Wednesday, August 19, 2026
Google search engine
HomeUncategorizedसंगीताच्या माध्यमातून प्रार्थना-ब्राम्हो समाजाचा सर्वधर्म 'समन्वय' संदेश शांतिनिकेतनच्या डॉ. शर्मिला रॉय...

संगीताच्या माध्यमातून प्रार्थना-ब्राम्हो समाजाचा सर्वधर्म ‘समन्वय’ संदेश शांतिनिकेतनच्या डॉ. शर्मिला रॉय पोम्मो यांचे सादरीकरण : पुणे प्रार्थना समाजाच्या वतीने समन्वय कार्यक्रम

पुणे : ब्राह्म संगीतात वेदोपनिषदांमधील संस्कृत वचने, बंगालमधील सुगम भक्तिसंगीत, बाउल लोकसंगीत याबरोबर संत मीराबाई, गुरु नानक तसेच रवींद्रनाथ टागोर यांच्या रचनांचा समावेश होतो. अशा प्रकारे सर्व धर्म समन्वय करणार्‍या ब्राह्म संगीताचे सादरीकरण व विवेचन शांतीनिकेतनच्या टागोर स्कॉलर विदुषी डॉ. शर्मिला रॉय पोम्मो यांनी केले. राजा राममोहन रॉय यांनी ऋग्वेदातील वचनांचा आधार घेऊन ब्राह्मो समाजाची स्थापना केली हे सांगून त्यांनी रवींद्रनाथ टागोर यांनी संगीतबद्ध केलेली विश्वबंधुत्वाचा संदेश देणारी ऋग्वेदातील सूक्ते अत्यंत सुमधुर स्वरात म्हटली.

पुणे प्रार्थना समाजाने आयोजित केलेल्या “समन्वय” ह्या कार्यक्रमात विदुषी डॉ. शर्मिला रॉय पोम्मो यांचे सादरीकरण व विवेचन झाले. यावेळी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे माजी कुलगुरु डॉ. पंडित विद्यासागर, पुणे प्रार्थना समाजाच्या अध्यक्ष डॉ. सुषमा जोग, सचिव डॉ. दिलीप जोग उपस्थित होते. पुणे प्रार्थना समाजाच्या शिष्यवृत्तीचे वितरण पाहुण्यांच्या हस्ते झाले.

डॉ. पंडित विद्यासागर म्हणाले, आपल्या समाजात वैज्ञानिक दृष्टिकोन अंगीकारण्यासाठी लोक संकोच करतात. परंतु विविध जाचक रुढीपरंपरांनी ग्रासलेल्या समाजात ब्राह्मो समाजाने वैज्ञानिक दृष्टिकोन आणला. दूरदृष्टी असणाऱ्या विचारवंतांनी एकत्र येत महाराष्ट्रात प्रार्थना समाजाची स्थापना केली. आत्ताच्या काळात भारतीय समाजाची परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. एक समाजघटक दुसऱ्या समाजघटकाला लक्ष्य करतो आहे. प्रार्थना समाजामध्ये सामाजिक परिवर्तनाची ताकद आहे. त्यामुळे सर्व धर्म समन्वयाचा संदेश प्रार्थना समाजाच्या माध्यमातून जनसमुदायापर्यंत पोहोचायला पाहिजे.

डॉ. सुषमा जोग म्हणाल्या,ब्राह्मो व प्रार्थना समाजाचा सर्व – धर्म – समन्वय साधणारा बंधुत्वाचा विचार स्वतंत्र भारताच्या संविधानातील कलम ५१ अ मध्ये विशद केला आहे. या कलमाचे पालन करणे हे प्रत्येक भारतीयाचे कर्तव्य आहे. समाजातील प्रत्येकाने सर्व धर्म समन्वयाचा प्रसार केला पाहिजे.

या कार्यक्रमात पुणे येथील ग्लोबल उपासना फोरम यांनी रवींद्रनाथ टागोर यांच्या रचना सादर केल्या. पुणे प्रार्थना समाजाच्या नमिता मुजुमदार व इतरांनी या कार्यक्रमात संतरचना सादर केल्या. शर्मिला मझुमदार आणि डॉ. दिलीप जोग यांनी सूत्रसंचालन केले. अंजली राव (व्हायोलिन), प्रणव कुलकर्णी (संवादिनी), नीलेश कुलकर्णी (तबला) व शशिकांत भोसले(पखवाज) यांनी साथसंगत केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments