Monday, September 14, 2026
Google search engine
HomeUncategorizedगणेशोत्सवात स्पीकरच्या भिंती नव्हे, गरजूंसाठी धान्याच्या भिंती उभारण्याचा आदर्श  शुक्रवार पेठेतील...

गणेशोत्सवात स्पीकरच्या भिंती नव्हे, गरजूंसाठी धान्याच्या भिंती उभारण्याचा आदर्श  शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळाचा उपक्रम वर्षभर सामाजिक बांधिलकी जपत निराधार कुटुंबांना एक लाख रुपयांच्या किराणा साहित्याचे वाटप

 

पुणे : गणेशोत्सव म्हटला की मोठ्या आवाजातील स्पीकर, ध्वनिप्रदूषण आणि विसर्जन मिरवणुकीतील चर्चा होत असताना, शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळाने उत्सवाला सामाजिक बांधिलकीची दिशा देत गरजू व निराधार कुटुंबांसाठी धान्याच्या भिंती उभारण्याचा आदर्श निर्माण केला आहे. उत्सवातील शक्ती केवळ जल्लोषासाठी न वापरता ती समाजाच्या उपयोगी यावी, या भावनेतून मंडळाच्या वतीने एक लाख रुपयांच्या किराणा साहित्याचे वाटप करण्यात येणार आहे. वर्षभर विविध सामाजिक उपक्रमांच्या माध्यमातून समाजाला काही तरी देण्याचा प्रयत्न मंडळाच्या कार्यकर्त्यांकडून केला जातो.

 

शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळात येथे या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी आमदार हेमंत रासने, नगरसेवक राघवेंद्र मानकर, सौरभ वीरकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक धनंजय पिंगळे, गणेश अवघडे, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आनंद सराफ, उमेश कांबळे, अशोक मेहेंदळे, शिरीष शिंदे, किरण सोनीवाल, अमित जाधव, अनिकेत मारणे,सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष राजाभाऊ महाडिक, शिरीष मोहिते, अमर लांडे, नमन कांबळे, विक्रांत मोहिते यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 

हेमंत रासने म्हणाले, सेवा मित्र मंडळाने स्पीकरच्या भिंतींऐवजी गरजू कुटुंबांसाठी धान्याच्या भिंती उभारून समाजाप्रती असलेली बांधिलकी जपली आहे. गरजूंसाठी अशा पद्धतीने मदतीचा हात पुढे करणे हे मंडळाचे कार्य कौतुकास्पद आहे. ३६५ दिवस समाजाला काही तरी देणे लागतो, या भावनेने काम करणारे कार्यकर्ते हीच गणेशोत्सवाची खरी ताकद आहे. १३४ वर्षांची परंपरा असलेल्या या उत्सवाने अनेक समर्पित कार्यकर्ते घडविले असून, उत्सवाला दिशा देण्याचे काम त्यांनी केले आहे. एक दिवसाच्या विसर्जन मिरवणुकीमुळे वर्षभर हा उत्सव समाजाला कशा प्रकारे मदत करतो हे विसरता कामा नये. विसर्जन मिरवणुकीसह उत्सवातील सर्व उपक्रमांमध्ये कायद्याचे पालन केले पाहिजे. गणेशोत्सव ही केवळ उत्सवाची परंपरा नसून एक चळवळ आहे आणि या चळवळीने संघटित शक्ती निर्माण केली आहे. या शक्तीचा उपयोग समाजासाठी करण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे.

 

सौरभ वीरकर म्हणाले, सेवा मित्र मंडळाकडून उत्सवाच्या माध्यमातून सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबविले जातात. गरजू आणि निराधार कुटुंबांना मदतीचा हात देत मंडळाने गणेशोत्सवाच्या सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले आहे. वर्षभर अशा पद्धतीने काम करणाऱ्या मंडळाचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.

 

शिरीष मोहिते म्हणाले, सण-उत्सव साजरे करताना समाजातील उपेक्षित घटकांकडे मंडळाच्या वतीने आवर्जून लक्ष दिले जाते. उत्सव ताकदीने साजरा व्हावा, मात्र त्याचबरोबर त्यातून समाजोपयोगी संदेशही गेला पाहिजे. समाजातील गरजू कुटुंबांनाही सण आनंदाने साजरा करता यावा, हा या उपक्रमामागचा उद्देश आहे. गणेशोत्सव हा कोण्या एका धर्माचा उत्सव नसून त्यात मुस्लिम समाजासह विविध समाजघटकांचेही योगदान राहिले आहे. त्यामुळे हा उत्सव समाजाला जोडणारा आणि एकमेकांना आधार देणारा ठरला पाहिजे.

 

मंडळाच्या वतीने पुरुष सदस्य नसलेल्या तसेच निराधार कुटुंबांना या उपक्रमातून मदत करण्यात येत आहे. यामध्ये मुस्लिम कुटुंबांसह रोजगारासाठी पुण्यात आलेल्या नेपाळी कुटुंबांचाही समावेश आहे. धर्म, जात किंवा प्रांताचा विचार न करता गरजू कुटुंबांना मदतीचा हात देण्याचा मंडळाचा प्रयत्न

आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -
Google search engine

Most Popular

Recent Comments