Tuesday, September 8, 2026
Google search engine
HomeUncategorizedनवव्या राष्ट्रीय पोषण माह निमित्त जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन*

नवव्या राष्ट्रीय पोषण माह निमित्त जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन*

 

पुणे, दि. ८: महिला व बालकांचे आरोग्य, पोषण व सर्वांगीण विकास यांना चालना देण्यासाठी महिला व बाल विकास विभागाच्या वतीने नवव्या राष्ट्रीय पोषण महिन्याला जिल्ह्यात उत्साहात सुरुवात करण्यात आली आहे . पोषण अभियानांतर्गत केंद्र शासनाच्या सूचनेनुसार दि. ९ सप्टेंबर २०२६ ते ८ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘नववा राष्ट्रीय पोषण माह’आयोजित करण्यात आला आहे. यावर्षीच्या ‘आमची अंगणवाडी आमची जबाबदारी’ ही संकल्पना असून, या माध्यमातून अंगणवाडी केंद्रांशी नागरिकांचा सहभाग वाढविण्यावर विशेष भर देण्यात येणार आहे.

पोषण माह कालावधीत पुणे जिल्ह्यातील ग्रामीण तसेच शहरी भागातील अंगणवाडी केंद्रांच्या माध्यमातून पोषण, आरोग्य, स्वच्छता, बाल विकास आणि महिला सक्षमीकरणाबाबत विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार आहेत. अंगणवाडी सेविका व मदतनीस, पर्यवेक्षिका, बाल विकास प्रकल्प अधिकारी तसेच जिल्हा स्तरावरील अधिकारी यांच्या समन्वयातून हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.

 

पोषण माहमध्ये स्थानिक व पौष्टिक आहार, आहारातील विविधता, पोषणयुक्त घटकांचा वापर, स्वच्छता व आरोग्य, बालकांचा सर्वांगीण विकास तसेच प्रधानमंत्री मातृ वंदना योजनेसह विविध योजनांचा लाभ याबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. अंगणवाडी केंद्रांमध्ये पोषण मेळावे, पाककला प्रदर्शन, पौष्टिक पदार्थांचे प्रात्यक्षिक, माता सभा, किशोरी व महिला मार्गदर्शन, बालकांच्या वाढीचे निरीक्षण, जनजागृती रॅली तसेच विविध समुदाय सहभागात्मक उपक्रम आयोजित केले जाणार आहेत.

 

*‘आमची अंगणवाडी आमची जबाबदारी’*

 

अंगणवाडी केंद्र हे केवळ बालकांना पूरक पोषण देण्याचे ठिकाण नसून, बालकांच्या विकासाचा पाया मजबूत करणारे आणि माता व कुटुंबांना आरोग्य, पोषणविषयक मार्गदर्शन देणारे केंद्र आहे. त्यामुळे अंगणवाडी केंद्रांच्या कामकाजात पालक, ग्रामस्थ, स्थानिक स्वराज्य संस्था व समुदायाचा सहभाग वाढविण्याच्या उद्देशाने ‘आमची अंगणवाडी, आमची जबाबदारी’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे.

पुणे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांमध्ये पोषण महातील उपक्रम प्रभावीपणे राबवून त्याची नोंद व अहवाल पोषण ट्रॅकरच्या माध्यमातून करण्याबाबत संबंधितांना सूचना देण्यात आल्या आहेत. ‘सुपोषित बालक, निरोगी माता आणि सक्षम कुटुंब’ या उद्दिष्टासाठी नागरिकांनीही या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन महिला व बालविकास विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

 

0000

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments