमुळे एकात्मतेची भावना दृढ होते. सैनिक पैशासाठी नव्हे, तर मातृभूमीप्रती असलेल्या प्रेमापोटी लढतात. ते धर्म आणि देशाच्या रक्षणासाठी लढत असतात, असे प्रतिपादन भारतीय वायुदलाचे निवृत्त विंग कमांडर तथा आंतरराष्ट्रीय नागरी उड्डाण तज्ज्ञ विनायक पुरुषोत्तम डावरे यांनी केले.

स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी १९१० साली मार्सेलिस बंदरात घेतलेल्या ऐतिहासिक समुद्रउडीच्या स्मरणार्थ हर घर सावरकर प्रतिष्ठान, डेक्कन एज्युकेशन सोसायटी आणि पुणे नगर हिंदुसभा यांच्या संयुक्त विद्यमाने साहस दिनानिमित्त पुरस्कार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. डेक्कन जिमखाना येथील आयएमडीआर कॉलेजच्या स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात झालेल्या या कार्यक्रमात यावर्षीचा साहस पुरस्कार गोरक्षक सुधीर महादेव बहिरवाडे यांना प्रदान करण्यात आला.

कार्यक्रमाला विनायक डावरे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तसेच हिंदू आध्यात्मिक सेवा संस्था, पुणे शहराचे अध्यक्ष कृष्णकुमार गोयल, सात्यकी सावरकर आणि विद्याधर नारगोलकर यांची प्रमुख उपस्थिती होती. सन्मानपत्र, स्वातंत्र्यवीर सावरकर यांची मूर्ती असे पुरस्काराचे स्वरूप होते.

यावेळी विनायक डावरे म्हणाले, महाराष्ट्रापेक्षा उत्तर भारतात स्वातंत्र्यवीर सावरकरांना अधिक मान दिला जातो. उत्तर प्रदेशात त्यांचे मंदिरही उभारण्यात आले आहे. हिंदू समाजात एकता निर्माण करण्यासाठी स्वातंत्र्यवीर सावरकरांनी आयुष्यभर कार्य केले. बटेंगे तो कटेंगे, एक रहेंगे तो नेक रहेंगे हा संदेश लक्षात ठेवून हिंदू समाजाने एकजूट राखली पाहिजे. ही गोष्ट स्वातंत्र्यवीर सावरकरांनी शंभर वर्षांपूर्वीच ओळखली होती.

यावेळी सुधीर बहिरवाडे म्हणाले, जातिवाद पूर्वीपासून नव्हता; तो नंतर समाजात पेरला गेला. जातिभेद जाणीवपूर्वक बिंबवण्यात आला. इतिहासात हिंदू धर्मावर अनेक आघात झाले आहेत. आज लव्ह जिहादपेक्षाही लँड जिहाद हा अधिक गंभीर आणि महत्त्वाचा विषय आहे. घराघरांत सावरकर घडले, तर हिंदू राष्ट्राची संकल्पना साकार होण्यासाठी फार काळ लागणार नाही.

कृष्णकुमार गोयल, सात्यकी सावरकर यांनीही मनोगत व्यक्त केले. अश्विनी कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. सुजाता बाबरस यांनी आभार मानले.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments