Wednesday, September 2, 2026
Google search engine
HomeUncategorizedविशेष गरजा असलेल्या बालकांचे दत्तक विधान व पुनर्वसन बळकट करण्यासाठी पुण्यात पश्चिम...

विशेष गरजा असलेल्या बालकांचे दत्तक विधान व पुनर्वसन बळकट करण्यासाठी पुण्यात पश्चिम विभागीय कार्यशाळा* *केंद्रीय दत्तक साधन प्राधिकरण (CARA) आणि महिला व बाल विकास विभागाचा संयुक्त उपक्रम*

 

 

पुणे, दि. २ : विशेष गरजा असलेल्या (दिव्यांग) बालकांचे दत्तक विधान आणि संस्थाबाह्य पुनर्वसन अधिक प्रभावीपणे करण्यासाठी केंद्रीय दत्तक साधन प्राधिकरण (CARA), महिला व बाल विकास मंत्रालय, भारत सरकार यांच्या वतीने महाराष्ट्र शासनाच्या महिला व बाल विकास विभागाच्या सहकार्याने पश्चिम विभागीय प्रादेशिक सल्लागार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. गुरुवार, दि. ३ सप्टेंबर २०२६ रोजी पुणे येथे ही कार्यशाळा होणार आहे.

 

CARA च्या सन २०२५ मधील दत्तक जनजागृती मोहिमेचा एक भाग म्हणून ही कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे. ‘विशेष गरजा असलेल्या बालकांचे संस्थाबाह्य पुनर्वसन’ या संकल्पनेवर आधारित या कार्यशाळेचा मुख्य उद्देश प्रत्येक बालकाला सुरक्षित, प्रेमळ आणि कुटुंबाधारित वातावरणात वाढण्याची संधी उपलब्ध करून देणे हा आहे.

 

CARA मार्फत करण्यात आलेल्या विविध प्रयत्नांमुळे सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात देशभरात ३९४ दिव्यांग बालकांचे दत्तक विधान झाले आहे. सन २०२४-२५ मध्ये ही संख्या ३१३ होती. मागील वर्षाच्या तुलनेत यामध्ये सुमारे २५ टक्के वाढ झाली आहे.

 

पश्चिम विभागात महाराष्ट्र, गुजरात, गोवा तसेच दादरा व नगर हवेली आणि दमण व दीव या केंद्रशासित प्रदेशांचा समावेश आहे. या विस्तृत विभागातील ७४ पेक्षा अधिक जिल्ह्यांमधील प्रतिनिधी या कार्यशाळेत सहभागी होणार आहेत.

 

*बालक-केंद्रित दत्तक व्यवस्थेला प्रोत्साहन*

दत्तक विधान आणि बाल संरक्षण व्यवस्था अधिक सक्षम करण्याबरोबरच विशेष गरजा असलेल्या बालकांना संस्थांमध्ये दीर्घकाळ ठेवण्याऐवजी कुटुंबाधारित संगोपन व पुनर्वसनाला प्रोत्साहन देणे हा कार्यशाळेचा प्रमुख उद्देश आहे. बाल न्याय (बालकांची काळजी व संरक्षण) अधिनियम, २०१५ मधील तरतुदी व तत्त्वांच्या अनुषंगाने बालकाचे सर्वोत्तम हित केंद्रस्थानी ठेवून या विषयावर चर्चा केली जाणार आहे.

 

या कार्यशाळेत राज्य दत्तक साधन संस्था (SARA), विशेष दत्तक संस्था (SAA), बालगृहे (CCI), जिल्हा बाल संरक्षण कक्ष (DCPU), मुख्य वैद्यकीय अधिकारी (CMO), वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच बाल संरक्षण क्षेत्रात कार्यरत विविध संस्था व कार्यकर्ते सहभागी होणार आहेत.

 

*विविध विषयांवर सखोल चर्चा*

कार्यशाळेत विशेष गरजा असलेल्या बालकांच्या दत्तक विधानासंदर्भात विविध राज्यांमधील सद्यस्थिती, अडचणी आणि प्रभावी पद्धती यांचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच जिल्हास्तरावर राबविण्यात आलेल्या यशस्वी उपक्रमांचे सादरीकरण, पुराव्यांवर आधारित उपाययोजना आणि त्यांची इतर राज्ये व जिल्ह्यांमध्ये पुनरावृत्ती करण्याच्या शक्यतांवर चर्चा होईल.

 

याशिवाय दत्तक प्रक्रियेत येणाऱ्या वैद्यकीय, कायदेशीर, आर्थिक तसेच तक्रार निवारणाशी संबंधित अडचणी, विविध विभागांमध्ये आवश्यक असलेला समन्वय आणि प्रत्यक्ष अंमलबजावणी करता येतील अशा उपाययोजनांवर गटचर्चा केली जाणार आहे.

 

*यशस्वी दत्तक प्रक्रियेवरील विशेष चित्रपट*

विशेष गरजा असलेल्या बालकाच्या यशस्वी दत्तक प्रक्रियेवर आधारित विशेष चित्रपटाचेही कार्यशाळेत प्रदर्शन करण्यात येणार आहे. कुटुंबाचे प्रेम, आधार आणि समाजाच्या सहकार्यामुळे विशेष गरजा असलेली बालकेही आनंदी, सुरक्षित आणि सक्षम वातावरणात कशी वाढू शकतात, याचा संदेश या चित्रपटातून देण्यात येणार आहे.

 

कार्यशाळेच्या माध्यमातून दत्तक प्रक्रियेत प्रत्यक्ष काम करताना येणाऱ्या अडचणींची सखोल माहिती घेणे, संबंधित संस्थांमधील समन्वय अधिक प्रभावी करणे तसेच विशेष गरजा असलेल्या बालकांच्या दत्तक विधान व पुनर्वसनासाठी व्यवहार्य आणि धोरणात्मक उपाययोजना निश्चित करणे अपेक्षित आहे.

 

या कार्यशाळेतून प्राप्त होणाऱ्या निष्कर्षांच्या आधारे दत्तक व्यवस्था अधिक सर्वसमावेशक, संवेदनशील आणि बालक-केंद्रित करण्यास मदत होणार असून, कुटुंबाची गरज असलेल्या प्रत्येक बालकाला सुरक्षित, प्रेमळ आणि पोषक कुटुंबात वाढण्याची, शिकण्याची आणि सर्वांगीण विकासाची संधी मिळावी, यासाठी विविध यंत्रणांमधील समन्वय अधिक दृढ होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments