पुणे : श्री संतसेना महाराज नाभिक एकता संघ, पुणे शहर यांच्या वतीने संतसेना महाराज पुण्यतिथीनिमित्त मंगळवारी दिनांक ८ सप्टेंबर रोजी सकाळी ८ वाजता पद्मावती येथील विणकर सभागृहात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी शिक्षण क्षेत्रातील योगदानाबद्दल माध्यमिक शिक्षक विलास बाबुराव बोरसे आणि सामाजिक-राजकीय क्षेत्रातील कार्याबद्दल रा.ज.से. पक्षाचे जिल्हाध्यक्ष भगवान रघुनाथ शिंदे यांना ‘समाज भूषण पुरस्कार’ प्रदान करण्यात येणार आहे.
कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय नाभिक एकता महासंघ संलग्न महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे राष्ट्रीय अध्यक्ष भगवान बिडवे उपस्थित राहणार आहेत. संस्थेचे अध्यक्ष मनोज बळीराम अहिरराव, उपाध्यक्ष पंडित निंबा निकम, उपाध्यक्ष योगेश दशरथ फुलपगार आणि खजिनदार समाधान भिकन निकम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले आहे.
सकाळी ८ वाजता संत सेना महाराज पालखी सोहळ्याने कार्यक्रमास सुरुवात होणार असून, त्यानंतर गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार होणार आहे. दुपारच्या सत्रात प्रवचन होईल. समाज बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.


