Saturday, September 5, 2026
Google search engine
HomeUncategorizedशेतकरीहितासाठी आधुनिक तंत्रज्ञान व मूल्यवर्धित उत्पादनांवर भर द्यावा* ...

शेतकरीहितासाठी आधुनिक तंत्रज्ञान व मूल्यवर्धित उत्पादनांवर भर द्यावा* *-उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार*

 

 

*सोमेश्वर सहकारी साखर कारखाना येथे शेतकरी मेळावा*

 

पुणे, दि. ५ : शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, उत्पादन खर्चात बचत आणि शेतीचे अर्थकारण मजबूत करण्यावर भर देणे आवश्यक आहे. बदलत्या हवामान परिस्थिती आणि वाढत्या उत्पादन खर्चाच्या पार्श्वभूमीवर कृषी व साखर क्षेत्राने आधुनिक तंत्रज्ञान, मूल्यवर्धित उत्पादन आणि अचूक नियोजनाचा स्वीकार करून शेतकरीहिताला सर्वोच्च प्राधान्य द्यावे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजित पवार यांनी केले.

 

सोमेश्वर सहकारी साखर कारखाना सोमेश्वरनगर येथे आयोजित शेतकरी मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील, आमदार सचिन पाटील, माजी आमदार संभाजी कुंजिर, पीडीसीसी बँक, पुणेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप, उपाध्यक्ष किसन तांबे, माजी अध्यक्ष व विद्यमान संचालक राजवर्धन शिंदे आदी उपस्थित होते.

 

उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या की, शेतकरी हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा आधारस्तंभ आहे. शेतकरी सक्षम झाला तर गावाची आणि पर्यायाने राज्याची अर्थव्यवस्था अधिक मजबूत होईल. त्यामुळे शासन, शेतकरी, सहकारी संस्था आणि साखर उद्योगाने परस्पर समन्वयाने काम करून शेतकऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. स्वर्गीय दादा हे स्वतः शेतकरी असल्यामुळे त्यांना शेतकऱ्यांच्या अडचणी आणि गरजांची जवळून जाण होती. शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढावे यासाठी त्यांनी आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापरावर भर दिला. कृत्रिम बुद्धिमत्ता, आधुनिक सिंचन पद्धती, यांत्रिकीकरण, माती परीक्षण, सुधारित वाणांची निवड आणि अचूक पीक नियोजन यांचा वापर वाढविल्यास उत्पादनक्षमता वाढवून उत्पादन खर्च कमी करता येईल.

 

साखर उद्योग हा महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेचा महत्त्वाचा कणा आहे. अतिवृष्टी, दुष्काळ, हवामानातील अनिश्चितता, वाढता उत्पादन खर्च आणि साखरेच्या बाजारपेठेतील चढ-उतार यांसारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी साखर कारखान्यांनी केवळ साखर उत्पादनावर अवलंबून न राहता इथेनॉल, बायोगॅस, सीएनजी, सेंद्रिय खत आणि इतर मूल्यवर्धित उत्पादनांकडे लक्ष द्यावे, असे उपमुख्यमंत्री श्रीमती पवार म्हणाल्या.

 

सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याने आर्थिक शिस्त, कार्यक्षम व्यवस्थापन आणि शेतकरीहिताला प्राधान्य देत सहकार क्षेत्रात विश्वासार्हता निर्माण केली आहे. कारखान्याच्या प्रगतीमध्ये सभासद, ऊस उत्पादक शेतकरी, कामगार, अधिकारी आणि व्यवस्थापनाचे योगदान महत्त्वाचे आहे. आगामी काळातही शेतकरी सभासदांना अधिकाधिक लाभ मिळेल, यासाठी कारखान्याने दीर्घकालीन नियोजन करावे. शिक्षण, आरोग्य आणि सामाजिक क्षेत्रातील योगदानाची परंपरा कायम ठेवत परिसराच्या सर्वांगीण विकासासाठीही सहकारी संस्थांनी योगदान द्यावे, असे उपमुख्यमंत्री श्रीमती पवार यांनी सांगितले.

 

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद आबा पाटील यांनी सोमेश्वर कारखान्याच्या प्रगतीचे कौतुक करून शेतकरी, सभासद, कामगार आणि व्यवस्थापनाच्या योगदानातून संस्थेने उल्लेखनीय प्रगती साधल्याचे सांगितले. कारखान्याची आर्थिक बळकटी, कार्यक्षमता आणि विश्वासार्हता कायम ठेवत भविष्यातील विकासासाठी नियोजनबद्ध प्रयत्न करण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.

 

आमदार सचिन पाटील यांनीही कारखान्याच्या कार्यक्षम व्यवस्थापनाचे, आर्थिक शिस्तीचे आणि शेतकरीहिताच्या कामकाजाचे कौतुक केले.

 

सोमेश्वर साखर कारखान्याचे अध्यक्ष पुरुषोत्तम जगताप यांनी प्रस्तावना करताना कारखान्याच्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची आणि साधलेल्या कामगिरीची माहिती दिली.

 

यावेळी शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments