पुणे : प्रमाणपत्र मिळाल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावर दिसणारा आनंद आणि आत्मविश्वास हा या यात्रेतील भावनिक क्षण ठरला. कालपर्यंत चुकीच्या गोष्टींचे ‘रिल्स’ फॉरवर्ड करणाऱ्या काही मुलांच्या हातात आज पोलिसांनी दिलेले प्रमाणपत्र होते आणि तेच प्रमाणपत्र ते अभिमानाने इतरांपर्यंत पोहोचवत होते. एका दिवसात आयुष्य बदलत नसले तरी आयुष्य बदलण्याची दिशा नक्कीच बदलू शकते… ही दिशा मुलांना मिळाली संवाद परिवर्तन यात्रेतून.
विधिसंघर्षग्रस्त बालकांनी चुकीच्या मार्गाला लागू नये, त्यांच्या आयुष्याला सकारात्मक दिशा मिळावी, त्यांच्या मनातील क्षमता, स्वप्ने आणि आत्मविश्वास जागृत व्हावा, या उद्देशाने पुणे पोलीस आणि धनकवडी येथील आदर्श मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘संवाद परिवर्तन यात्रा – मूव्हींग इन्स्पिरेशन लॅब’ या अभिनव उपक्रमाचा शुभारंभ झाला.
या यात्रेचे उद्घाटन पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या हस्ते झाले. पु.ना. गाडगीळचे अजित गाडगीळ तसेच ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे यांच्या प्रमुख उपस्थितीत या यात्रेला सुरुवात झाली.
परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त डॉ. सागर कवडे यांच्या मार्गदर्शन व संकल्पनेतून तसेच आदर्श मित्र मंडळाचे उदय जगताप यांच्या संकल्पनेतून हा उपक्रम साकारला आहे. यावेळी ढोल-ताशा महासंघाचे पराग ठाकूर, ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर, ज्येष्ठ अभ्यासक आनंद सराफ, डॉ. मिलिंद भोई, ॲड. प्रताप परदेशी, शिरीष मोहिते, सुहास एकबोटे, अजय आबा पाटील, राजू नाईकवरे, अनिरुद्ध एवले, संजय भैलुमे, राजाभाऊ कदम तसेच आदर्श मित्र मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
उद्घाटनानंतर सुमारे ४० विधिसंघर्षग्रस्त बालकांनी ‘संवाद परिवर्तन यात्रा’च्या पहिल्या प्रवासाला सुरुवात केली.
यात्रेतील मुलांनी सर्वप्रथम टीव्हीएस शैलार मोटर्सच्या वर्कशॉप व ट्रेनिंग सेंटरला भेट दिली. प्रत्यक्ष प्रशिक्षण कसे दिले जाते, आधुनिक वर्कशॉपचे कामकाज कसे चालते, तांत्रिक कौशल्य आत्मसात केल्यानंतर करिअरच्या कोणत्या संधी उपलब्ध होऊ शकतात, याची माहिती मुलांनी प्रत्यक्ष अनुभवातून घेतली.
त्यानंतर मुलांनी ज्येष्ठ शिल्पकार विवेक खटावकर यांच्या कारखान्याला भेट दिली. कला, कौशल्य, मेहनत आणि सर्जनशीलतेच्या माध्यमातून स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करता येते, याचा अनुभव मुलांनी घेतला. यावेळी मुलांना गणपती मूर्ती निर्मितीचे प्राथमिक प्रशिक्षणही देण्यात आले.
यानंतर मुलांनी इतिहास संशोधन केंद्राला भेट दिली. पुणे, महाराष्ट्र आणि देशाचा इतिहास जाणून घेताना आपल्या पूर्वजांचे पराक्रम, धैर्य आणि त्याग यांची माहिती मुलांना मिळाली.
दिवसभरातील सहभागाबद्दल पुणे पोलीस आणि आदर्श मित्र मंडळातर्फे मुलांना प्रमाणपत्रे देण्यात आली. या कार्यक्रमाचे नियोजन सहाय्यक पोलीस आयुक्त कुंभार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनय पाटणकर आणि पोलीस निरीक्षक, गुन्हे शाखा समीर गायकवाड यांनी केले.
उदय जगताप म्हणाले, ‘संवाद परिवर्तन यात्रा’ ही केवळ सहल नसून संवादातून परिवर्तन, अनुभवातून शिकणे, प्रेरणादायी व्यक्तींकडून प्रेरणा घेणे, कौशल्यातून संधी शोधणे आणि नव्या भविष्याकडे वाटचाल करण्याचा उपक्रम आहे. या यात्रेत सहभागी झालेल्या ४० मुलांच्या मनात स्वतःच्या भविष्याबद्दल सकारात्मक विचार आणि नवी दिशा निर्माण करण्याचा प्रयत्न या माध्यमातून करण्यात आला.


