मुंबई, २७ मार्च २०२४: भारतातील इलेक्ट्रिक वाहन क्रांतीचा पाया रचणारी कंपनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडने (टीपीईएम) हिंदुस्तान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडसोबत (एचपीसीएल), परस्पर सहयोगाने भारतभरात सार्वजनिक चार्जिंग स्टेशन्स स्थापन करण्यासाठी सामंजस्य ठराव (एमओयू) केला आहे. या सहयोगामार्फत, एचपीसीएलच्या विस्तृत इंधन स्थानक जाळ्याचा तसेच १.२ लाख टाटा ईव्ही भारतीय रस्त्यांवर धावत असल्यामुळे टीपीईएमकडे असलेल्या माहितीचा उपयोग करून घेऊन टाटा ईव्ही मालकांद्वारे वारंवार भेट दिल्या जाणाऱ्या इंधन स्थानकांवर चार्जर्स स्थापित केले जाणार आहेत. शिवाय, एचपीसीएल चार्जरच्या वापराबद्दलही माहिती नोंदवून घेणार आहे, जेणेकरून ग्राहकांचा अनुभव अधिक चांगला करण्यात मदत होईल.
भारतभरातील ईव्ही मालकांचा अनुभव अधिक चांगला करण्याचा प्रयत्न म्हणून टीपीईएम व एचपीसीएल यांच्यात झालेल्या या कराराचे उद्दिष्ट दोन्ही कंपन्यांच्या सहयोगामार्फत देशातील अधिकाधिक लोकांना इलेक्ट्रिक वाहन वापरण्यास प्रोत्साहन देणे हे आहे. या दोन्ही कंपन्या एका को-ब्रॅण्डेड आरएफआयडी कार्डामार्फत सोयीस्कर पेमेंट पद्धत आणण्यावरही विचार करत आहेत. त्यामुळे चार्जिंगचा अनुभव अधिक सुलभ होईल.
टीपीईएम ६८ टक्के वाट्यासह भारतातील ईव्ही बाजारपेठेतील आघाडीची कंपनी आहे, तर एचपीसीएलचे भारतभरात २१,५०० इंधन स्थानकांचे विस्तृत जाळे आहे आणि ही कंपनीही शाश्वत भविष्यकाळाप्रती वचनबद्ध आहे. डिसेंबर २०२४ पर्यंत ५,००० इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्स स्थापन करण्याचे लक्ष्य एचपीसीएलने ठेवले आहे. पोर्टफोलिओमध्ये चार ईव्ही उत्पादने असल्यामुळे टीपीईएमने भारतात ईव्ही परिसंस्थेच्या उदयाचे नेतृत्व केले आहे. गुरूग्राममध्ये आपले पहिले ईव्ही एक्स्क्लुजिव स्टोअर उघडण्यापासून ते भारतातील चार्जिंग संरचना वाढवण्यासाठी विविध चार्ज पॉइंट ऑपरेटर्ससोबत काम करण्यापर्यंत अनेक आघाड्यांवर कंपनी सक्रिय आहे. एचपीसीएलनेही भारतभरात एकूण ३,०५० ईव्ही चार्जिंग स्टेशन्स स्थापित केली आहेत. यात बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्सचाही समावेश आहे.
टाटा मोटर्स पॅसेंजर्स व्हेइकल लिमिटेड आणि टाटा पॅसेंजर इलेक्ट्रिक मोबिलिटी लिमिटेडचे चीफ स्ट्रॅटेजी ऑफिसर बालाजे राजन या सहयोगाबद्दल म्हणाले, “ईव्हींचा वापर जसा वाढेल, तशी विस्तृत व खात्रीशीर चार्जिंग पायाभूत सुविधांची उपलब्धता भारतात ईव्ही मुख्य धारेत आणण्यामध्ये निर्णायक भूमिका बजावेल. एचपीसीएलशी झालेल्या या धोरणात्मक भागीदारीमुळे भारतात ईव्ही परिसंस्था अधिक प्रगत करण्याप्रती आमची बांधिलकी अधोरेखित होते. यात चार्जिंग परिसंस्थेच्या वाढीची भूमिका महत्त्वाची आहे. वाढत्या ईव्ही ग्राहकवर्गाला सहाय्य करण्याच्या दृष्टीने पायाभूत सुविधा विकासाला सहाय्य करण्यासाठी हा सहयोग अत्यावश्यक आहे. टीपीईएमकडील ईव्ही वापराबाबतचे सखोल ज्ञान आणि एचपीसीएलचे विस्तृत राष्ट्रव्यापी जाळे यांचा लाभ घेत देशातील चार्जिंग पायाभूत सुविधा क्षेत्राचा कायापालट करण्याची संभाव्यता या भागीदारीमध्ये आहे.”
एचपीसीएलच्या रिटेल स्ट्रॅटेजी अँड बीडीचे मुख्य महाव्यवस्थापक देबाशीष चक्रवर्ती यांच्या मते, “एचपीसीएलने आपल्या २१,०००हून अधिक इंधन स्थानकांसह, भारताच्या ईव्ही बाजारपेठेत ६८ टक्के वाटा असलेल्या टाटा मोटर्सशी करार केला आहे. या कराराच्या माध्यमातून एचपीसीएलला टाटा मोटर्सच्या वाहन समूहाचा लाभ घेऊन ईव्ही चार्जिंग पायाभूत सुविधांचा धोरणात्मक विस्तार करणे शक्य होईल. चार्जिंगची अधिक मागणी असलेल्या भागातील पायाभूत सुविधा वाढवता येतील आणि त्यायोगे ईव्ही ग्राहकांना चार्जिंगबद्दल वाटणारी चिंता कमी करण्यात मदत करता येईल.”
व्यापक आणि सोयीस्कर चार्जिंग पायाभूत सुविधा ही ईव्ही स्वीकृतीला चालना देण्याची पूर्वअट आहे हे जगभरातील अभ्यासांमध्ये दिसून आले आहे. त्याचप्रमाणे चार्जिंग पायाभूत सुविधांमधील वाढीची परिणती विस्तृत ईव्ही स्वीकृतीमध्येही होणार आहे. हे साध्य करण्याच्या दृष्टीने, दोन्ही आघाडीच्या कंपन्यांमधील हा सहयोग भारतातील ईव्ही वाढीच्या पुढील टप्प्यात महत्त्वपूर्ण ठरेल हे नक्की.


