पुणे दिनांक -24 ऑगस्ट 2026– महाराष्ट्रातील अनेक अनाथ आश्रमातील अनाथ मुलामुलींचे आधार कार्ड, पॅन कार्ड व अन्य कामानविषयी पुरावे मागितले जातात. पण त्यांचे पुरावेच मिळत नसतील तर., आणायचे कोठून? असा सवाल उपस्थित करून, या अनाथ मुलांविषयी शासनाने गांभीर्याने विचार करून कायद्यात सवलत देण्याची मागणी नाशिक येथील सामाजिक कार्यकर्ते यशवंत गोसावी यांनी सत्काराला उत्तर देताना केली
शिवसह्याद्री चॅरिटेबल फाउंडेशनतर्फे पुणे सातारा रस्त्यावरील अण्णाभाऊ साठे सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात अनाथ मुले, आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबातील मुलांचा, अनाथ, निराधार, साठी कार्य करणाऱ्या नाशिक येथील शिवनिशचलं सेवाभावी ट्रस्ट या सामाजिक संस्थेस शिवसह्याद्री आधारवड पुरस्कार महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक हेमंत धुमाळ, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष प्रवीण गायकवाड, यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. संस्थेचे संचालक यशवंत गोसावी व पूनम गोसावी यांनी संस्थेतर्फे हा पुरस्कार स्वीकारला. त्यावेळी ते बोलत होते. रोख 25 हजार रुपये, सन्मानचिन्ह, पुष्पगुछ असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
या कार्यक्रमात उच्चं शिक्षणासाठी 1 कोटी 75 लाख रुपयांच्या ठेवीच्या व्याजातून 95 विद्यार्थ्यांना सुमारे 11 लाख रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात आली.
या कार्यक्रमास ट्रस्टचे अध्यक्ष राजेंद्र कोंढरे,एम ई चे अध्यक्ष विक्रम गायकवाड, बढेकर ग्रुपचे संचालक प्रवीण बढेकर,सोपान वांजळे, सेवानिवृत्त मुख्य अभियंता राजेंद्र रहाणे, शिवसह्याद्री चॅरिटेबल फाउंडेशनचे विश्वस्त विक्रमसिंह लावंड, नितीन साळुंके, सागर शेडगे,अनिल शिंदे, एस एम गिरमकर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना श्री गोसावी म्हणाले की, अनेक अनाथ मुलामुलींचे आधार व पॅन कार्डसाठी काढण्यासाठी शासकीय कार्यालयात गेलो तर आई वडील, व अन्य नातेवाईकांविषयी पुरावे मागितले जातात. दुर्दैवाने अनेकांचे आई किंवा वडिलांचे निधन झालेले असते. तसेच काहींचे आई वडील ह्यात नसतात. त्यामुळे पुरावे मिळणे अवघड असते. त्याचा परिणाम या मुलांना आधार व पॅन कार्ड मिळू शकत नाही. त्याचा परिणाम त्यांच्यावर होतो.
हे टाळण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने कायद्यात सवलत दिली पाहिजे. अशी मागणी गोसावी यांनी आपल्या भाषणात केली.
श्री कोंढरे म्हणाले की, मराठा आरक्षण मिळेल तेव्हा मिळेल. पण सवलत मिळाली पाहिजे. त्यासाठी प्रयत्न चालू आहेत. मराठा आरक्षण व सवलत सांगड घालण्याची परिस्थिती आहे. आपल्याकडे जे आहे ते देण्याची वृत्ती प्रत्येकाने ठेवली पाहिजे.
सागर शेडगे यांनी प्रास्ताविक व नितिन साळुंके यांनी उपस्थितांचे आभार मानले.
शासनाने अनाथ मुलांसाठी पुराव्याविषयी कायदयात सवलत दयावी — सामाजिक कार्यकर्ते यशवंत गोसावी यांची मागणी.
RELATED ARTICLES


