पुणे, दि. 18 (जिमाका वृत्तसेवा) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांमध्ये सायबर सुरक्षेबाबत जनजागृती करण्यासाठी जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने ‘लोकसंवाद-2026’ उपक्रमांतर्गत चिंचवड परिसरातील विविध गणेश मंडळांमध्ये सायबर पोलिसांकडून मार्गदर्शन करण्यात आले. पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयांतर्गत सायबर पोलीस ठाण्याच्या स्नेहल संजय तिताडे, नारायणी विजय पाटील आणि संगिता संजय पुरी यांनी नवतरुण मंडळ, चिंचवड गाव भाजी मार्केट तसेच गांधी पेठ तालीम मित्र मंडळ येथे नागरिकांशी संवाद साधत सायबर सुरक्षेबाबत सविस्तर माहिती दिली.
गणेशोत्सवाच्या माध्यमातून शासनाच्या विविध योजना, उपक्रम आणि नागरिकांच्या सुरक्षिततेशी संबंधित महत्त्वाची माहिती थेट जनतेपर्यंत पोहोचविण्यासाठी माहिती व जनसंपर्क विभागाच्या वतीने ‘लोकसंवाद- 2026’ हे विशेष जनजागृती अभियान दि. 24 सप्टेंबरपर्यंत राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत नागरिकांशी थेट संवाद साधून सायबर गुन्ह्यांचे प्रकार आणि त्यापासून बचाव करण्याच्या उपाययोजनांची माहिती देण्यात येत आहे.
सायबर फसवणुकीसाठी गुन्हेगारांकडून विविध प्रकारच्या आमिषांचा वापर केला जातो. अनोळखी व्यक्तींकडून येणारे संदेश, फोन, संशयास्पद लिंक, बनावट संकेतस्थळे तसेच आर्थिक व्यवहारांशी संबंधित आमिषांना नागरिकांनी बळी पडू नये, असे आवाहन यावेळी करण्यात आले. कोणतीही वैयक्तिक, बँकिंग किंवा गोपनीय माहिती अनोळखी व्यक्तींना देऊ नये, तसेच अनोळखी ॲप किंवा फाइल मोबाईलमध्ये डाउनलोड करू नये, असा सल्लाही देण्यात आला.
सोशल मीडिया खात्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक सुरक्षा सुविधा सुरू ठेवाव्यात, अनोळखी व्यक्तींच्या संदेशांना प्रतिसाद देताना काळजी घ्यावी आणि ऑनलाइन व्यवहार करताना विशेष खबरदारी घ्यावी, याबाबतही नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.
सायबर फसवणूक झाल्यास घाबरून न जाता तातडीने 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाइनवर संपर्क साधावा किंवा cybercrime.gov.in या संकेतस्थळावर तक्रार नोंदवावी, असे आवाहन करण्यात आले. गणेशोत्सवाच्या गर्दीचा आणि ‘लोकसंवाद’च्या व्यासपीठाचा उपयोग करून नागरिकांपर्यंत सायबर सुरक्षेचा संदेश थेट पोहोचविण्यात येत आहे.
000


