पुणे, दि. १० – सामाजिक, व्यावसायिक अथवा खाजगी अशा कोणत्याही कार्यात समाजभान जपले तर कार्याचे अधिक परिणामकारक यश मिळते, ज्याचे उत्तम उदाहरण म्हणजे स्व. अरविंदराव खळदकर होते, असे भावोद्गार रा. स्व. संघाच्या पश्चिम महाराष्ट्र प्रांताचे कार्यवाह डॉ. प्रवीण दबडघाव यांनी येथे काढले. जनता सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष, ज्येष्ठ बँकिंग आणि सहकार तज्ज्ञ, ज्येष्ठ संघ स्वयंसेवक स्व. अरविंदराव खळदकर यांच्या श्रध्दांजली सभेत ते बोलत होते. जनता सहकारी बँक, भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्था, डेक्कन एज्युकेशन सोसायटी व महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठान या संस्थांच्या वतीने श्रध्दांजली सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर रा. स्व. संघाचे पुणे महानगर कार्यवाह सचिन भोसले, जनता बँकेचे अध्यक्ष रवींद्र हेजीब व उपाध्यक्षा अलका पेटकर उपस्थित होते.
यावेळी श्रध्दांजली वाहतांना दबडघाव म्हणाले की, चिकाटीने आणि निष्ठेने काम करणे हा सामाजिक कार्याचा पाया आहे. समाजाच्या प्रत्येक घटकाला आपल्या प्रयत्नांमुळे समाधान मिळावे, याची तळमळ कार्यकर्त्याच्या ठायी असायला हवी. अशा आदर्श कार्यकर्त्याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे अरविंदराव खळदकर होते. ते अनेक संस्थांचे आधारवड होते. जीव ओतून काम करणारे नेतृत्व, कुशल प्रशासक, सर्वांना हवेहवेसे असणारे, असे त्यांचे परिपूर्ण व्यक्तिमत्व होते. अनेक संस्थांना उभे करण्यात, वाढवण्यात त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. जनता बँकेच्या यशस्वी परिवर्तनात त्याचा सिंहाचा वाटा आहे. संघाचे निष्ठावान स्वयंसेवक असलेल्या खळदकरांचा मनाचा मोठेपणा निर्विवाद होता.
यावेळी सहकार भारतीच्यावतीने बोलतांना सतीश मराठे म्हणाले की, अर्थकारण आणि बँकिंग अशा दोन्ही पातळ्यांवर खळदकरांनी लिलया काम केले. चिकीत्सक वृत्ती जोपासणाऱ्या खळदकरांनी सर्वसमावेशक पध्दतीने काम केले. बँकिंग क्षेत्रात त्यांनी नवे मापदंड निर्माण केले. महाराजा शिवछत्रपती प्रतिष्ठानच्या वतीने जगदीश कदम म्हणाले की, संघाने जे जे सांगितले ते ते खळदकर साहेबांनी मनापासून अखेरपर्यंत केले. विलक्षण जनसंपर्क, सडेतोड विचार आणि कामावरची अढळ श्रध्दा असे त्यांचे व्यक्तिमत्व होते. सर्वांना बरोबर घेत, सहकाऱ्यांवर विश्वास टाकून त्यांनी समर्थपणे नेतृत्व केले. मनोबल टिकवणे कसे असावे हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे होते. यावेळी रवींद्र हेजीब, संजय लेले, विनीत कुबेर, सूर्यकांत पाठक, प्रमोद रावत, प्रा. सुधीर वैशंपायन, अभय माटे यांनी आपले श्रध्दांजलीपर मनोगत व्यक्त केले. डॉ. सुनिल भंडगे यांनी सभेचे सूत्रसंचालन केले.
————————


