Wednesday, September 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedढोल-ताशा वादकांच्या हाती आता जीवनरक्षणाचे कौशल्य  ढोल-ताशा महासंघ पुणे शहर आणि...

ढोल-ताशा वादकांच्या हाती आता जीवनरक्षणाचे कौशल्य  ढोल-ताशा महासंघ पुणे शहर आणि आदर फाउंडेशन यांच्या वतीने पथकातील वादकांसाठी सीपीआरचे प्रशिक्षण

 

 

पुणे : गणेशोत्सव, मिरवणुका आणि विविध सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ढोल-ताशाच्या माध्यमातून संस्कृती व परंपरेचे जतन करणाऱ्या पथकांमध्ये तरुणांचा मोठा सहभाग असतो. वादनासोबतच सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या या तरुणांना आपत्कालीन परिस्थितीत एखाद्याचा जीव वाचविण्यासाठी आवश्यक असलेले जीवनरक्षक कौशल्य अवगत असणे उपयुक्त ठरणार आहे. अचानक हृदयक्रिया बंद पडणे, बेशुद्ध होणे किंवा अन्य वैद्यकीय आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयापर्यंत पोहोचण्यासाठी लागणारा वेळ निर्णायक ठरू शकतो. अशा वेळी तातडीने सीपीआर देता यावा आणि वैद्यकीय मदत मिळेपर्यंत रुग्णाचे प्राण वाचविण्यासाठी प्रयत्न करता यावेत, या उद्देशाने ढोल-ताशा महासंघ पुणे शहर आणि आदर फाउंडेशन यांच्या वतीने पथकातील वादकांसाठी सीपीआर प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 

 

पर्वती पायथा येथील भारतमाता अभ्यासिका येथे हे शिबिर झाले. यावेळी मानाचा चौथा श्री तुळशीबाग गणपती मंडळाचे कोषाध्यक्ष नितीन पंडित, सेवा मित्र मंडळाचे शिरीष मोहिते, कुमार रेणुसे, प्रकाश राऊत आणि डॉ. स्वानंद पाटील, ढोल ताशा महासंघाचे शिरीष थिटे, ढोल ताशा महासंघ पुणे शहर कार्याध्यक्ष अभिजित कुमावत, उपाध्यक्ष अमर भालेराव, सचिव प्रशांत तांबे, आकाश जिंदम उपस्थित होते.

 

या प्रशिक्षण शिबिरामध्ये पथकातील वादकांना सीपीआर प्रणालीचे प्रशिक्षण देण्यात आले. अचानक हृदयक्रिया बंद पडणे किंवा व्यक्ती बेशुद्ध होणे अशा प्रसंगी तातडीने कोणती मदत करावी, सीपीआर कशा पद्धतीने द्यावा, तसेच वैद्यकीय मदत मिळेपर्यंत कोणती काळजी घ्यावी, याबाबत मार्गदर्शन आणि प्रात्यक्षिक प्रशिक्षण देण्यात आले. सार्वजनिक उत्सवांमध्ये मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होत असल्याने अशा ठिकाणी प्रशिक्षित व्यक्ती उपलब्ध असणे महत्त्वाचे ठरते. या उद्देशाने वादकांना वादनासोबत जीवनरक्षणाचे कौशल्य आत्मसात करून देण्यात आले.

 

नितीन पंडित म्हणाले, अशा प्रकारचे उपक्रम अत्यंत महत्त्वाचे आहेत. अनेकदा दुर्दैवी घटना घडतात; मात्र योग्य वेळी उपचार मिळाल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात. रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचण्यासाठी वेळ लागतो. अशा वेळी प्राथमिक उपचाराचे ज्ञान असणे महत्त्वाचे ठरते. गणपती मंडळांच्या माध्यमातूनही विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात. ढोल-ताशा पथकांबाबत अनेक स्थित्यंतरे आली असली तरी संस्कृती टिकविण्याचे काम तरुण पिढी करत आहे. पथकांमुळे तरुणांचे संस्कार दृढ होतात. निस्वार्थीपणे परंपरा पुढे नेण्याचे काम वादक करत आहेत. पथकांना पाठिंबा देणे हे मंडळांचे काम आहे. पथकांवर कोणतेही संकट आले तर मी त्यांच्यासोबत आहे.

 

शिरीष मोहिते म्हणाले, ढोल-ताशा पथकांबद्दल अनेकदा वेगवेगळ्या प्रकारे बोलले जाते. मात्र पथकांनी केवळ बोलण्यापेक्षा आपल्या उपक्रमांच्या माध्यमातून काम दाखवून दिले पाहिजे. पथकातील वादक केवळ ढोल वाजवत नाहीत, तर व्यसनांपासून दूर राहतात. पथकांना मिळणारी बिदागी समाजोपयोगी कामांसाठी वापरली जाते. तरुणांमधील ऊर्जा योग्य ठिकाणी व्यक्त होणे गरजेचे आहे. काही लोक केवळ टीका करण्यासाठी असतात; त्यांना उत्तर देण्यापेक्षा पथकांनी आपल्या कामातून आपली भूमिका दाखवून द्यावी.

 

 

शिरीष थिटे म्हणाले, वादक वादन करून वादनरूपी सेवा अर्पण करतो. पथकांमध्ये तरुणांचा मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. त्यामुळे तरुणांनी सीपीआरसारखी महत्त्वाची कौशल्ये आत्मसात केली पाहिजेत. भविष्यात या प्रशिक्षणाचा निश्चितच उपयोग होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments