पुणे, 27 जुलै २०२६: सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नगर रोड – मणिपाल हॉस्पिटल्सच्या नेटवर्क हॉस्पिटलमधील डॉक्टरांनी एका ३० वर्षीय आयटी व्यावसायिकाचा बाईक अपघातात गंभीरपणे कापलेला उजवा अंगठा यशस्वीपणे पुन्हा जोडला. या अपघातामुळे त्याला क्रश आणि रोटेशनल एव्हल्शन प्रकारची गंभीर दुखापत झाली होती. अपघातानंतर चार तासांच्या आत पाच तासांची आपत्कालीन मायक्रोसर्जरी करण्यात आली, ज्यामुळे अंगठ्याचा रक्तप्रवाह पुन्हा सुरू झाला आणि अंगठा वाचवण्याची शक्यता मोठ्या प्रमाणात वाढली.
रुग्ण त्याची मोटरसायकल स्वच्छ करत असताना हा अपघात झाला. मागील चाक अचानक फिरल्यामुळे त्याचा अंगठा आऱ्यांमध्ये अडकला आणि पूर्णपणे उपटून वेगळा झाला. त्याला तात्काळ सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नगर रोड येथे आणण्यात आले, जिथे सर्जन्सनी त्वरित दुखापतीची तपासणी केली आणि यशस्वी अंगठा पुनर्रोपणासाठी अत्यंत महत्त्वाच्या वेळेच्या मर्यादेत तातडीची मायक्रोसर्जरी केली. डॉक्टरांनी या दुखापतीचे निदान क्रश आणि रोटेशनल एव्हल्शन दुखापत असे केले. अपघाताच्या तीव्रतेमुळे प्रभावित भागातील रक्तवाहिन्या आणि मज्जातंतूंचे गंभीर नुकसान झाले होते. यामुळे ही प्रक्रिया सोप्या पद्धतीने कापलेला अवयव पुन्हा जोडण्यापेक्षा अधिक आव्हानात्मक बनली होती. अंगठा हाताच्या एकूण कार्यक्षमतेत जवळपास ४० ते ५० टक्के योगदान देतो, ज्यामुळे अंगठ्याची कार्यक्षमता पुन्हा मिळवणे आणि हाताची हालचाल पूर्ववत राखण्याची शक्यता वाढवण्यासाठी वेळेवर उपचार करणे अत्यंत महत्त्वाचे होते.
या केसबाबत सांगताना सह्याद्रि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नगर रोड,मणिपाल हॉस्पीटलचे नेटवर्क हॉस्पीटल येथील कन्सल्टंट प्लास्टिक, रिकन्स्ट्रक्टिव्ह आणि मायक्रोव्हॅस्कुलर सर्जन डॉ. सुमित सक्सेना म्हणाले, “रुग्णाचा अंगठा क्रश आणि रोटेशनल एव्हल्शन प्रकारच्या दुखापतीसह टोकाकडून कापला गेला होता, ज्यामुळे ही शस्त्रक्रिया नेहमीच्या अंगठा पुनर्रोपणापेक्षा बरीच गुंतागुंतीची झाली होती. पाच तासांच्या मायक्रोसर्जिकल प्रक्रियेदरम्यान, आम्ही हाड स्थिर केले, टेंडन्सची दुरुस्ती केली आणि ऑपरेटिंग मायक्रोस्कोपखाली रक्तवाहिन्या तसेच मज्जातंतूंची अत्यंत काळजीपूर्वक पुनर्रचना केली. मर्यादित हाड लहान करूनही धमन्या आणि शिरा पूर्णपणे उपटून निघाल्यामुळे त्या थेट जोडणे शक्य नव्हते, म्हणून आम्ही शरीराच्या दुसऱ्या भागातून व्हेन ग्राफ्ट काढून दोष दूर केला आणि अंगठ्याचा रक्तप्रवाह पूर्ववत केला. इतक्या टोकाच्या भागात व्हेन ग्राफ्टिंग करणे, जिथे रक्तवाहिन्या अत्यंत लहान असतात, तांत्रिकदृष्ट्या अत्यंत आव्हानात्मक असते आणि त्याची गरज क्वचितच भासते. यशस्वी निकाल मिळवण्यात वेळेवर केलेल्या उपचारांनी महत्त्वाची भूमिका बजावली.”
जर्नल ऑफ हँड सर्जरीमध्ये प्रसिद्ध झालेल्या आणि यूएस नॅशनल लायब्ररी ऑफ मेडिसिन (पबमेड सेंट्रल) वर उपलब्ध असलेल्या सिस्टिमॅटिक रिव्ह्यूनुसार, क्रश-कट (८० टक्के) आणि क्रश-एव्हल्शन दुखापतींच्या (७५ टक्के) तुलनेत कापल्या गेलेल्या अवयवांच्या पुनर्रोपणाचा (९२ टक्के) यशस्वी दर लक्षणीयरित्या जास्त होता. हे निष्कर्ष क्रश-एव्हल्शन दुखापतींची वाढती गुंतागुंत अधोरेखित करतात, जिथे रक्तवाहिन्या, मज्जातंतू आणि सभोवतालच्या मऊ उतींचे व्यापक नुकसान झाल्यामुळे रक्तप्रवाह पूर्ववत करण्यासाठी आणि यशस्वी पुनर्रोपणाची शक्यता वाढवण्यासाठी व्हेन ग्राफ्टिंगसह प्रगत मायक्रोसर्जिकल पुनर्रचनेची आवश्यकता असते.
हॉस्पिटलची रिकन्स्ट्रक्टिव्ह मायक्रोसर्जरी टीम दरवर्षी अंगठा आणि बोटांच्या पुनर्रोपणाच्या जवळपास पाच ते सहा केसेसची हाताळणी करते. कापलेल्या अवयवांच्या तुलनेत क्रश-एव्हल्शन दुखापतींमध्ये यशस्वी दर कमी असला तरी, या टीमने हात आणि दोन्ही हातांच्या पुनर्रोपणासह अवयव वाचवण्याच्या अनेक गुंतागुंतीच्या प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडल्या
आहेत.


