पुणे १ सप्टेंबर २०२६ :- म. सा. प. च्या माधवराव पटवर्धन सभागृहात कवयित्री सायली कुलकर्णी लिखित व चपराक प्रकाशन पुणे यांनी प्रकाशित केलेल्या
किमया घडली शब्दांची या काव्यसंग्रहाचे प्रकाशन एका दिमाखदार सोहळ्यात सुप्रसिद्ध कवी, गीतकार, गझलकार, श्रीपाद अरुण जोशी , तसेच खानदेशातील प्रसिद्ध कवयित्री जयश्री काळवीट यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि सुप्रसिद्ध ज्येष्ठ कवयित्री,साहित्य दीप प्रतिष्ठानच्या अध्यक्षा मा. ज्योत्स्ना चांदगुडे यांच्या अध्यक्षतेखाली प्रकाशित झाला.
याप्रसंगी सुप्रसिद्ध कवी श्रीपाद अरुण जोशी यांनी काव्यसंग्रहाचे अतिशय सखोल समीक्षण करत त्यातील साहित्यिक मूल्यांवर प्रकाश टाकला. वृत्तबद्ध कवितांच्या विश्वात अतिशय दमदार व सकस कवितेचा उदय झाला आहे अशा शब्दात कवी श्रीपाद जोशी यांनी काव्यसंग्रहाचे कौतुक केले.
काव्यसंग्रहाविषयी बोलताना खानदेशातील कवयित्री सौ.जयश्री काळवीट यांनी ‘व्यवस्थेला शिस्तबद्धपणे, नम्रपणे प्रश्न विचारणारी कविता ‘ या शब्दात काव्यसंग्रहाचे कौतुक केले.
अध्यक्षीय भाषणात ज्येष्ठ कवयित्री ज्योत्स्ना चांदगुडे यांनी किमया घडली शब्दांची या काव्यसंग्रहाचे समीक्षणात्मक विवेचन केले. कवयित्री सायली कुलकर्णी यांची कविता नाते संबंध जपणारी, निसर्गाशी कृतज्ञ असणारी आणि सामाजिक भान जपणारी आहे असे गौरवोद्गार त्यांनी काव्यसंग्रहाबद्दल काढले.
त्यानंतर कवयित्री सायली कुलकर्णी यांची सुप्रसिद्ध कवी श्री. मकरंद शांताराम कुलकर्णी यांनी घेतलेली प्रकट मुलाखत अतिशय रंगली. कवयित्री सायली कुलकर्णी यांनी त्यांच्या काव्यप्रवासाबाबत श्रोत्यांशी मोकळेपणाने संवाद साधला.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राजक्ता चिंचोळकर यांनी केले तर आभार श्री. गजानन देशचौगुले यांनी मानले.कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पुण्यातील रसिक श्रोते,मान्यवर कवी,आप्तेष्ट उपस्थित होते.
—


