लोणेरे,रायगड, दि ०३ :- डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे येथील प्राध्यापकांची रिक्त पदे भरण्याची प्रक्रिया येत्या तीन महिन्यांत पूर्ण करण्यात येईल, अशी ग्वाही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी आज दिली. तसेच विद्यापीठातील विद्यार्थ्यांचे निकाल वेळेत लागावेत आणि त्यांचे पुढील शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी शासनाकडून आवश्यक ती कार्यवाही करण्यात येत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरेच्या २८ व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. राज्यपाल तथा विद्यापीठाचे कुलपती जिष्णू देव वर्मा यांच्या उपस्थितीत हा समारंभ पार पडला. यावेळी रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास तथा रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री भरत गोगावले, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, खासदार सुनील तटकरे ,महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळाचे संचालक तथा तंत्रशिक्षण विभागाचे संचालक डॉ. प्रमोद नाईक, DBATUचे कुलगुरू रजनीश कामत, कुलसचिव प्रा. अमित शेष, परीक्षा नियंत्रक डॉ. गीतांजली महामुणकर, प्राध्यापक, विद्यार्थी, रायगड जिल्हाधिकारी, विद्यापीठातील अधिकारी व कर्मचारी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले,विद्यापीठातील प्राध्यापकांची रिक्त पदे, निकाल आणि विद्यार्थ्यांशी संबंधित विविध प्रश्नांबाबत डिसेंबरपर्यंत विद्यापीठातील आणि विद्यार्थ्यांशी संबंधित सर्व समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला जाईल, असे मंत्री पाटील यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचे निकाल वेळेत लागण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करण्यात येत असून, डिसेंबरनंतर विद्यापीठाच्या कामकाजात सकारात्मक बदल दिसून येईल. त्यामुळे विद्यार्थ्यांना अन्य विद्यापीठात स्थलांतर करण्याची वेळ येणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
*डिजिटल प्रशासनाला प्राधान्य*
विद्यापीठाने प्रवेश आणि परीक्षा प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन करण्याच्या दिशेने पावले उचलली आहेत. डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर केवळ प्रशासकीय सोयीपुरता मर्यादित न ठेवता विद्यार्थ्यांचा शैक्षणिक अनुभव अधिक प्रभावी करण्यासाठी केला पाहिजे, असेही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी नमूद केले.
शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे
ऐतिहासिक रायगड किल्ल्याच्या सान्निध्यात वसलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ हे ज्ञान, स्वातंत्र्य आणि सामाजिक परिवर्तनाच्या विचारांचे केंद्र आहे,चवदार तळे सत्याग्रहाच्या ऐतिहासिक पार्श्वभूमीशी या परिसराचे महत्त्वाचे नाते आहे. त्यामुळे अशा ऐतिहासिक भूमीतून शिक्षण घेऊन बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांची सामाजिक जबाबदारी अधिक मोठी आहे, असे मंत्री पाटील यांनी सांगितले.
“शिक्षण हे सामाजिक परिवर्तनाचे सर्वात प्रभावी साधन आहे. शिक्षणामुळे समता, समानता, प्रगती आणि विकासाला चालना मिळते,” असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० हे सर्वसमावेशक आणि समतामूलक शिक्षणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल असल्याचेही त्यांनी सांगितले.
*एकल मातांच्या मुलींसाठी विशेष योजना राबविण्याचा प्रस्ताव विचाराधीन*
राज्यातील विद्यापीठे आणि महाविद्यालयांमध्ये शिक्षण घेणाऱ्या एकल मातांच्या मुलींची माहिती संकलित करून त्यांची संख्या निश्चित करण्यात येणार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन या विद्यार्थिनींसाठी विशेष योजना राबविण्याबाबत निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
एकल माता आपल्या मुलांचा सांभाळ करताना कुटुंबाची संपूर्ण जबाबदारी एकटीने पार पाडतात. अशा मातांच्या मुलींना उच्च शिक्षण घेताना आवश्यक आर्थिक आणि शैक्षणिक पाठबळ मिळावे, यासाठी शासन सकारात्मक पावले उचलत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
*छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे लवकरच उद्घाटन*
डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाच्या परिसरात महाराष्ट्राचे आराध्यदैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे काम पूर्ण झाले असून, त्याचे लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी माहितीही मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.
0000


