Monday, September 7, 2026
Google search engine
HomeUncategorized*जनगणना २०२७ साठी ४० बाबींवर माहिती संकलित करण्याचे केंद्र शासनाचे निर्देश*

*जनगणना २०२७ साठी ४० बाबींवर माहिती संकलित करण्याचे केंद्र शासनाचे निर्देश*

 

 

पुणे, दि. ७ (जिमाका) : भारताची जनगणना २०२७ च्या अनुषंगाने विहित कुटुंब पत्रकाद्वारे माहिती संकलित करण्यासाठी केंद्र शासनाने जनगणना अधिकाऱ्यांना विविध बाबींवरील माहिती संकलित करण्याचे निर्देश दिले आहेत. जनगणना अधिनियम, १९४८ च्या कलम ८ मधील उपकलम (१) अन्वये हे निर्देश जारी करण्यात आले आहेत.

 

जनगणना अधिकारी नियुक्त करण्यात आलेल्या स्थानिक क्षेत्राच्या हद्दीत राहणाऱ्या सर्व व्यक्तींना निर्धारित कुटुंब पत्रकातील प्रश्न विचारून माहिती संकलित करतील. यामध्ये व्यक्तीचे नाव, कुटुंबप्रमुखाशी नाते, लिंग, जन्मतारीख व वय, वैवाहिक स्थिती, विवाहावेळीचे वय, पती किंवा पत्नीचे नाव, घोषित राष्ट्रीयत्व, धर्म, अनुसूचित जाती/जमाती व जात यांचा समावेश आहे.

 

तसेच वडील व आईचा तपशील, दिव्यांगत्व, मातृभाषा व इतर अवगत भाषा, साक्षरता व डिजिटल साक्षरता, शैक्षणिक स्थिती, उच्चतम शैक्षणिक स्तर व शाखा/विषय, मागील वर्षातील कामाची स्थिती, आर्थिक कार्याची वर्गवारी, व्यवसाय, उद्योग-व्यापार-सेवेचे स्वरूप आणि कामगारांचा प्रवर्ग याबाबतही माहिती घेतली जाणार आहे.

 

अंशकालीन, निम-अंशकालीन तसेच काम न करणाऱ्या व्यक्तींसाठी बिनआर्थिक कार्य आणि कामाच्या शोधात किंवा कामासाठी उपलब्ध असल्याबाबतची माहिती संकलित केली जाईल. याशिवाय कामाच्या ठिकाणापर्यंतचा प्रवास, जन्मठिकाण, पूर्वीचे निवासस्थान, स्थलांतराचे कारण, शेवटच्या स्थलांतरानंतर गावात किंवा शहरात वास्तव्याचा कालावधी आणि कायमस्वरूपी निवासाचा पत्ता यांचीही नोंद केली जाणार आहे.

 

सध्या विवाहित, विधवा, घटस्फोटित आणि विभक्त महिलांसाठी सध्या हयात असलेल्या अपत्यांची संख्या व जीवित जन्म झालेल्या अपत्यांची संख्या, तसेच सध्या विवाहित महिलांसाठी मागील वर्षभरात जीवित जन्मलेल्या अपत्यांची संख्या विचारण्यात येणार आहे.

 

जनगणना माहिती संकलनात कोविड-१९ लसीकरणाचे ठिकाण, बँक खात्यांची एकूण संख्या, उपलब्ध असल्यास मोबाइल क्रमांक, आधार क्रमांक, मतदार ओळखपत्र क्रमांक, भारतीय पासपोर्टधारक असल्यास पासपोर्ट क्रमांक आणि वाहनचालक परवान्याची उपलब्धता याबाबतची माहितीही समाविष्ट करण्यात आली आहे.

 

हे निर्देश भारताचे महारजिस्ट्रार व जनगणना आयुक्त मृत्युंजय कुमार नारायण यांनी जारी केले आहेत.

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments