पुणे : गणेशोत्सव आणि पुणे हे संस्कृती, परंपरा व सामाजिक एकतेचे नाते आहे. पुण्याच्या गणेशोत्सवाकडे देशाचे लक्ष असते. पूर्वी लाऊड स्पीकरवर बंधने नव्हती, आता उच्च न्यायालयाने सर्वांचा विचार करून मर्यादा आखून दिल्या आहेत. त्यामुळे लाऊडस्पिकर, शाडू माती वापर, पर्यावरण संवर्धन याकडे लक्ष देत उत्सवाला चांगले स्वरूप यायला हवे. आपल्याला स्वराज्य मिळाले व त्याचे रूपांतर सुराज्यात कसे होईल, याकडे लक्ष द्यायचे आहे. सुराज्य करण्याची जबाबदारी आपल्या सर्वांची आहे, असे मत राज्याचे जलसंपदा व आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केले.
श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट, सुवर्णयुग तरुण मंडळातर्फे आयोजित राष्ट्रीय गणेशोत्सव स्पर्धा पुणे शहर महापालिका क्षेत्र विभाग पारितोषिक वितरण समारंभ गणेश कला क्रीडा मंच येथे पार पडला. यावेळी पुण्याच्या महापौर मंजुषा नागपुरे, सहा पोलीस आयुक्त संजय दराडे, ज्येष्ठ विचारवंत उल्हास पवार, परिमंडळ १ चे पोलीस उपायुक्त कृषिकेश रावले, ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, सरचिटणीस व आमदार हेमंत रासने, सहचिटणीस अमोल केदारी, सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण, सौरभ रायकर, यतिश रासने, मंगेश सूर्यवंशी, तुषार रायकर, राजाभाऊ पायमोडे आदी व्यासपीठावर उपस्थित होते.
भोसले मार्ग भवानी पेठेतील शिवाजी मित्र मंडळाने सलग दुस-या वर्षी प्रथम क्रमांक पटकाविला. तर, हडपसरमधील नवरंग मित्र मंडळ ट्रस्टने द्वितीय, अरण्येश्वर तावरे कॉलनीतील एकता मित्र मंडळ ट्रस्टने तृतीय, एरंडवण्यातील श्री शनि मारुती बाल गणेश मंडळाने चौथे तर नारायण पेठेतील संयुक्त प्रसाद मित्र मंडळाने पाचव्या क्रमांकाचे पारितोषिक पटकाविले.
गिरीश महाजन म्हणाले, आपण अनेक उत्सव साजरे करतो, त्यात डीजे लावले जातात, तरुणांमध्ये ड्रग्ज सेवनाचे प्रमाण वाढत आहे. तरुणाई भरकटत आहे की काय? असे आज वाटत असताना यापासून दूर राहून तरुणाईने प्रत्येक उत्सव चांगला होईल, याकडे लक्ष द्यायला हवे. उत्सवातील लाऊडस्पीकर ची बंधने पोलीस ठरवत नाहीत, ती सर्वोच्च न्यायालय ठरवते. त्यामुळे समाजातील सर्व घटकांचा विचार होत उत्सव साजरा होणे आवश्यक आहे, असे सांगत श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्ट तर्फे सुरु असलेल्या वैद्यकीय, शैक्षणिक, सामाजिक उपक्रमांचे त्यांनी कौतुक केले.
आमदार हेमंत रासने म्हणाले, उत्सवाला चांगली दिशा देण्याचे काम श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टच्या माध्यमातून सुरु आहे. पोलिसांनी उत्सवाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलायला हवा. नुसते दरडावून चालणार नाही, तर प्रत्येकाला सोबत घेऊन आपल्याला जावे लागेल. विसर्जन मिरवणूक किती वेळात संपणार याविषयी सुरुवातीला मिटिंग मध्ये चर्चा होते. हा केवळ मिरवणुकीचा उत्सव नसून दहा दिवसांसाठी आहे. धर्म, संस्कृती, परंपरा टिकली पाहिजे, याकरिता उत्सव आहे. त्यामुळे उत्सवात काम करणाऱ्या कार्यकर्त्याला त्रास देऊ नका, असे आवाहन यांनी पोलिसांना केले.
मंजुषा नागपुरे म्हणाल्या, गणेश मंडळांना अनेकदा अभय देण्याचे काम आम्ही करतो. मात्र आता शिस्त लागणे देखील गरजेचे आहे. आपल्या पुण्याच्या गणेशोत्सव जगभरात प्रसिद्ध आहे. त्याला कलंक लागू नये, म्हणून आपण सगळे झटत असतो. गणेश मंडळे ही सामाजिक कार्य करणारी केंद्र झाली असून ढोल ताशा पथकातील तरुण मंडळी देखील चांगले काम करीत आहेत. मात्र, संस्कृतीचा आनंद घेताना इतरांच्या हक्काची देखील आपण काळजी घ्यायला हवी. डीजे नाकारून पारंपरिक वाद्य वादन व्हावे. आवाजाची पातळी कमी ठेवून सुरक्षित आणि आनंददायी उत्सव करूया.
संजय दराडे म्हणाले, पुण्याचा गणेशोत्सव म्हटला की श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती आणि आजूबाजूच्या परिसरात देशभरातून लोक येतात. त्यामुळे मंडळांमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने सीसीटीव्ही, स्वयंसेवक, महिला-पुरुष स्वतंत्र रांग अशी व्यवस्था असावी. तसेच हे मुद्दे दगडूशेठ गणपती ट्रस्ट घेत असलेल्या स्पर्धेत देखील असावे. उत्साह, श्रद्धा आणि परंपरेप्रमाणे यंदाचा उत्सव साजरा करूया, असेही त्यांनी सांगितले.
महेश सूर्यवंशी म्हणाले, कार्यकर्त्यांच्या उर्जेला सकारात्मक वळण लागावे, यासाठी ४० वर्षांपूर्वी ही स्पर्धा सुरु झाली. गणेशोत्सवात आणि वर्षभर देखील मंडळाकडे असलेला निधी मानवसेवा आणि प्रबोधनासाठी वापरला जात आहे, हे या स्पर्धेचे फलित आहे. स्पर्धेत सहभागी झालेल्या १६५ मंडळे व ३५ शाळा असे एकूण २०० सहभागींपैकी १०० मंडळे व शाळांनी पारितोषिके मिळविली असून एकूण १४ लाख ९७ हजार रुपयांची बक्षिसे देण्यात आली आहेत, असेही त्यांनी सांगितले. अधिश पायगुडे यांनी सूत्रसंचालन केले.


