Friday, September 4, 2026
Google search engine
HomeUncategorizedगोपाल कृष्ण... च्या जयघोषात इस्कॉन मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव साजरा आंतरराष्ट्रीय...

गोपाल कृष्ण… च्या जयघोषात इस्कॉन मध्ये श्रीकृष्ण जन्माष्टमी उत्सव साजरा आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या (इस्कॉन) पुण्यातील कात्रज कोंढवा रस्ता आणि कॅम्प येथील मंदिर ; जन्माष्टमी निमित्त १०००० भक्तांनी केला भगवान श्रीकृष्णाला अभिषेक  

 

 

पुणे : श्री गोपाळ कृष्ण भगवान की जय… हरे रामा हरे कृष्णा… राधे कृष्ण गोपाल कृष्ण…च्या जयघोषात कात्रज-कोंढवा रस्ता आणि कॅम्प येथील इस्कॉन मंदिरात श्रीकृष्ण जन्माष्टमी महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या सोहळ्यानिमित्त राज्याचे उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, आमदार भीमराव तापकीर, योगेश टिळेकर, अभिनेते राहुल सोलापूरकर, अनेक नगरसेवक आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी भगवंतांचे दर्शन घेतले. तब्बल तीन लाख भाविकांनी राधाकृष्णाचे दर्शन घेतले, तर १० हजार निवडक भक्तांनी भगवान श्रीकृष्णाचा अभिषेक केला. आलेल्या भाविकांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.

 

भगवान कृष्णांचे द्वारका-जगन्नाथ पुरी ते वृंदावन प्रस्थान रथयात्रेतून होते. म्हणजेच भगवंतांचा ऐश्वर्य भाव ते वैयक्तिक भक्तांशी असलेले प्रेमसंबंध रथयात्रा प्रदर्शित करते. यावर आधारित गीत गोविंद वेष, पद्म वेष, सोनार वेष, वन भोजन वेष, नागार्जुन वेष आणि गज वेष आदी लीलांचे अतिशय आकर्षक आणि सुंदर देखावे अभिषेकाच्या ठिकाणी करण्यात आले होते.

 

संस्थापक आचार्य श्रील प्रभुपाद यांनी स्थापित केलेल्या आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघाच्या (इस्कॉन) मंदिरात रत्नजडित वस्त्रालंकारांनी सजलेल्या राधाकृष्णाचे रूप पाहण्यासाठी भाविकांनी गर्दी केली होती. फुलांनी सजविलेल्या पाळण्यातील बालकृष्णाला पाळणा देत भाविकांनी जन्माष्टमी उत्सव साजरा केला. मंदिराचे अध्यक्ष राधेश्याम प्रभू, रेवतीपती प्रभू, जयदेव प्रभू या मंदिराच्या वरिष्ठ भक्त मंडळींसह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

भगवंतांना हरे-कृष्ण महामंत्राच्या जयघोषात मंदिरातील भक्तवृंदातर्फे महाअभिषेक करण्यात आला. त्यानंतर भगवंतांना ५६ प्रकारचे नैवेद्य २५१ ताटांमधून दाखवून बरोबर रात्री १२ वाजता आरती करण्यात आली, अशी माहिती प्रवक्ते जनार्दन चितोडे यांनी दिली. उपाध्यक्ष संजय भोसले यांनी जन्माष्टमी महोत्सवाचे आध्यात्मिक तसेच सांस्कृतिक महत्त्व आणि इस्कॉन संस्थेच्या जगभरातील उपक्रमांबद्दल सांगितले. विशेष अतिथी कक्षातर्फे संपर्क प्रमुख अनंतगोप प्रभू आणि प्रसाद कारखानीस यांनी पाहुण्यांचे स्वागत केले.

 

मंदिरामध्ये जन्माष्टमीनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या ‘कृष्णसमर्पण’ सांस्कृतिक महोत्सवाचा समारोप झाला. महोत्सवात देशभरातून ७०० कलावंतांनी शास्त्रीय नृत्य, गायन, नाट्य, वादन करून त्यांची कला भगवंतांना समर्पित केली. श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त मंदिरातील तिन्ही गाभाऱ्यातील श्री श्री राधा-वृंदावन चंद्र, जगन्नाथ-बलदेव-सुभद्रा आणि गौर-निताई यांच्या विग्रहांना आकर्षक वस्त्र-आभूषणांनी सजविण्यात आले होते. यावर्षी खास राजस्थानी शैलीची वेशभूषा करण्यात आली होती. याच मंदिराच्या आवारात श्री बालाजीचे सुंदर मंदिर असून, या सर्व मंदिरांवर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती.

 

जन्माष्टमी उत्सवाच्या निमित्ताने हरे-कृष्ण महामंत्राचे २४ तास कीर्तन झाले. रात्री ९.३० वाजता दूध, तूप, दही, मध, विविध फळांचे रस तसेच गंगा, यमुना आदी पवित्र नद्यांच्या जलासह सुमारे ६०० लिटर विविध द्रव्यांनी १३० कलशांमधून १५१ पुजाऱ्यांनी भगवंतांचा अभिषेक केला. रात्री ११ वाजता ५६ भोग अर्पण करण्यात आले आणि मध्यरात्री १२ वाजता भगवंतांची आरती झाली. रात्री १२.३० वाजेपर्यंत भाविकांना दर्शन घेता आले.

 

उत्सवासाठी सुमारे पाच लाख भाविकांना प्रसाद वाटपाची व्यवस्था करण्यात आली होती. प्रसाद तयार करणे व वितरणासाठी सुमारे ३०० स्वयंसेवक भक्त कार्यरत होते, तर गर्दीचे व्यवस्थापन आणि विविध सेवांसाठी सुमारे १,००० स्वयंसेवकांनी सेवा बजावली. गीता व भागवतावरील साहित्य, आध्यात्मिक पुस्तके, पूजा साहित्य, भेटवस्तू, अगरबत्त्या, धूप, जपमाळा, गो-उत्पादने, आध्यात्मिक प्रश्नमंजुषा, आध्यात्मिक शंका-समाधान, फोटो-फ्रेम तसेच विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल्स उभारण्यात आले होते. मंदिराचे अध्यक्ष राधेश्याम प्रभू आणि विश्वस्तांच्या मार्गदर्शनाखाली उत्सवाचे नियोजन करण्यात आले.

 

 

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments